म्हापसा : दारूच्या नशेत पिस्तुलातून हवेत गोळीबार करण्याचा कारनामा जेम्स सौझा या तरुणाला चांगलाच भोवला. तसेच त्याने बस्तोडा येथील उड्डाण पुलावर आपल्या मित्रांसोबत एका युवकाला नार्कोटिक अधिकारी असल्याचे सांगून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तिघांनाही अटक केली. गुरुवारी (ता.2) पहाटे झालेल्या गोळीबारामुळे म्हापसा शहरात एकच खळबळ उडाली.
अटक केलेल्यांमध्ये मुख्य संशयित जेम्स सौझा (रा. धुळेर), विल्यम्स रॉड्रिग्स (अन्साभाट-म्हापसा) आणि विनायक सोमजी (रा. माडेल-थिवी) या वाहनचालकाचा समावेश आहे. ते तिन्ही संशयित 25 ते 40 वयोगटातील आहेत. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटेच्या ४.३० च्या सुमारास हे तिन्ही संशयित पणजीहून म्हापशाच्या दिशेने येत असताना बस्तोडा उड्डाण पुलावर त्यांनी नवीन शेख (26, डिचोली) याला अडवून त्याला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली आणि त्याच्याकडील हेल्मेट काढून घेतले.
त्यानंतर हे तिन्ही संशयित म्हापसा येथे सिंडिकेट बँकेनजीक रस्त्यावर आले. तेथे पहाटे 5.40 च्या सुमारास ते पुन्हा दारू प्यायले. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत जेम्सने आपल्या पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. याचा आवाज आसपासच्या लोकांना ऐकू आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकाराची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी ताबडतोड घटनास्थळी धाव घेत तपास चक्रे फिरविली आणि जेम्स सौझासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन रितसर अटक केली.
पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक योगेश गडकर, विराज कोरगावकर, ज्ञानेश्वर मळीक, आशिष परोब, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल राजेश कांदोळकर, प्रकाश पोळेकर, अक्षय पाटील, अभिषेक कासार, आनंद राठोड यांनी संशयितांना अटक केली.
पालिका निवडणुकीत आजमावले नशीब
यापूर्वी पार पडलेल्या पालिका निवडणुकीवेळी जेम्स याने म्हापसा पालिका कार्यक्षेत्रातून निवडणूक लढविली होती. मात्र, त्याला केवळ 200 मते पडली आणि पराभव पत्करावा लागला. शिवाय मध्यंतरी तो पोलिस खात्यात भरती झाला होता; परंतु त्याच्यावर गुन्हा नोंद असल्याने त्याला दोन महिन्यांतच सेवेतून काढले होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे नोंदविले आहेत. पहिला गुन्हा फिर्यादी नवीन शेख याच्या तक्रारीनुसार दाखल केला. यात भादंसंच्या कलम 341, 324, 170, 506(2) व 34 अन्वये तसेच 25, 27, 30 शस्त्र कायदा उल्लंघनप्रकरणी नोंदविला. तर दुसरी तक्रार राज्य सरकारमार्फत कलम 336 व 34 तसेच 25, 27, 30 अन्वये शस्त्र कायदा उल्लंघनप्रकरणी नोंदविला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.