सासष्टी: काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिष राऊत देसाई यांच्यावर कारवाईसह उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर व निवडणूक निर्णय अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) विपुल नाईक गावकर यांची बदली करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे.
एकीकडे निवडणूक सोहळा म्हणून साजरा करा, असे आयोग सांगत असताना मंत्री व सरकारी अधिकारी विरोधी पक्षांवर दबावतंत्राचा वापर करतात, असाही आरोप करण्यात आला.
‘पोलिस निरीक्षक राऊत देसाई यांनी काणकोणमधील एका मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन गावडोंगरी पंचायत सभागृहातील गोवा फॉरवर्डची जिल्हा पंचायत निवडणूक संदर्भातील सभा स्वत: माईकचा आवाज बंद करून उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी हे जबाबदारी एकमेकांवर ढकलतात’, असे आरोप
मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्डचे विकास भगत यांनी केले. पत्रकार परिषदेला गोवा फॉरवर्डच्या काणकोण गट अध्यक्ष दत्ता गावकर व खजिनदार उमेश तुबकी उपस्थित होते. भगत यांनी सांगितले, ‘सभेला हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. गोवा फॉरवर्डचे जिल्हा पंचायतीचे उमेदवार प्रशांत नाईक यांना मिळत असलेला पाठिंबा पाहूनच काणकोणचे मंत्री जे अंत्योदय तत्वाचा अवलंब करण्याची भाषा करतात, त्यांची पायाखालची माती सरकल्यासारखे झाले आहे.
पोलिस निरीक्षक कोणाच्या सांगण्यावरून असे वागले, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी व निवडणूक आयोगाने लक्ष घालावे, अशी मागणी भगत यांनी केली. निवडणूक सोहळा म्हणून साजरा करा, असे निवडणूक आयोग सांगत असताना मंत्री व सरकारी अधिकारी विरोधी पक्षांवर दबावतंत्राचा वापर करतात, हे योग्य नसल्याचे दत्ता गावकर यांनी यावेळी सांगितले.
गावडोंगरी येथील सभेसाठी व इतर परवानगीसाठी आम्ही २६, २७ व २८ असे सलग तीन दिवस जिल्हाधिकारी कचेरीत खेपा मारत होते. आम्ही अर्ज सुद्धा सादर केला. मात्र, या तीन दिवसांत पर्तगाळमध्ये पंतप्रधान येणार असल्याने व पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी कचेरीत कर्मचारी वर्ग जागेवर नव्हता.
आम्ही २९ नोव्हेंबर रोजी उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर यांच्याशी संपर्क साधून परवानगी मागितली. त्यांनी आम्हाला निवडणूक अधिकारी विपुल नाईक गावकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. गावकर यांच्याकडे संपर्क साधला तर त्यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांकडे बोला, असे सांगितले.
यावेळी आम्हाला सभा घ्या, असे आम्हाला तोंडी सांगण्यात आले. तसेच भरारी पथक सोमवारपासून कार्यरत होईल, असेही सांगण्यात आले. आमच्याकडे ७ ते ९ या वेळेत सभा घेण्याची परवानगी होती. सभा शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता सुरू झाली.
सभेला हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. बरोबर सव्वा आठ वाजता पोलिस निरीक्षक हरीष राऊत देसाई यांनी सभागृहात प्रवेश केला व थेट व्यासपीठावर जाऊन त्यांनी माईकचे बटण बंद केले.
त्यावेळी स्थानिक पंचायतीचे लोकप्रतिनिधी व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई हे सुद्धा उपस्थित होते. पोलिस निरीक्षकांकडे सभागृह आरक्षणाचे पत्र देण्यात आले. शिवाय रात्रीच्या दहापर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास हरकत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले, तरीही त्यांनी सभा बंद करण्यास सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.