Balen Shah Nepal Revolution
Balen Shah Nepal RevolutionDainik Gomantak

गोव्यात, विशेषतः 'पणजी' निवडणुकांसंदर्भात लिहिण्यासारख्या अनेक गोष्टी असताना 'नेपाळ'सारख्या छोट्या देशावर का लिहावे लागतेय? चेतना

Balen Shah Nepal Revolution: नेपाळी तरुणांनी ज्या पद्धतीने तेथे राजकीय क्रांती घडवून आणली, भ्रष्ट, अविवेकी सरकार लाथाडून पाडले, त्यांना स्वप्न दाखवले एका तरुण रॅपरने...त्याच्या गाण्यात, संगीतात क्रांतीचे अंगार फुलले होते.
Published on

आपल्या देशात आणि गोव्यात, विशेषतः पणजी राजधानीत महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात लिहिण्यासारख्या अनेक गोष्टी असताना नेपाळसारख्या छोट्या देशावर का लिहावे लागतेय, असा प्रश्‍न अनेकांना पडू शकेल. आपल्या शेजारील देशांमध्ये बऱ्याच राजकीय घटना वेगाने घडून तेथे क्रांतिकारी परिवर्तन घडत असताना आपण तोंड वळवू शकत नाही.

बांगलादेशात पंतप्रधानांना देश सोडून पळ काढावा लागला. तेथे शांततापूर्ण मार्गाने नवे सरकार स्थापन झाले. नेपाळमध्ये जेनझींनी भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीने पोखरलेल्या सरकारला मारून, पिटाळून धडा शिकवला व आता तेथे एक ३५ वर्षीय रॅपर-संगीतकार-जो तंत्रकुशलही आहे, सरकार स्थापन करतो आहे.

नेपाळमध्ये पाच मार्चला निवडणुका होऊन काठमांडूचे माजी महापौर बालेंद्र शाह - ज्याला प्रेमाने ‘बालेन’ म्हणून ओळखले जाते - भारतानिकटच्या या छोट्याशा देशात आपले सरकार स्थापन करणार आहे. त्याच्या चार वर्षांपूर्वीच स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने (आरएसपी) नेपाळ संसदेतील कनिष्ठ सभागृहात १६५मधील १२५ जागा जिंकल्या. २७५ लोकप्रतिनिधीगृहात त्याचा पक्ष १८४ जागा हस्तगत करणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे.

भारत व चीन दरम्यान पिचलेल्या या तीन कोटी लोकसंख्येच्या देशातील राजकीय घटना आपल्यासारख्या राजकीय निरीक्षकांना विलक्षण चक्रावून टाकणाऱ्या आहेत. तरुणांचा एक नवा पक्ष पारंपरिक पक्षाला धुऊन काढतो.

नेपाळी कॉंग्रेस, नेपाळ कम्युनिस्ट पक्ष किंवा कम्युनिस्टांची जहाल आघाडी यांना पाणी पाजतोच, शिवाय अनेक मान्यवर नेत्यांचा अत्यंत नवखे राजकीय चेहरे अक्षरशः धुव्वा उडवितात. राजकारणाकडे आस्थेने पाहणाऱ्या, नवे राजकीय वारे निर्माण करू पाहणाऱ्या तरुण बुद्धिमान वर्गाला हा स्फूर्तिदायी धडा आहे!

सप्टेंबर २०२५मध्ये जेनझींनी नेपाळमध्ये क्रांतिकारी परिवर्तनवादी चळवळ सुरू केली होती त्या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक झाली. सरकारने समाजमाध्यमांवर बंदी लागू केल्याचे निमित्त घडले. त्यातून भ्रष्टाचार व वशिलेबाजी या दोन प्रश्‍नांवर नेपाळी तरुणांच्या आंदोलनाचा भडका उडाला.

हिंसक आंदोलनामध्ये ७७ जण मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यायला भाग पडून नेपाळी युवकांचा पाठिंबा लाभलेल्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की हंगामी पंतप्रधान बनल्या. तटस्थपणे नव्याने निवडणूक घेण्याचे कर्तव्य त्यांनी पार पाडले. स्वतंत्र पक्षाला मिळालेला पाठिंबा पाहता, कोणाचाही टेकू न घेता ते स्वबळावर सरकार बनवू शकतील.

राष्ट्रीय राजकारणात नवखे असूनही आरएसपीने २०२२मध्ये संसदेतील २० जागा जिंकल्या होत्या - त्यामुळे स्वाभाविकच जनभावना त्यांच्याकडे आकर्षित झाल्या होत्याच. पारंपरिक राजकीय पक्षांविषयी तरुणांचा असलेला असंतोष, खदखद आरएसपीच्या माध्यमातून व्यक्त झाली, असे या घटनेचे वर्णन करता येईल.

माजी पंतप्रधान ओलींच्या विरोधात ‘बालेन’नी निवडणूक लढवून प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तीन पटींनी अधिक मते प्राप्त केली. आरएसपीने बालेनला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेच आहे. ‘बालेन’ शाह यांचा उदय हा नव्या पिढीने आपल्या हिकमतीने घडवून आणलेल्या राज्यक्रांतीचे प्रतीक म्हणूनच पाहावे लागेल.

२०२२मध्ये काठमांडूचा अपक्ष महापौर बनण्याचा मान त्यांनी मिळवला, तेव्हा एक रॅपर-संगीतकार एवढे महत्त्वाचे पद कसे हस्तगत करू शकतो, म्हणून अनेक देशातील तरुणांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते.

त्यानंतर २०२५मध्ये न्यूयॉर्कसारख्या अमेरिकेतील अत्यंत महत्त्वाच्या महानगराचा महापौर बनण्याचा मान जोहरन ममदानी यांना मिळाला, कारण त्यांनीही कार्यकर्त्यांची एक लाख फळी उभारून विद्यमान परिस्थितीविरोधात वातावरण निर्माण केले.

३४ वर्षे वयाचा ममदानी १९९१मध्ये जन्मला आहे. दोघांनी आपल्या करिष्म्याचा वापर केला, लोकांचे गरिबांचे प्रश्‍न मांडले. नेपाळमधील तरुण गरिबीच्या खाईत लोटले जात असून त्यांना उपजीविकेसाठी सक्तीने स्थलांतर करावे लागत असल्याची खंत बालेन आपल्या लोकांमध्ये व्यक्त करीत असे.

सांस्कृतिक अभिव्यक्ती व राजकीय चळवळी हातात हात घालून चालल्या तर लोकांचे लक्ष चटकन वेधून घेतले जाऊ शकते व त्यात प्रामाणिकपणा व युवकांप्रति संवेदना व्यक्त झाली तर ते त्यांना डोक्यावर चढवून घेतात हे बालेन व ममदानी यांच्यामधले साम्य आहे.

ममदानीपेक्षा बालेन एका वर्षाने छोटा. सुरुवातीला वेगळ्या पेहरावासाठी बालेनने लक्ष वेधून घेतले, काळ्या आयताकार गॉगल व जागतिक हिपहॉप संगीताची शैली यामुळे बालेननी जागतिक फॅशनकडे लक्ष लागलेल्या नेपाळी तरुणांचे लक्ष वेधले.

ही पिढी जगाला वेडावणाऱ्या रॅपिंग, ब्रेक डान्स, ग्राफिटी, ज्ञानाची जाणीव या तत्त्वांनी भरलेली आहे. बीट्सचे संगीत व लयबद्ध गायन हे या शैलीचे वैशिष्ट्य असून स्थानिक ब्लॉक पार्टीपासून सुरू झालेला हा हिप-हॉपचा प्रवास आज एका प्रबळ जागतिक, सांस्कृतिक अभिव्यक्तीत परावर्तित झाला आहे;

ज्याची बालेन नेपाळी-‘ओळख’ बनला. बालेनला लहानपणापासून लयबद्ध कविता रचण्याची आवड होती - जी त्याला अमेरिकी संगीतकारांच्या जवळ घेऊन गेली. बालेन यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगपासून सुरुवात करून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली, परंतु शिक्षण घेत असतानाच संगीतात त्याचे प्रयोग सुरू होते, त्यातून ऐन तारुण्यात २०१०मध्ये त्यांनी ‘रस्ताद मुलांवर’ विशेषतः वेतनातील तफावतीवर ‘सडक बडक’ हे गाणे तयार केले, जे विलक्षण लोकप्रिय बनले, पुढे फेसबुकवरच्या गाजलेल्या रॅप स्पर्धेतही त्यांनी भाग घेऊन स्वतःची छाप पाडली!

बालेन शाह यांची लोकप्रियता नेपाळी तरुणांमध्ये वाढण्यात त्यांची सामाजिक विषयांवरची गाणी कारण ठरली, हे मान्य करावे लागेल.

‘बलिदान’ या त्यांच्या गाण्याला २०२०मध्ये ते युट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून १३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. त्या गाण्याची सुरुवातच अशी होते ः देश सांभाळणारे सारे लोक पळपुटे आहेत, सर्व नेते आहेत चोर आणि त्यांनी देशाची पिळवणूक चालवलेली आहे.

त्यांचे नेपाळ हासेको’ हे गाणे तर गेल्या वर्षी तेथे घडलेल्या चळवळीचे स्फूर्तिगीतच बनले होते - ज्यातून रस्त्यावर आलेल्या तरुणांना प्रसंगी समर्पण करण्याची ताकद मिळाली - या गाण्याला यूट्यूबवर १० दशलक्षावर व्ह्यूज मिळाले आहेत.

हा कसला देश आहे - ज्यात तरुणांच्या कष्टाचे चीज होत नाही, त्यांच्या कौशल्याला, त्यागाला किंमत नाही - या देशाच्या तरुणांची शक्ती पालापाचोळा कशी उडून जात आहे, आणि देशाला मोठा बनविण्याचे स्थान दाखवून निवडून येणारे नेते देशाची ससेहोलपट करण्यात, लुटण्यात दंग आहेत,

असा त्या गाण्याचा मथितार्थ होता, जो तरुणांच्या काळजाला भिडला व आधीच त्यांच्या मनात असलेला राग, उद्वेग असंतोषातून प्रकट झाला. तरुणांनी मंत्र्यांना, लोकनियुक्त प्रतिनिधींना रस्त्यावर पकडून, त्यांचे कपडे फाडून त्यांना बेदम मारले, त्यांची घरे तोडली, लोकप्रतिनिधीगृहावर कब्जा केला.

या नेत्यांनी नेपाळला कंगाल बनविले हे सत्य होते, त्यांनी तरुणांचे भविष्य अंधकारमय बनविले होते, यातही तथ्य होते. फक्त या असंतोषाचे अंगार फुंकर घालून पेटवण्याची आवश्यकता होती. ती सांस्कृतिक अभिव्यक्तीतून सहज घडून आली...

बालेनची गाणी, त्यातील बंडखोरीचे आवाहन यामुळे तरुणांच्या असंतोषाचा भडका उडाला व निवडणुकीद्वारे त्याला दिशाही प्राप्त झाली. नेपाळमध्ये १८ ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या ५२ टक्के असल्याने आरएसपीने उमेदवारांची निवड करताना ४० वर्षे हेच वयोमान नजरेसमोर ठेवले.

आरएसपीचा ‘बचा पत्रा’ जाहीरनामा तरुणांच्या आशाआकांक्षांवर भर देत देशात स्वच्छ प्रशासन, भ्रष्टाचारमुक्त सरकार, न्यायालयीन सुधारणा आणण्याचे वचन देणारा होता. परंतु जाहीरनाम्यापेक्षाही देशातील वाढता भ्रष्टाचार, बेरोजगारी व गलथान आर्थिक विकासामुळे पिचलेल्या तरुणाईला बालेनसारख्यांचे नेतृत्व अधिक भावले होते.

२०१५मध्ये स्वीकृत नव्या संविधानानंतर नेपाळमध्ये एकही राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त करता आलेले नाही हे वास्तव आहे, त्याचाच पुकारा बालेन यांनी सतत केला. बालेन यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण वयापासून राजकारणात प्रवेश करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी कधीच लपवून ठेवली नाही.

तरुणपणात काठमांडू शहराच्या झालेल्या अधोगतीवर ते सतत बोलत होते. बालेन यांनी २०२२ची महापौरपदाची निवडणूक लढवली व भ्रष्टाचार तसेच कुशासन हेच आपल्या निवडणुकीचे मुख्य मुद्दे बनविले. परंतु निवडून आल्यावर हात पांघरून सत्तेची ऊब घेण्यात त्यांनी धन्यता मानली नाही. ते सतत कार्यमग्न राहिले.

त्यांनी शहरात बेकायदा बांधकामांविरोधात जोरदार मोहीम चालविली. अनेक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करीत अवैध व्यापाऱ्यांनाही वठणीवर आणले. सरकारलाही आपला इंगा दाखवायला कमी केले नाही. गलथान व बेजबाबदार सरकारविरोधात पाऊल उचलताना त्यांनी कामचुकार पंतप्रधान व सरकारी कार्यालयातील कचरा उचलण्यास आपल्या विभागाला मनाई केली. त्यांचा मार्ग सोपा नव्हता.

Balen Shah Nepal Revolution
Nepal Video: नेपाळमध्ये तरुणाई उतरली रस्त्यावर, संसदेत घुसून राडा, 9 जणांचा मृत्यू, 170 हून अधिक जखमी; सोशल मीडिया बंदी, भ्रष्टचारावरुन Gen Z चे बंड

बालेनविरोधात अनेक प्रवृत्ती व सरकारही उभे ठाकले. सरकारशी मतभेद झाल्यामुळे शाह यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बरेच महिने वेतनाविना राहावे लागले, परंतु समाजमाध्यमांवरील त्यांच्या आवाहनाला असंतुष्ट नेपाळी तरुणांचा भरघोस पाठिंबा लाभला. त्यांच्या प्रस्थापित विरोधी, संघर्षात्मक संघर्षाला तरुणांनी उचलून धरले. गेल्या वर्षी तेथे भडकलेल्या आंदोलनाचा तर ते चेहराच बनले होते.

बालेन शाह यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ओघवती वाणी व जनमानसाच्या मनाला स्पर्श करण्याची हातोटी. ते पारदर्शकतेची गोष्ट करतात. आपल्या प्रजेशी थेट संपर्क साधण्यास त्यांना आवडते.

Balen Shah Nepal Revolution
Panaji Election: बाबूश, भाजप एकत्र आल्याने सत्ता कायम! सडेतोड नायक VIDEO

ते म्हणतात, ‘आम्ही तरुणांच्या त्यागातून बलिदानातून सरकारमध्ये आलो आहोत. आम्हांला पारदर्शक राहायचे आहे आणि तरुणांच्या आशा-आकांक्षा प्रत्यक्षात आणणारे सरकार स्थापन करायचे आहे’.

त्यांनी, अर्थकारण डबघाईस आल्यामुळे देशातून परागंदा झालेल्या व भारतासारख्या देशात अत्यंत कनिष्ठ रोजगार करणाऱ्या, लोकांच्या घरात भांडीकुंडी करणाऱ्या मुलामुलींचे भविष्य आखीवरेखीव बनवायचे मोठे स्वप्न तरुणांपुढे ठेवले आहे. चीनही त्या देशाला स्वप्ने दाखवतो आहे व प्रसंगी गिळंकृत करण्याचेही भय दाखवतो आहे. असा पिचून निघालेला व सतत अंगार पेटवणारा तरुण असलेला देश चालविणे, राजकारण करणे म्हणजे केवळ रॅप गाणे नव्हे, हेसुद्धा तेवढेच खरे! परंतु त्यांनी स्वप्ने सत्यात उतरवली तर इतर जगातील तरुणांनाही ही चळवळ नवी चेतना देईल, यात तिळमात्र शंका नाही!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com