राज्याला रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी घरे, वाहने तसेच रस्त्यांवर झाडे पडण्याचे प्रकार घडले. नद्या पुन्हा दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. मात्र, रविवार असल्याने विद्यार्थ्यांना या पावसाचा उपद्रव झाला नाही.
यंदा पावसाळ्यात पणजीतील १८ जून मार्ग सलग तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला. मात्र, रविवार असल्याने या मार्गावर वाहतूक कमी होती. मध्य पणजीतील बॉम्बे बझार परिसरातील चारही बाजूंचे रस्ते मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. या मार्गावरील काही दुकानांमध्ये पाणी गेल्याने दुकानदारांना ते बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली.
मांडवी नदीवरील जुन्या पुलावर पाणी साचण्याचा प्रकार पुन्हा घडला. पुलावरील पाणी जाण्याचे मार्ग बुजल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पर्वरी बाजूच्या रस्त्यावर उतरणीमुळे वाहत येणारे पाणी थेट जुन्या पुलावर येते आणि ते त्याठिकाणी साचते. पुलावर साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जे उपाय केले आहेत, त्याठिकाणी कचरा अडकल्याने पाणी साचल्याचे दिसून आले.
वेळसांव-कासावली भागात आज सकाळी जोरदार पावसामुळे चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले. त्यामुळे कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. सुदैवाने कारमधील दाम्पत्य बचावले. ॲन्ड्रू तेवोदोसियो आणि त्यांची पत्नी माजी पंच ब्रेंडा अशी त्यांची नावे आहेत. वडाचे झाड कारच्या बॉनेटवर कोसळले. चालकाने लगेच वाहन थांबविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे उद्या सोमवारी (१५ जुलै) नर्सरी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही सुट्टी असेल.
खेड येथे रेल्वे मार्गावर दगडमिश्रित माती आल्यामुळे रविवारी दुपारी ४.४५ च्या सुमारास या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. किमान ७ ते ८ गाड्या अन्य मार्गांनी वळविल्या.
गेल्या दोन दिवसांपासून झोडपणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतेक धरणे एक-दोन दिवसांतच १०० टक्के पाणीसाठ्याच्या मर्यादा ओलांडतील, असे चित्र दिसत आहे. गावणे, साळावली आणि पंचवाडी धरणांनी आताच १०० टक्क्यांचा टप्पा पार केला, असून उर्वरित धरणे भरण्याच्या वाटेवर आहेत. गावणे धरणात १०० टक्के पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा खात्याने सांगितले.
साळावली : ४२.२६ मीटर,
हणजूण : ८८.४३ मीटर,
चापोली ३७.९२ मीटर,
आमठाणे : ४९.५५ मीटर,
पंचवाडी धरण २६.२० मीटर
गावणे : ६३.६० मीटर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.