

पणजी: भाजपध्ये उत्पल यांना येण्यास आपला काहीही विरोध नाही. परंतु त्यांच्या काय मनात आहे माहीत नाही. भाजपसाठी मनोहर पर्रीकर यांनी मोठे योगदान दिले आहे, ते भाजपातच शेवटपर्यंत राहिले, त्यांनी राज्यात सरकारही स्थापन केले. त्यामुळे त्यांच्या मुलाला आपण काही सल्ला देऊ शकत नाही. मात्र, उत्पल यांनी भाजपात आले पाहिजे, असे आपणास वाटते, असे मत मंत्री बाबूश मोनसेरात यांनी व्यक्त केले.
महानगरपालिका निवडणुकीनंतर बाबूश यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी सांगितले की, विधानसभा आणि महानगरपालिकेची निवडणूक वेगळी आहे. महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आपणास या महानगरपालिका निवडणुकीत पॅनलचे नेतृत्व करण्याची संधी दिली.
महानगरपालिका निवडणूक बाबूश केंद्रित असते, त्यावर बाबूश म्हणाले, सर्वजणांना केवळ मला पराभूत करायचे आहे, यासाठी एकत्रित येतात, ते पक्षाला पराभूत करायला एकत्रित येत नाहीत, असे आपणास दिसते. तीन जागांवर आम्ही पराभूत झालो, त्याचा आपणास अजूनही खेद वाटतो आणि आपण त्याठिकाणी कमी पडलो, असे आपणास वाटते.
ते म्हणतात, कोणतीही निवडणूक आल्यानंतर आपण कधीही वर्तमानपत्र वाचत नाही, उगाच मन विचलित होते. तीस पैकी २७ जिंकल्या आणि तीन जागा गमावल्या, त्या पराभवाची जबाबदारी आपली आहे. आपण ३० पैकी अमूक जागा आम्ही जिंकणार असे सांगून इतर उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणे योग्य नाही. त्यामुळे आपण तीसपैकी तीस जागा जिंकणार असे सांगत सर्वांमध्ये विश्वास निर्माण केला, असे बाबूश यांनी नमूद केले.
कुटुंबावर झालेल्या टीकेवर ते म्हणतात, आम्ही सर्वजण जनतेतून निवडून आलो आहोत. लोकांनी आम्हांला मतदान करून निवडले आहे, आपण काही बुथ हायजॅक करून जिंकलो नाही. मी कधीही लोक आपल्याबद्दल काय म्हणतात याचा विचार करीत नाही. लोकांना जर आमच्याविषयी काही वाटत असल्याशिवाय ते निवडून देतात काय, असाही सवाल बाबूश यांनी केला.
कॅसिनोंवर बाबूश म्हणाले, कॅसिनोंमुळे वाहतूक कोंडी होते, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. खरेतर वाहतूक कोंडी होऊ नये, पार्किंगची समस्या सोडवण्याचे वाहतूक पोलिसांचे काम आहे. या कामासाठी वाहतूक पोलिस खात्यात कर्मचारी संख्या कमी असेल तर आपण त्याविषयी मुख्यमंत्र्यांकडे बोललो आहे. त्याचबरोबर मांडवीतून कॅसिनो हटले जातील काय, यावर त्यांनी शक्य आहे, कारण २०२७ मध्ये त्यांचा लीज करार संपुष्टात येईल.
मांडवी नदीतील कॅसिनोसाठी समस्या सोडविण्यासाठी काही उपाय योजना आवश्यक आहेत. त्याबाबत सरकारने त्वरित योग्य धोरण तयार केल्यास, त्यानुसार ते काही अंतरावर नेले जाऊ शकतात, असेही यांनी नमूद केले. या मुलाखतीत बाबूश यांनी स्मार्ट सिटीच्या विविध कामांविषयी, टीसीपी कलम ‘३९-ए‘ या विषयावरही त्यांनी आपले मत मांडले.
रोहित मोन्सेरात यांना २०२७ मध्ये कोणत्यातरी मतदारसंघातून आमदार होईल, हा आपणास विश्वास आहे. आपल्या त्याला शुभेच्छा आहेत आणि लोक त्याविषयी निर्णय घेतील. आपल्याला पूर्ण आत्मविश्वास आहे की, रोहित आमदार होईल. तो विधानसभेची निवडणूक लढवणार आहे आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवेल, याचा निर्णय पक्ष घेईल, असे बाबूश यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.