Goa Politics: खरी कुजबुज; ...अन् झोपलेले भाजप कार्यकर्ते जागे झाले!

Goa Politics Khari Khujbuj: मडगाव पालिकेतील १२ पदे भरुन काढण्‍यासाठी जी नोकरभरती प्रक्रिया सुरु केली होती तो वाद सध्‍या न्‍यायप्रविष्‍ठ झालेला आहे.
Goa Politics Khari Khujbuj
Goa Politics Khari KhujbujDainik Gomantak
Published on
Updated on

...अन् झोपलेले भाजप कार्यकर्ते जागे झाले!

डबल इंजिन सरकार पक्षाचे कार्यकर्तेच आता सरकार विरोधात बोलू लागलेत. कुंकळ्ळी मतदार संघातून जाणाऱ्या महामार्गालगतच्या गटारावर वॉकिंग ट्रॅक उभारण्याचे काम दोन महिन्यांपासून सुरू आहे. याच सदरात या कामाचा लेखाजोखा आम्ही घेतला होता. मात्र, सत्ताधारी भाजप कार्यकर्त्यांचे डोळे त्या वेळी उघडले नव्हते.या कामामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद होत आहे व त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळणार ही शंका याच सदरात व्यक्त केली होती. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा युरी समर्थकांनी याच्या विरोधात आवाज उठविला नव्हता.आता अचानक झोपी गेलेले भाजप कार्यकर्ते जागे झाले असून काम पूर्ण व्हायला आल्यानंतर आवाज उठवू लागलेत. आता हा विरोध कामाला की, हे काम विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झाल्यामुळे हे कळायला मार्ग नाही. पण भाजप कार्यकर्ते विरोध करू लागलेत? खरे म्हणजे या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांकडे विरोध नोंदवायला हवा होता, मात्र ते विरोध करतात युरी आलेमाव यांचा. यालाच म्हणतात ‘हमारी बिल्ली हमीं को म्याँव?’

पालिकेच्‍या नोकरभरतीवर टांगती तलवार

मडगाव पालिकेतील १२ पदे भरुन काढण्‍यासाठी जी नोकरभरती प्रक्रिया सुरु केली होती तो वाद सध्‍या न्‍यायप्रविष्‍ठ झालेला आहे. असे जरी असले तरी या पदांसाठी ज्‍यांची नावे मंजूर झाली आहेत त्‍यांना म्‍हणे, नियुक्‍ती पत्रेही देण्‍यात आली आहेत. त्‍यामुळे ज्‍या कुणाला ही नाेकरीची लॉटरी लागली ते खूष असणार यात काही दुमत नाही. तरीही या प्रकरणात मुंबई उच्‍च न्‍यायालयात दोन रिट याचिका दाखल करण्‍यात आलेल्‍या आहेत. आणि ही नाेकरभरती या रिट याचिकांच्‍या निकालावर आधारित असेल असे मुंबई उच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केल्‍याने एकप्रकारे या नोकर भरतीवर टांगती तलवार लटकत आहे एवढे नक्‍की.

तर्कच करू नका!

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नववीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात घोळ घातला आहे. पणजी महापालिका निवडणुकीतील मतदान ११ मार्चला असल्याने वेळापत्रकात बदल करताना हा घोळ झाला आहे. ११ मार्चला होणारी मराठीची परीक्षा २ मार्च रोजी घेण्यासाठी २ मार्च रोजी होणार असलेली संस्कृतची परीक्षा आता १२ मार्चला होणार आहे. त्याऐवजी मराठीची परीक्षा १२ मार्च रोजी घेता आली असती, अशी चर्चा आहे. मंडळाने परीक्षेचा कालावधी एका दिवसाने का वाढवला नाही तर ९ दिवस अगोदर मराठीची परीक्षा घेण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्‍न शिक्षण वर्तुळात चर्चिला जात आहे.

Goa Politics Khari Khujbuj
Goa Crime: मायणा-कुडतरीत खळबळ! फूस लावून पळवून अल्पवयीन मुलीचं अपहरण, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; पालकांचा गंभीर आरोप

फाईल्स गायब, की जबाबदारी?

आमदार वीरेश बोरकर आणि इतर आंदोलकांवर नगरनियोजन खात्याने ‘एफआयआर’ दाखल केला म्हणे. या तक्रारीत दावा असा की, आंदोलनाच्या गोंधळात दहा फाईल्स गहाळ झाल्या… पण खरी गंमत इथेच आहे. त्या वेळी ड्युटीवर असलेले पोलिस नेमके काय करत होते? आंदोलन बघत होते, की फाईल्सना निरोप देत होते? की सुरक्षा ही फक्त नावापुरती आणि प्रत्यक्षात ‘निरीक्षण महोत्सव’ सुरू होता? जर खरोखरच फाईल्स हवेत विरल्या असतील, तर मग प्रश्न फक्त आंदोलकांवरच का? ड्युटीवर असलेल्यांची जबाबदारी कुठे गेली? अशी चर्चा राज्यभर सुरू आहे. सरकार आपली चूक झाकण्यासाठी आंदोलकांना पुढे करत आहे. त्यामुळे ‘फाईल्स गायब’ हा मुद्दा की ‘जबाबदारी गायब’ हा मोठा मुद्दा हेच समजत नाही. एकूण काय, फाईल्स हरवल्या की हरवण्यात आल्या, हे तपासात कळेलच; पण जबाबदारीची फाईल मात्र कुणाच्या टेबलावर जाते, हे पाहणं आता अधिक रंजक ठरणार आहे!

युरी आलेमाव यांचे उपोषण

विरोधी पक्षनेते हे पद महत्वाचे व जबाबदारीचे. जॅक सिक्वेरा, डॉ. काशिनाथ जल्मी, मनोहर पर्रीकर यांनी या पदाचा योग्य वापर करून सत्तेवरील सरकारला जेरीस आणले होते, हा इतिहास सांगतो. विद्यमान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे तरुण आहेत, परंतु त्या या पदाचा योग्य वापर करणे तसे जमलेले नाही. आझाद मैदानावर बुधवारी त्यांनी गोमंतकीयांसाठी मी काहीही करायला तयार आहे, असे पत्रकारांना सांगितले व नेमके एका पत्रकाराने तुम्ही आमरण उपोषणाला बसणार का? असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना युरींनी लोकांना मला सांगितले तर ‘मी तयार आहे’, असे उत्तर दिले. नेमके त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या एका आंदोलकाने तुम्ही उपोषणाला बसा व मी तुमच्या सोबत बसतो, असे युरींना जोरात सांगितले. त्यावर युरीबाबांचा जो चेहरा पाहण्यासारखा झाला, त्याची चर्चा मात्र आज काँग्रेस कार्यकर्त्यांत रंगली होती.

हात लावून दाखवाच!

‘एफआयआर’ची शाई अजून वाळली नाही, तोवर आंदोलनाला नवी पालवी फुटली म्हणे! आता तर आंदोलन अजूनच चिघळणार, अशी खात्रीलायक चर्चा सध्या चौकाचौकात ऐकू येतेय. म्हणे, तक्रार झाली म्हणून पोलिसांनी एखाद्या आंदोलकाला हात लावला, तर स्थिती ‘हाताबाहेर’ जाईल असा इशारा म्हणे आंदोलकांनी दिला आहे. राज्यभर लहान-मोठी आंदोलने पेटलेली असताना, जर ही सारी ठिणगी एकत्र आली तर सरकारसमोर मोठी समस्या उभी राहणार, हे मात्र नक्की. सरकारला परिस्थितीची जाणीव आहे का, की अजूनही दिशाभूल करण्यातच सरकार व्यग्र आहे? असा टोलाही काहीजण लगावत आहेत. जनतेचा सूर आता थोडा बदललेला दिसतोय. एकंदर काय, एफआयआरने आंदोलन शांत होईल की अजून तापेल, हे येणारे दिवसच सांगतील! ∙∙∙

Goa Politics Khari Khujbuj
Goa Accident: चोर्ला घाटात लॉरी दरीत कोसळल्याने एकाचा मृत्यू, एक जखमी; 12 तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश

पोलिस होते कुठे?

सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर व ग्रामस्थांनी नगरनियोजन खात्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी पोलिस तैनात होते. आता त्या कार्यालयातील फाईल्स गहाळ झाल्याची तक्रार आल्याने पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. आंदोलकांनी जर फाईल्स नेल्या तर बंदोबस्तावर असलेले पोलिस काय करत होते. त्यांनी आंदोलकांना ती चोरी करताना तेथल्या तेथे का पकडले नाही? फाईल्स चोरल्याचा आरोप खरा असेल तर आधी तैनात असलेल्या पोलिसांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी चर्चा ऐकू येत आहे. ∙∙

उतू नका, मातू नका, कला वाचवा!

वास्कोचे परेश जोशी आणि म्हार्दोळचे अवधूत कामत यांनी कला अकादमीच्या मराठी नाट्य स्पर्धेत सादर केलेली नाटके अद्वितीय होती. त्यांना एकूण किती बक्षिसे मिळाली हे आठवणीत नाही. पण प्रत्येक प्रयोग लाजवाब होता. अवधूत कामत मुंबईहून हस्तलिखित संहिता पैदा करून आणायचे. त्याकाळी झेरॉक्स सोडा, सायक्लोस्टाईल सुध्दा व्यवस्थित नव्हतं. या द्वयीच्या किती तरी नाट्यकृती हृदयावर कोरलेल्या आहेत. कालबाह्य पोकळ नाटके व बक्षिसांसाठी वखवखलेले लाच देऊन जी बजबजपुरी व पोरकटपणा कला अकादमीत करत आहेत, त्याची कीव करावी तितकी थोडी. जोशी व कामत या चिंतनशील कलाकारांकडे नाट्य विचार होता. आताची बाळे ज्यांनी या दिग्दर्शकांची नाटके पाहिली नसेल त्यांना त्यांच्या थोरवीविषयी कसे सांगावे? या घोटाळेवीरांनी स्वताला दिग्दर्शक समजावे याच्यासारखी अधोगती नाही. कलेचं पतन होऊ नये. कला अकादमीने उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

पाणी जातेय वाया; अधिकारी गेले कुठे?

भाटले येथे गुरूवारी सटी भवानी देवळाजवळ सरकारी सदनिकेजवळ मुख्य जलवाहिनी फुटली. हजारो लिटर पाणी वाया. नागरिकांनी तक्रार करूनही अधिकारी पोहचले नाहीत. पाण्याचा फवारा मोठ्या प्रमाणात वाया जाताना पाहून अनेकजण तीव्र संताप व्यक्त करत होते. पाणी दिवसाढवळ्या वाया जाताना पाहून सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचा कारभार अनागोंदीचा असल्याची चर्चा भाटलेवासीयांत रंगली होती. अधिकारी सांगूनही गुंगारा का देताहेत, हाच प्रश्‍न सर्वांना पडला होता. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com