Shri Ganesha Painting Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2024: पोर्तुगिजांच्या नजरेस पडू नये म्हणून गोव्यात कागदावर रेखाटले जायचे गणपतीचे चित्र

Ganeshotsav 2024: गोव्यात गणेशचतुर्थीचे महत्त्व तसेच इथल्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पैलूंचे विलोभनीय दर्शन आजही ग्रामीण भागांत अनुभवायला मिळते

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Chavath 2024

राजेंद्र. पां. केरकर

छळवणुकीची आणि क्रौर्याची परिसीमा पोर्तुगीज ख्रिस्ती मिशनऱ्यांनी गाठलेली असताना, तसेच भारतीय संस्कृतीचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केलेला असताना, गोव्यात गणेशचतुर्थीच्या सणाचे महत्त्व दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेले आणि होत आहे. इथल्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पैलूंचे विलोभनीय दर्शन आजही गोव्यातल्या ग्रामीण भागांत अनुभवायला मिळते, ते प्रसन्न करणारे आहे!

भाद्रपद महिन्यातल्या शुक्लपक्षातल्या चतुर्थीला गोव्यात गणेशचतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मृण्मय मूर्तीची शिव-पार्वतीचा पुत्र गणपती म्हणून पूजन करण्याची इथली परंपरा गेल्या पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ गोव्यात प्रचलित आहे.

गोव्याशी संलग्न असणाऱ्या कोकणात आणि घाटमाथ्यावर वसलेल्या प्रदेशांतही ही लोकपरंपरा पाहायला मिळते. पेडणे ते काणकोण, सत्तरी ते सासष्टीपर्यंत पसरलेल्या गोमंतकाच्या छोट्याशा भूमीत केवळ मृण्मयच नव्हे तर कागदावरती काढलेल्या गणपतीचे, लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तीचे आणि पत्रीच्या गणपतीचेही पूजन केले जाते. अंत्रूज महालात वाजे-शिरोड्यातल्या वैद्य नाईक कुटुंबीयात तर गणपतीच्या लाकडी मूर्तीचे पूजन पिढ्यानपिढ्या केले जाते.

गोव्यातल्या गणपतीच्या मंदिरांत प्रतिष्ठापित, घाटमार्गावरती, जलमार्गावरती, तसेच झरे तलावाच्या काठी आढळलेल्या मूर्तींतही वैविध्यपूर्ण शैलीचे दर्शन पाहायला मिळते. डिचोलीतील नार्वे येथील श्रीसप्तकोटेश्वर मंदिरातली आणि कुडणे येथील बेताळ मंदिराच्या बाहेर असलेल्या गणपतीच्या पाषाणी द्विभुज मूर्तीचे स्वरूप कोरीव कामातली भिन्नता अभिव्यक्त करते. पंचगंगा तीर्थक्षेत्री असलेल्या घाटाच्य पायऱ्यांचा संलग्न दगडावरती कोरलेला चतुर्भुज गणपती, जांभ्या शिल्पातल्या सौंदर्याची प्रचिती देतो. (Ganesh Idols In Goa)

गोव्यातल्या गणपतीच्या दगडी, धातू, काष्ठशिल्पात जसे मूर्तीतले वैविध्य दृष्टीस पडते तसेच इथल्या गणेशचतुर्थीच्या सणाप्रसंगी पुजल्या जाणाऱ्या मूर्ती परंपरेतही त्याची प्रचिती येते. शेजारच्या महाराष्ट्र-कर्नाटकातल्या एखाद्या जिल्ह्यापेक्षा भौगोलिकदृष्ट्या गोवा राज्य छोटे असूनही मृण्मय मूर्ती घडवण्याच्या प्रक्रियेपासून रंगकामातही विविधतेचे दर्शन अनुभवायला मिळते. सावईवेरे येथील सूर्यराव सरदेसाई यांच्या कुटुंबाचा आज गोव्यात विस्तार झालेला आहे आणि सरदेसाई कुटुंबातली मंडळी गोव्याबाहेरही स्थायिक झालेली असली तरी गणेशचतुर्थीचा सण मात्र त्यांना तीनशे वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूत एका छत्राखाली येण्यास प्रवृत्त करतो.

या ऐतिहासिक घराण्याला आदिलशाही राजवटीत सरदेसाईच किताब लाभला. त्यानंतर सूर्यराव सरदेसाई कुटुंबातल्या शूरवीरांनी तलवार चालवून शत्रूंना पाणी पाजले. त्यामुळे शिवशाहीत त्यांनी आपला मानसन्मान राखण्यात यश मिळवले. आज दीड दिवस साजरा होणारा गणेशचतुर्थी सण त्यांच्या मृण्मय मूर्तींचे वेगळेपण बदलत्या काळातही जपत आहे. लालभडक, रक्तवर्णीय गणपतीचा रंग शौर्याची परंपरा सांगत असल्याची सरदेसाई कुटुंबीयांची धारणा आहे. ‘खांब घुमटाच्या सावलीत’ या सुंदर पुस्तकाची निर्मिती करणारे मलबाराव सरदेसाई याच घराण्याचा वारसा जपत होते.

बार्देश (Bardesh) तालुक्यातल्या नादोडा गावातल्या राण्याजुव्यावर राणे सरदेसाई यांचा जुना वाडा असून, त्यांच्याकडे एकवीस कुटुंबांनी दिलेल्या एकवीस मातीच्या गोळ्यांपासून गणपतीची मूर्ती साकारली जाते. पेडण्यातल्या कोरगावात स्थायिक शेट्ये कुटुंबांची जी पूर्वापार बारा कुटुंबे आहेत, त्यांच्याकडून जे बारा मातीचे गोळे दिले जातात त्यातून गणपतीची मूर्ती साकारली जाते.

गणपतीची मूर्ती साकारताना विस्तारत जाणाऱ्या कुटुंबाची वीण घट्ट राहावी या हेतूने पूर्वजांनी या परंपरेचा स्वीकार केला आणि बदलत्या काळातही त्याचे श्रद्धेने पालन केलेले पाहायला मिळते. गणेश चतुर्थीचा सण गोव्यात पोर्तुगीज अमदानीत बंद व्हावा म्हणून तत्कालीन सरकारी यंत्रणेने पंथसमीक्षण(इन्क्विझिशन) संस्था स्थापन करून हिंदू धर्मीयांची पाशवी पद्धतीने छळवणूक केली.

१६०२साली भारतात आलेल्या पाद्री एतिएन-द-ला-क्रुवा यांनी गोव्यातल्या रायतूर येथील सेंट इग्नेशियस कॉलेजात स्थायिक झाल्यानंतर नवखिस्त्यांसाठी सेंट पीटरचे चरित्र मराठी भाषेत आणि रोमन लिपीत मुद्रित केले. त्यात त्यांनी हिंदूचे आराध्य असणाऱ्या गणपतीसारख्या देवांची विलक्षण थट्टा, उपहास व विपर्यास करणारी काव्यरचना केली होती. (Ganesh Festival History)

परंतु, असे असताना गोमंतकीय लोकमानसावरती पूर्वापार जी श्रीगणेशाची पूजन करण्याची परंपरा रूढ होती, ती कायदे करून नष्ट होईल म्हणून काही कुटुंबांनी गणपतीचे कागदावरती चित्र रेखाटून त्याचे पूजन आरंभले. ही पूजा पोर्तुगिजांच्या नजरेस पडू नये म्हणून, ते चित्र लाकडी पेटीत बंद करू ठेवले. गोवा मुक्तीनंतरही या कुटुंबांनी कागदावरच्या चित्राची पूजा चालूच ठेवली आहे. चतुर्थीला मृण्मय गणेशमूर्तीचा स्वीकार केलेला नाही. फोंड्यातल्या खांडेपार येथील शेणवी खांडेपारकर कुटुंबीयांनी कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्तीची परंपरा स्वीकारलेली आहे.

एरव्ही सामसूम वाटणारी जुनी, प्रशस्त राजागंणयुक्त, प्रासादतुल्य घरे, गणेशचतुर्थी सणाच्या कालखंडात गजबजतात आणि एका छत्राखाली शेकडोजण एकत्र बसून वैविध्यपूर्ण शाकाहारी जेवणाचा आस्वाद, आस्था आणि श्रद्धेने घेतात. संध्याकाळी घुमट (Ghumat), ‘समेळ’, ‘कासाळें’द्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या लोकसंगीतावरती आरती गायनात रममाण होतात. आयुष्यभर नास्तिकवादाचा पुरस्कार करणारी आणि मूर्तिपूजा न मानणारी मंडळीही आपल्या ग्रामीण भागातल्या घरी चतुर्थीत खास करून येतात आणि अन्नाचे सुग्रास घेताना अवीट आनंदाचा अनुभव घेतात.

कुठे जुन्या काळच्या आरशांनी सजवलेली लाकडी मखरे नव्या सजावटीने गणपतीचे स्वागत करण्यास सिद्ध होतात, तर कुठे आयताकृतीची लाकडी माटोळी, मौसमी रानफुले, फळे, कंदमुळे यांची जैवविविधता प्रदर्शित करते. गोव्यात या सणाद्वारे पारंपरिक फुगडी, दवलीमाण, घुमट आरती यांच्या गायनाचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार प्रदेशाने जतन करून ठेवलेल्या संचिताद्वारे घडतो. त्यामुळे कष्टकरी, श्रीमंत, मध्यमवर्गीय कुटुंबातही उत्सवाचा ओसंडून वाहणारा उत्साह नृत्य, गायन, वादनाबरोबर भोजनातही पाहायला मिळतो.

आंतोनियो लोपिस मेंडिस हा पोर्तुगीज प्रवासी १८६२च्या सुमारास गोव्यात आला आणि आपल्या भटकंतीत त्याला गोव्यातल्या विविध भागांत जी लोकसंस्कृती, नैसर्गिक चित्रे दृष्टीस पडली त्याची मांडणी आपल्या शब्दांनी आणि सुरेख चित्रांनी ‘ए इंडिया पोर्तूगिझा’ या ग्रंथात त्याने केली आहे. पोर्तुगीज भाषेतल्या या ग्रंथात गणेशचतुर्थीच्या सणाचे आणि गणपतीला लोकमान्य दैवताचे वर्णन केलेले पाहायला मिळते.

छळवणुकीची आणि क्रौर्याची परिसीमा पोर्तुगीज ख्रिस्ती मिशनऱ्यांनी गाठलेली असताना, तसेच भारतीय संस्कृतीचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केलेला असताना, गोव्यात गणेशचतुर्थीच्या सणाचे महत्त्व दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेले आणि होत आहे. इथल्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पैलूंचे विलोभनीय दर्शन आजही गोव्यातल्या ग्रामीण भागांत अनुभवायला मिळते, ते प्रसन्न करणारे आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT