पणजी: कोविड (Covid-19) महामारी कमी झाली की खासकरून पर्यटन (Tourism) आणि खाण (Mine) उद्योग परत सुरू करण्यास राज्य सरकार (Goa Government) उत्सुक आहे. त्यादिशेने आवश्यक पावले टाकत आहे, अशा शब्दांत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai Governor of Goa) यांनी जनतेला आश्वस्त केले आहे. राज्यपालांनी 75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) शुभेच्छा व्यक्त करताना हे आश्वासक निवेदन केले आहे.
त्यांनी संदेशात म्हटले आहे, की मागील एक वर्ष महामारीच्या संकटाच्या परिस्थितीत गेले. भारताने या महामारीच्या पहिल्या लाटेच्या वेळी यशस्वीपणे आणि मोठ्या धैर्याने लढा दिला. युवा आणि धडाडीचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कुशल नेतृत्वाखाली राज्य सरकारने गोव्यात कोविड महामारीची परिस्थिती चांगल्या तऱ्हेने हाताळली आहे. कोविड महामारीविरूध्द लढा देण्यास अथक परिश्रम केलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि फ्रंटलाईन वॉरियर्सची मी प्रशंसा करतो. संसर्गास आळाबंद घालण्यास आधार आणि सहकार्य केल्याबद्दल मी गोव्यातील लोकांचीही प्रशंसा करतो. गोव्यात लसीकरण योग्य वेगाने सुरू आहे. 80 टक्के पात्र लोकांनी लसीची एकतरी मात्रा घेतली आहे. लस घेतल्यानंतर लोकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आणि स्वच्छता राखण्याची सवय लावून घेतली आहे. हे खरोखरच महत्त्वाचे आहे.
लोकांच्या सामाजिक-आर्थिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गोव्याने मागील ६० वर्षांपासून नेटाने पावले उचलली आहेत. नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारने अनेक धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी केली आहे. गोव्यात आता मुक्तीचे साठावे वर्ष साजरे करण्यास सुरवात केली आहे. रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि पुलाच्या रूपाने पायाभूत साधन सुविधा निर्माण करून सरकारने राज्याच्या विकासासाठी आनंदाने कार्य सुरू केले आहे. मागील एका वर्षात दाबोळी विमानतळ भागात ग्रीड सेपरेटर, मांडवी नदीत तरंगत्या जेटी आणि पर्वरी येथे महत्वाकांक्षी उच्च न्यायालय इमारत प्रकल्प पूर्ण केले आहेत. याशिवाय पाणीपुरवठा विस्तार आणि अस्वच्छ पाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करून सुरू केले आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे.
राजभवन कपेलात फेस्ताची प्रार्थना
राजभवन कपेलात आज 15 ऑगस्ट रोजी फेस्ताची प्रार्थना होणार आहे. सकाळी 10 वाजता होणाऱ्या या प्रार्थनासभेत बाहेरील व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नाही. प्रार्थनासभेचे प्रक्षेपण सीसीआरटीव्ही व युट्यूबवर करण्यात येणार आहे.
महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाकडे...
नवीन महत्त्वाकांक्षी 8 पदरी झुआरी पूल पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे. पुलाचा एक भाग डिसेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मोप येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम नेटाने चालू आहे. डिसेंबर 2021 पर्यंत तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ऐतिहासिक आग्वाद तुरूंगाचे रूपांतर वारसा वस्तुसंग्रहालयात केले आहे आणि त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते लवकरच होणार आहे, असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे, की गोव्यातील लोकांना गोवा एक उत्कृष्ट राज्य करण्यासाठी पुर्नसमर्पित होण्याचे आणि ‘भांगराळे गोंय’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून कार्य करण्याची शपथ घेण्याचे आवाहन करत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.