Goa News: भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण? 'खरी कुजबूज'

Goa News: गोव्यात नुकत्‍याच झालेल्‍या पक्षांतरावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये वाक्‌युद्ध सुरुच आहे.
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: राजकारणात जेव्हा पक्षांतर होते, तेव्हा पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची देखील निराशा होते. गोव्यात नुकत्‍याच झालेल्‍या पक्षांतरावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये वाक्‌युद्ध सुरूच आहे. त्या आठ फुटीर आमदारांसाठी रक्ताचे पाणी केलेले निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते आणि त्यांना मतदान केलेल्या मतदारांचा विश्‍वासघात झाल्याने त्यांना सहानुभूती मिळाली आहे.

परंतु या मंडळींविरोधात पक्षासाठी लढलेल्या भाजप कार्यकर्त्यांबद्दल जास्‍त कोणी बोलत नाही. पक्षांतरला थेट केंद्राकडून आर्शीवाद मिळाल्याने येथील नेते आणि कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेताच ते झाले आहे. त्यामुळे सध्या भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले असल्याचे बोलले जात आहे.

Goa BJP
Goa Crime News: गोव्यात मनोरुग्‍ण युवतीला बेदम मारहाण

...म्‍हणून काय दिगंबरबाब कन्नडप्रेमी?

भाषेला भौगोलिक सीमा व बंधने लागत नाहीत असे जरी आपण म्हणत असलो तरी आपल्या देशात व राज्यात भाषावादावरून डोकी फोडण्यात भाषावादी मागे राहत नाहीत. गोव्‍यात कोकणी-मराठी वादाची झळ आजही आपण सोसत आहोत.

म्हादई नदीच्या वादानंतर गोमंतकीय आता कन्नडिंगाना पाण्यात पाहायला लागले आहेत. हल्लीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्यात कन्नड भवन उभारण्यासाठी सरकारकडे जमीन मागितल्यावर वाद निर्माण झाला होता.

काही दिवसांपूर्वी मडगाव शहरात झालेल्या कन्नड साहित्य संमेलनाला माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व आमदार उल्हास तुयेकर यांनी व्यासपीठावर पाहुणे म्हणून उपस्‍थिती लावून कन्नड भाषेला समर्थन दिले व त्‍या भाषेचे गोडवेही गायिले. गोमंतकीय राजकारण्यांना भाषेचे देणेघेणे नसेल, मात्र कन्नड भाषिकांचे जरूर आहे. कारण त्यांच्याकडे मतदानाचा हक्क आहे. आता बोला.

Goa BJP
Goan News: तोतया पर्यटक गाईडकडून फसवणूक; पर्यटन खात्याची चालढकल!

युरी ‘बिझी’ माणूस!

‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे. कुंकळ्‍ळीचे युवा आमदार युरी आलेमाव यांच्याकडून त्‍यांच्‍या समर्थकांच्या आणि कुंकळ्‍ळीकरांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. युरीने निवडणुकीपूर्वी आपले निवासस्थान कुंकळ्‍ळीला नेले होते. या मतदारसंघात युरीने दोन कार्यालयेही सुरू केली होती. मात्र कुठचे काय, सर्व अपेक्षांवर पाणी फेरले.

गेल्या अनेक महिन्यांपासून कुंकळ्‍ळीकरांनी आमदारांचे तोंडसुद्धा पाहिलेले नाही. आमदारबाब म्हणे आता पणजीला शिफ्ट झाले आहेत. ते आमचा फोनही घेत नाहीत अशा आम जनतेच्या नव्हेत युरीच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. युरीबाब ऐकताहात ना? नाही तर ‘अब पछताये होत, क्या जब चिड़ियाँ चुग गई खेत’ असे म्हणायची वेळ येईल.

श्रीकृष्‍ण पूजेतून श्रीगणेशा!

दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराचा अधिक गवगवा होतो ही वस्तुस्थिती असली तरी मडगावात मात्र श्रीकृष्‍ण पूजनोत्‍सवाची परंपरा सुरू असून गेली अनेक दशके ती पाळली जात आहे. आजवर अनेक मुख्यमंत्री, राजकीय नेते व उद्योजकांना या पूजेचा मान मिळाला आहे. यंदा आमदार दिगंबर कामत यांना हा मान मिळाला होता व तसे जाहीरही झाले होते.

Goa BJP
Goan News: तोतया पर्यटक गाईडकडून फसवणूक; पर्यटन खात्याची चालढकल!

पण प्रत्यक्षात पूजा मात्र त्यांचे पुत्र योगीराज कामत यांच्‍या हस्ते झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्‍या. हल्लीच भाजपमध्‍ये दाखल झालेले दिगंबर कामत यांना राज्यसभेवर निवडून आणून केंद्रात नेले जाईल व त्यानंतर मडगावातील त्यांची गादी योगीराज सांभाळतील अशी जी चर्चा आहे, तिला या श्रीकृष्‍ण पूजेद्वारे बळकटी मिळाली आहे. नाही तरी हल्ली दिगंबर यांच्या कार्यक्रमात योगीराज मागे पुढे असतातच.

दहन नेमके कशासाठी?

दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराची मिरवणूक व नंतर दहन करण्याची प्रथा आहे. मात्र यंदा काँग्रेसने आमदारचोरासुराचे दहन करण्याची नवी पद्धत आरंभली. त्याचे परिणाम काय होतात ते इतक्यात कळणार नाहीत, वेळ लागेल. काँग्रेसमधून आठ आमदार भाजपमध्‍ये गेल्यास वा तो पक्ष म्हणतो त्याप्रमाणे त्यांची चोरी झाल्यास महिन्याहून अधिक काळ उलटला.

मग आता हे दहन नेमके कशासाठी? यापूर्वी नुवे येथे निदर्शनाचा एक छोटेखानी कार्यक्रम झाला होता. त्यानंतर सर्वत्र सामसूम. ज्या मतदारसंघातील आमदारांनी पक्षांतर केले आहे, तेथे असे निषेध कार्यक्रम करण्याचे सोडून अन्यत्र ते करून काय साध्य होणार? अशी विचारणा काँग्रेसवालेच करत आहेत.

Goa BJP
Charter Plane Arrived in Goa : यंदाच्या हंगामातील पहिलं चार्टर प्लेन गोव्यात दाखल

मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

पणजी बाजारात वाहन पार्किंग मॉलची आवश्‍यकता कटाक्षाने भासत आहे. दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत असताना वाहन पार्किंगसाठी कुठेच जागा मिळत नाहीय. बेशिस्तपणे वाहने रस्‍त्‍यावरच पार्क केली जातात. मग व्हायचे तेच होते. वाहतूक कोंडी होऊन व्यवस्था पूर्णपणे ठप्प. पोलिसही आयत्या वेळी गायब.

पार्किंगची सुविधा नेमकी द्यायची कोणी, सरकारने की महानगरपालिकेने, हा नेहमीचाच प्रश्र्न सर्वांना पडला. पणजी पोलिस स्थानकासमोरील मिलिटरी कॅम्‍पची इमारत पाडायची आणि त्याजागी वाहन पार्किंग मॉल बांधायचा हा आता एक उपाय शिल्लक आहे. महापालिकेच्या मालकीची सदर जमीन तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना परत मिळविणे शक्य झाले नाही. आता याबाबत बोलायचे कोणी?

मत्‍स्‍योद्योगमंत्र्यांचा दणका!

राज्यात मासेमारी व्यावसायिकांची लॉबी आहे. प्रत्येक जेटीवर असलेल्या मच्छीमारी सहकारी संस्थांची मक्तेदारी मोडून काढण्याचा विडाच मत्‍स्‍योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी उचलला आहे. त्याचा प्रत्यय आज या व्यावसायिकांना आला. नोंदणी शुल्क सक्तीचे करून गेली अनेक वर्षे सरकारचा महसूल चुकविणाऱ्यांना चांगलाच दणका त्‍यांनी दिला आहे.

Goa BJP
Charter Plane Arrived in Goa : यंदाच्या हंगामातील पहिलं चार्टर प्लेन गोव्यात दाखल

या व्यवसायात काही भाजपचे वजनदार नेतेही आहेत. मात्र कायदा हा सर्वांना सारखाच, असे सांगून हळर्णकर हे घेतलेल्या निर्णयाशी ठाम आहेत. नोंदणी नसलेल्या ट्रेडर्सना जेटीवर प्रवेश बंद करण्याचा निर्णय त्‍यांनी घेतला आहे. मच्छीमार खात्याचा ताबा घेतल्यानंतर मंत्र्यांनी या व्यावसायिकांना सांगून बघितले, मात्र कोणी दाद देत नव्हते.

‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’ यानुसार त्यांनी या व्यावसायिकांच्या शेपटीवरच पाय ठेवल्याने ते वठणीवर आले आहेत. मंत्र्यांनी उचललेल्या या धाडसाच्‍या पावलामुळे व्यावसायिकांना योग्य धडा मिळाला आहे.

मुख्यमंत्र्यांशीही संपर्क साधून या व्यावसायिकांनी शेवटची धडपड केली, मात्र कोणीच दखल न घेतल्याने अखेर मंत्र्यांच्या निर्णयासमोर त्‍यांनी नमते घ्यावेच लागले. या कठोर निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत महसूल जमा होणार आहे. मंत्रिमंडळातून हळर्णकर यांची उचलबांगडी करण्‍यासाठीही या लॉबीने प्रयत्न सुरू केले आहेत म्‍हणे.

Goa BJP
Goa News: मत्स्य व्यापाऱ्यांना नोंदणी सक्तीची

मंत्रिपदाची ‘पॉवर’

फोंड्यातील मार्केट संकुल सध्या कात टाकत आहे. गेला बराच काळ ते अर्धेच वापरात होते. पण आता स्थानिक आमदार आणि कृषीमंत्री रवी नाईक यांनी मंत्री झाल्यापासून पूर्ण मार्केट वापरात आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. यापूर्वी या मार्केटकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच योग्य वेळेत हे मार्केट पूर्णपणे वापरात आले नाही.

कारण रवी नाईक मध्यंतरीच्या काळात आमदार नव्हते. त्यामुळे कामाला खो बसला. नंतरच्या काळात नाईक निवडून आले पण विरोधात. साहजिकच काम पुढे सरकलेच नाही. आता निवडून येऊन ते मंत्री झाल्यामुळे कामाला चालना मिळाली आहे. कामे होण्‍यासाठी मंत्रिपद हवेच, नाही का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com