Ganesh Chaturthi 2024: गोव्यात पोर्तुगीजपूर्व काळात गणेश चतुर्थी कशी साजरी केली जायची? गणपती मंदिरं, भातशेतीचा संबंध वाचा

Ganeshotsav 2024: गोव्यातला सगळ्यात लोकप्रिय सण ‘चवथ’ म्हणजेच गणेशचतुर्थी केवळ पंधरा दिवसांवरती येऊन ठेपली आहे
Ganeshotsav 2024, Goa Ganesh Chauth, Ganpati Festival
Ganesh Chaturthi Goa |Rajendra KerkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ganesh Chaturthi Chauth 2024

पणजी : गोव्यातला सगळ्यात लोकप्रिय सण ‘चवथ’; म्हणजेच गणेशचतुर्थी केवळ पंधरा दिवसांवरती येऊन ठेपली आहे. गोव्यात गणेशचतुर्थीचा सण कधी सुरू झाला हे सांगणे कठीण असले तरी पोर्तुगीजपूर्व काळापासून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असावा. गोव्यात ज्या ज्या ठिकाणी भात पिकाची मोठ्या प्रमाणात पैदासी होत होती तेथे पोर्तुगीजपूर्व काळात प्रामुख्याने गणेश मंदिरे अस्तित्वात होती याचे पुरावे राज्याच्या ऐतिहासिक दस्तऐवजांत आढळतात.

एकेकाळी दीपवती नावाने ओळखले जाणारे मांडवीच्या डाव्या काठी वसलेल्या दिवाडी बेटावरच्या नावेली गावात गोव्यातले सर्वांत मोठे गणेश मंदिर वसले होते. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगिजांच्या धार्मिक छळवणुकीमुळे भाविकांनी या दैवताचे प्रारंभी स्थलांतर अंत्रूज महालातल्या खांडेपार गावात आणि त्यानंतर सध्याच्या ठिकाणी खांडोळा येथे केले होते. (Shree Mahaganapati Temple )

खांडोळा येथे असलेले हे महागणपतीचे संस्थान गणेश पूजनाच्या शतकोत्तर वर्षांच्या इतिहासाच्या परंपरेची साक्ष देते. आज दिवाडी बेटावरती जेथे ख्रिस्ती दफनभूमी आहे त्या परिसरात गोवा कदंब वास्तुकलेचे पाषाणी जीर्णावशेष आढळले होते. तांबडीसुर्लाच्या महादेव मंदिराच्या शिल्पकलेशी साधर्म्य सांगणारे नावेलीचे मंदिर तिथल्या शेताभातात कष्ट करणाऱ्या कृषक समाजाचे प्रेरणास्थान असले पाहिजे.  (Lord Ganesha Oldest temples in Goa)

पोर्तुगीज दफ्तरात जे गणेश मंदिरांचे संदर्भ आढळलेले आहेत ते बार्देश आणि तिसवाडीतल्या भाताची प्रामुख्याने पैदासी येणाऱ्या गावांत आदळलेले आहेत. करमळी, चोडण, एला, ओलावली, पोंबूर्पा, सांगोल्डा, बेताळभाटी, शिवोली, दिवाडी आदी जुन्या काबिजादीतील गावांत प्राचीन काळी गणेश मंदिरे अस्तित्वात होती आणि हे गाव ‘खोचरी’, ‘दामगो’, ‘बेळो’, ‘आसगो’, ‘बाबरी’आदी भाताच्या प्रजातींच्या पैदासीसाठी संबंधित होते. (Ganesh Festival History)

डिचोली तालुक्यात कौंडिण्यपूर, कूंदनपूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या कुडण्यात आज उपेक्षित असलेली द्विहस्त गणेशमूर्ती शेकडो वर्षांच्या इतिहासाचा वारसा सांगणारी प्राचीन मूर्ती आहे.

महाराष्ट्रात तेरेखोल नदीच्या पल्याड असणारी रेडी ही बदामी चालुक्यांच्या इसवी सनाच्या ६व्या, ७व्या शतकात रेवतीद्विप म्हणून राजधानीचे शहर म्हणून नावारूपाला आली होती. इथे आढळलेली महाकाय द्विहस्त गणेशाची मूर्ती बदामी चालुक्यांच्या राजवटीतील गणेश पूजनाच्या इतिहासाची आठवण जागृत करते.

जुन्या गोव्यातल्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वस्तुसंग्रहालयात असलेली सांगे कुर्डीतील, त्याचप्रमाणे पिलार सेमिनारीच्या वस्तू संग्रहालयातील गणेश मूर्ती शेकडो वर्षांपासून प्रचलित असलेल्या गणेश मूर्ती पूजनाच्या प्राचीन परंपरेची प्रचिती आणून देते. कुडण्याच्या बेताळ मंदिराशेजारी जुन्या मूर्ती प्रदर्शनास ठेवलेल्या आहेत. त्यात गणपतीच्या विविध शैलीतल्या मूर्ती, कृषिप्रधान कुडण्याशी गणपतिपूजनाचे नाते किसी सुदृढ होते याची साक्ष देतात.

सांग्यातील विचुंद्रे, पेडण्यातील कोरगाव, केप्यातील चंद्रेश्वर आणि फोंड्यातील शिरोडा येथे चतुर्हस्त गणपतीच्या मूर्ती आढळलेल्या आहेत. होयसाळ मूर्ती शिल्पाशी नाते सांगणाऱ्या या गणेश मूर्ती गोवा कदंब राजवटीत कृषक समाजाला पूजनीय ठरल्या होत्या. काणकोणात लोलयेत आढळलेली द्विहस्त गणेशमूर्ती या लोकदैवताच्या प्राचीनत्वावरती प्रकाश टाकत आहे.

आज गोव्यात ठिकठिकाणी गणपतीची मंदिरे भाविकांनी मुक्तीनंतर मोठ्या प्रमाणात उभारलेली आहेत. आजच्या घडीस इथे गणपतीची शेकडो मंदिरे अस्तित्वात असली तरी ज्या हेतूने आपल्या पूर्वजांनी कृषी संस्कृतीशी निगडित असलेल्या या लोकदैवताची उपासना केली होती तो हळूहळू लुप्त होत आहे. भातशेतीच्या पैदासीअभावी गणेश पूजनाला कोणता अर्थ शिल्लक राहणार आहे?

गणपतीच्या फुलाफळांनी सजलेल्या माटोळीत नव्या भाताच्या दाणेदार लोंब्या हमखास हव्या. उंदरांनी भाताची नासधूस करू नये म्हणून चतुर्थीच्या दिवशी उंदरांना शेतात नेऊन पंचपक्वान्नांनी युक्त असलेले पान अर्पण करण्याची परंपरा आहे.

‘रणमाले’सारखे शेकडो वर्षांची परंपरा असलेले इथले लोकनाट्य असो अथवा गावोगावी होणारा कालोत्सव या साऱ्या प्रसंगी गणेश वंदना, नमन हवेच. याला खरे कारण प्राचीन काळापासून लोकमानसात रूढ असलेले अनुबंध आहेत. गोव्यातल्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या गणपतीच्या मूर्तीचे व्यवस्थितरीत्या संवर्धन आणि संरक्षण महत्त्वाचे आहे.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा १८९३साली महाराष्ट्रात राष्ट्रभक्तीची भावना सर्वसामान्य लोकमानसात जागृत व्हावी म्हणून सुरू केली होती. ‘केसरी’ वर्तमानपत्राद्वारे टिळकांनी ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीच्या विरोधात भारतीयांनी एकसंध व्हावे, स्वदेशीचा वापर व्हावा आणि स्वराज्याची संकल्पना रुजावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन व्हावे म्हणून आरंभलेल्या प्रयत्नांना यश लाभले.

गोव्यातही लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’चे वाचन करणाऱ्या मंडळींना सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्त्व उमजले होते. त्यांनी राष्ट्रभक्ती, गोव्याविषयीचे प्रेम जागृत व्हावे यासाठी अशा स्वरूपाच्या उत्सवाचे सार्वजनिकरीत्या व्हावे म्हणून प्रयत्न आरंभले होते. परंतु असे असतानाही पोर्तुगीज अमदानीतही गोव्यातल्या लोकमानसाने गणेशोत्सव सामूहिकरीत्या साजरा करण्याला प्राधान्य दिले होते त्याची प्रचिती तत्कालीन ऐतिहासिक ग्रंथातून येते.

Ganeshotsav 2024, Goa Ganesh Chauth, Ganpati Festival
Bicholim Ganesh Chaturthi: संसारासाठी नवऱ्यासोबत 'ती' करते वाद्यांची दुरुस्ती; गेल्या 21 वर्षांपासून डिचोलीत...

प्राचीन कालखंडापासून आधुनिक काळातही गोव्यात गणेशपूजनाची परंपरा अव्याहतपणे चालू होती. पोर्तुगिजांनी भारतीय धर्म आणि संस्कृतीचे प्रचलित असलेले मानदंड उद्ध्वस्त करण्याचे अटोकाट प्रयत्न केले.

परंतु असे असताना इथल्या लोकमानसाच्या हृदयी वास करणाऱ्या गणेश पूजनाच्या प्राबल्याला नष्ट करणे जमले नाही आणि त्यामुळे गोवा गुलामगिरीच्या जोखडातून विमुक्त झाल्यावर गणेशपूजनाच्या परंपरेला नवीन ऊर्जा लाभली. नवे आयाम प्राप्त झाले आहेत.

शेकडो वर्षांपासून गोव्यात गणपतीचे पूजन दगडी, मृण्मय, लाकडी मूर्तींबरोबर लोकनाट्यात सजीव कलाकाराद्वारे केले जाते. रणमाले, दशावतारी नाटकात वार्षिक कालोत्सवातल्या नाट्यसादरीकरणापूर्वी लोक कलाकार गणपतीचा लाकडी मुखवटा धारण करून प्रवेश करतो. अशा लोकपरंपरांतून गणपतीच्या भजन, मनन, पूजनाचे प्राचीनत्व प्रकट होत आहे.

Ganeshotsav 2024, Goa Ganesh Chauth, Ganpati Festival
Ganesh Chaturthi 2024: राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती बंदी कागदापुरती..?

लोकधर्म, रीतीरिवाजात गणपतीचे स्मरण केल्यानंतर इथल्या लोकमानसाला जणू काही ऊर्जा लाभत होती आणि त्यासाठी त्याच्या स्वरूपाला आद्यस्थानी प्रतिष्ठापित केले होते.

जुन्या काबिजादीतल्या तिन्ही महालातून गणपतीच्या पूजनाची जी वैविध्यपूर्ण आणि समृद्ध अशी परंपरा होती, ती नष्ट करण्यासाठी अटोकाट प्रयत्न पोर्तुगीज धर्मगुरूंनी केले. परंतु फादर क्रुवोसारख्या धर्मांधांचे प्रयत्न मात्र फळाला आले नाहीत. त्यामुळे ही परंपरा अखंडपणे चालू राहिलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com