पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात सापडलेला गांजा इंटर्नच्या खोलीत की तेथील सर्वसाधारण शौचालयात सापडला, यावरून पोलिसही संभ्रमात पडले आहेत. सुरक्षारक्षकाने वसतिगृह वॉर्डनला व पोलिसांना वेगवेगळी जबानी दिल्याने त्यात विसंगती आहे. पोलिसांनी सुरक्षारक्षकासह वॉर्डन तसेच वसतिगृहातील ‘त्या’ पाच इंटर्नसह इतरांना बोलावून चौकशी केली आहे, मात्र हा गांजा वसतिगृहात पोहचला कसा, या निष्कर्षाप्रत पोहचण्यासाठी अजून ठोस पुरावे पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.
गोमेकॉ द्वितीय वर्षाच्या वसतिगृहात गांजा सापडल्यानंतर दोन दिवसांनंतर आगशी पोलिस स्थानकात वसतिगृहाचे वॉर्डन झेलिओ डिमेलो यांनी तक्रार दाखल केली होती. हा गांजा इंटर्न विद्यार्थ्यांच्या खोलीत सापडल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, मात्र, ज्यावेळी ही तक्रार देण्यात आली तेव्हा पोलिसांनी या सुरक्षारक्षकाला सोबत घेऊन केलेल्या पंचनाम्यावेळी तो वसतिगृह शौचालयाची पाहणी करताना तो आढळून आल्याचे जबानीत सांगितले आहे. त्याच्या या भिन्न जबान्यांमुळे पोलिसही चक्रावले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, मात्र हे अज्ञात कोण, याचा शोध लावू शकलेले नाहीत. या वसतिगृहातील इतर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या जबान्याही नोंदवल्या आहेत. मात्र, अनेकांनी याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
तपास अधिकारी पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक म्हणाले, अजूनही गांजा कोणी वसतिगृहात आणला याचा शोध लागलेला नाही. डीननी ज्या पाच इंटर्नची हकालपट्टी केली आहे,त्यांची नावे तक्रारीत नाहीत,तसेच सुरक्षारक्षकानेही जबानीत सांगितलेली नाहीत. ज्या रात्री हा प्रकार घडला त्यानंतर लगेच तक्रार दिली नव्हती. सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीच्या आधारे चौकशी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच्या घटनेची माहिती उशिरा देण्यामागील कारणांची चौकशी करण्यात येत आहे.
गोमेकॉ वॉर्डनकडून तक्रार देण्यास दोन दिवस लावण्यात आले. घटनेच्यावेळी त्या ठिकाणी वॉर्डन किंवा सहाय्यक वॉर्डनही तेथे पोहचले नाहीत. सुरक्षारक्षकाने त्यांना दिलेल्या माहितीच्या आधारे व त्या इंटर्नच्या हकालपट्टीचा आदेश काढल्यानंतर ही तक्रार देण्यात आली आहे. घटना 26 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली असताना त्या इंटर्नच्या हकालपट्टीचा आदेश 25 मे रोजी काढण्यात आला आहे. या वसतिगृहाचे वॉर्डन यांना कारणे दाखवा नोटीस बजावताना त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. त्यांच्यासह आणखी दोन सहाय्यक वॉर्डन आहेत,मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.
वॉर्डन म्हणतो, नोटीसच मिळाली नाही !
गेल्या सोमवारी (30 मे) प्रदेश युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गोमेकॉ डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना भेटून इंटर्नची हकालपट्टी केलेला आदेश मागे घेण्याचे निवेदन दिले होते. डीन बांदेकर यांनी वॉर्डन डिमेलो यांना कारणेदाखवा नोटीस 28 मे रोजी बजावली होती. मात्र त्यावेळी त्यांनी आपल्याला ही नोटीसच मिळाली नसल्याचे सांगितले होते. या नोटिशीत त्यांना 48 तासात लेखी स्पष्टीकरण मागण्यात आले होते. मात्र डिमेलोंनी अद्याप स्पष्टीकरण दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.