Goa News Dainik Gomantak
गोवा

Goan News: जेटी धोरणावरुन सरकारमध्‍येच दोन गट! 'खरी कुजबूज'

दैनिक गोमन्तक

Goan News: पर्यटन खात्याच्या जेटी धोरणावरून सध्या राज्यात बराच वाद गाजत आहे. जेटी धोरणाला ग्रामसभांतही विरोध होत आहे. परंतु खुद्द सरकारी खाते आणि त्यातील काही अधिकारी या धोरणाच्या विरोधात असल्याने सरकारमध्‍येच तणाव निर्माण झाला आहे.

धोरणातील काही गोष्टींना इतर खात्यांकडून आक्षेप घेतला जातोय. पर्यटन खात्याला दुसऱ्या खात्यांच्या कामकाजात दखल देण्याचा अधिकारी नाही. त्यांना केवळ सूचना देण्याचा अधिकार असल्याचा स्वर इतर खात्यांतील अधिकारी लावत असल्याने पर्यटनमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे.

दवर्लीतील असेही कवित्व

दवर्ली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक आटोपून व निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झाले. शिगमा संपला तरी त्याचे कवित्व राहते म्हणतात त्याप्रमाणे या निकालाचे विश्लेषण अजूनही चाललेले आहे. या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने घेतलेली भरारी साहजिकच आहे.

काँग्रेसने ऐनवेळी कच खाल्ली व अन्य पक्षातून उमेदवार आयात केला. एवढ्यावर हा निष्कर्ष थांबत नाही तर ‘आप’मधील गटबाजीही त्या उमेदवाराच्या मार्गात आडवी आली असे आता सांगितले जात आहे. एक मात्र खरे की रुमडामळमध्येही ‘कमळा’ने आपला प्रभाव दाखवला हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.

नार्वेकर गोवेकर!

महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांनी आपण मूळ गोव्याचे असल्याचे सांगितले आहे. नार्वेकर हे गोवा दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी सभापती रमेश तवडकर यांची भेट घेतली. त्यांनी आपण मूळ गोवेकर असल्याचे यावेळी सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या असतील.

शिवाय या त्यांच्या प्रतिक्रियेवर कोणी मीम्सही टाकलेल्‍या नाहीत, हे विशेष. नाहीतर नेटकरी अद्याप कसे गप्प हा प्रश्‍न पडल्यावाचून राहिला नाही. बरेच राजकारणी ‘गोवेकर'' म्हणवून घेण्यावरून ऊर बडवत असतात. परंतु नार्वेकरांच्या मतावर कोणीही पुढे येऊन, कुठल्या राजकारण्याने त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

इतरवेळी तत्काळ माध्यमांकडे प्रतिक्रिया पाठविणारे माध्यमप्रिय नेतेही गप्प कसे, असा प्रश्‍न पडला आहे. नार्वेकर हे भाजप-शिवेसना सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात सभापती आहेत. त्यामुळे प्रतिक्रिया देऊ इच्छिणारे कदाचित या पदाविषयी बोलताना कोठे कचाट्यात तर अडकणार नाही ना, हे तर तपासत नसतील ना?

एका म्यानात दोन तलवारी!

दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘गोवा प्रेमी’ या बॅनरखाली ‘आमदारचोरासूर’ दहनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्‍यात सर्व पक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला खरा, पण कार्यकर्त्यांची संख्या हातावर मोजण्याइतकीच होती. हा कार्यक्रम राबविण्यासाठी काँग्रेसचे नेते विजय भिके यांनी पुढाकार घेतला होता.

विशेष म्हणजे कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी संजय बर्डे देखील हजर होते. पण कार्यक्रमास बर्डे कोठे दिसले नाहीत. आता भिके यांनी पुढाकार घेतला म्हणून ते आले नाहीत की खरेच काही दुसऱ्या कारणामुळे माहिती नाही! भिके व बर्डे साहेब दोघेही काँग्रेस पक्षाचे नेते व फिल्डवरील कार्यकर्ते.

त्यामुळे दोघेही एकमेकांस वरचढ ठरू पाहताहेत. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, ही गोष्ट विसरून चालणार नाही.

नरकासुराचे 'अवयव'

नरकासुराच्‍या दहनानंतर राज्यभर सांगाडे, राखेचा खच पडलेला दिसून येतोय. काही पालिकांनी आपापल्या क्षेत्रातील कचरा साफ केला खरा, पण मुळात हा कचरा होऊच नये यासाठी मंडळांची जबाबदारी काहीच नाही का? कारण एवढा मोठा गाजावाजा करून मोठमोठ्या नरकासुर प्रतिमा तयार करणे आणि नंतर हुल्लडबाजी करून रात्रभर धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले आहेत.

हे प्रकार आपल्‍या संस्कृतीच्या विरोधातच नव्हेत का, असा सवाल सुज्ञ गोमंतकीयांकडून उपस्‍थित केला जात आहे. आता या हुल्लडबाजीत काही नरकासुर मंडळे नाहीत हे मान्य केले तरी नरकासुराच्या प्रतिमा मर्यादित स्वरुपात तरी करायला नकोत का? मुळात ‘श्रीकृष्ण विजयोत्सव’ असे नामकरण केले असते तर ठीक झाले असते, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

क्रिकेट निवडणुकीतील धाकधूक

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे. कलगीतुरा रंगला आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत आणि मतदानाचा हक्क असलेले संलग्न क्लब सारा तमाशा तटस्थपणे मजेत पाहत आहेत.

कोण प्रामाणिक आणि कोण अप्रामाणिक हे क्लबना माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी मतासाठी आलेल्या दोन्ही गटांचे स्वागत केले, परंतु स्पष्टपणे भूमिका व्यक्त केली नाही. त्यामुळे दोन्ही गट संभ्रमात असून समर्थन आपल्यालाच असल्याचे सांगत आहेत, मात्र आतून धास्तावलेले आहे हे प्रतिस्पर्धी रिंगणातील उमेदवारांच्या हावभावावरून जाणवते.

या कारणास्तव एका गटाने तर थेट दक्षिण गोव्यातील दोन बलाढ्य राजकारण्यांचे पाय धरले आणि त्यांना जबरदस्तीनेच निवडणूक प्रचारात उतरविले आहे. आता बोला!

‘एसपीं’मध्ये नाराजीचा सूर

एक महिन्याहून अधिक काळ पदभाराच्या प्रतीक्षेत असलेल्या व बढती मिळालेल्या पोलिस अधीक्षकांना (एसपी) पदभार देत दिवाळीची भेट दिली. मात्र या भेटीबाबत काहीजण नाराज आहेत. पोलिस खात्यात अनेक रिक्त जागा होत्या, मात्र त्यातील एक-दोन अधीक्षक सोडल्यास इतरांना मात्र सॉफ्ट पोस्‍टिंग दिल्याने या अधिकाऱ्यांची ‘थोडी खुशी, थोडी गम’ अशी अवस्था झाली आहे.

काहींनी मंत्र्यांकरवी चांगल्या पोस्‍टिंगसाठी प्रयत्न केले, मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणीच्‍याही वशिलेबाजीची दखल न घेता पोलिस महासंचालकांनाच त्याचे अधिकार दिले. त्यामुळे अनेकांची गणिते फोल ठरली. अजूनही काहीजण जोर लावत आहेत, मात्र तो कोठे तरी कमी पडत आहे. त्यातील एक दोन अधीक्षकांनी पोलिस स्थानकात काही महिनेच काम केले आहे.

त्यांनी साईड पोस्‍टिंग घेऊन कोणत्याही वादात सापडू नये व बढतीत अडथळा येऊ नये याची पद्धतशीरपणे काळजी घेतली. एरवी पोलिस खात्यातील त्यांची कामगिरी नगण्यच आहे. खात्यातील काहींना कर्तबगारीमुळे नव्हे तर ज्येष्ठेतेनुसार बढती मिळाली आहे. त्यामुळेच तर त्यांच्या कामगिरीनुसार पदभार देण्यात आला आहे.

आता मुहूर्त मोठ्या दिवाळीचा!

म्हापसा पालिकेत बदल होणार हे टुणटुणं सत्ताधाऱ्यांकडून मागील जुलैपासून वाजवलं जात आहे. मात्र अजून तरी नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्षाच्या खुर्चीला किंचितही धक्का लागलेला नाही. चतुर्थी संपली, नंतर दसरा गेला, त्यानंतर दिवाळी झाली पण मुहूर्त काही सापडला नाही.

फक्त प्रत्येकजण नवीन तारखा देतोय, पण ग्राउंड हालचाली शून्य! शहरात कुजबूज आहे की, मॅडम नगराध्यक्षा म्हणे खुर्ची सोडण्यास तयार नाहीत, जोवर मुख्यमंत्री त्यांना स्वतःहून फोन करीत नाहीत. पण काय खरे, काय खोटे देवालाच माहित! आता नगराध्यक्षा मॅडमनी इतर नगरसेवकांच्या मदतीने कामगार संपाचा विषय बऱ्यापैकी हाताळला आहे.

त्यामुळे मॅडमनी सर्वांना आपल्या बाजूने केले की काय? तसे केल्‍यास त्यांची खुर्ची शाबूत राहणार यात वादच नाही. पण तसे नसल्यास आता मुहूर्त मोठ्या दिवाळीचा असे म्‍हणण्‍यास हरकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT