पणजी: राज्यात गाजलेल्या फुटबॉल मॅच फिक्सिंगप्रकरणी नैतिकता अधिकाऱ्याच्या अहवालानंतर गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) १३ खेळाडू व एक अधिकारी मिळून १४ जणांना सर्व प्रकारच्या फुटबॉलमधून निलंबित केले आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलिस गुन्हे शाखा करेल, अशी माहिती ‘जीएफए’ अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘जीएफए प्रोफेशनल लीग’ स्पर्धेतील संघ शापोरा युवक संघाचे पदाधिकारी प्रवीण दाभोळकर यांनी ‘मॅच फिक्सिंग’मध्ये खेळाडू गुंतल्याची तक्रार जीएफएकडे केली होती.
त्याची दखल घेत जीएफएने निवृत्त पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय नैतिकता समितीमार्फत चौकशी करण्यात आली. समितीने अडीचशे पानी अहवाल सादर केल्यानंतर जीएफए व्यवस्थापकीय समितीने संबंधित खेळाडूंना पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत फुटबॉलमधून निलंबित करण्याचे ठरविले, अशी माहिती कायतान यांनी दिली.
निलंबित खेळाडूंत पोलिसाचाही समावेश
कायतान यांनी सांगितले की, निलंबित १४ जणांत १३ फुटबॉलपटू असून एकजण खेळाडू-अधिकारी आहे. त्यापैकी मौझान शेख हा राज्य पोलिस दलातील असून, मॅच फिक्सिंग प्रकरणी त्याने पुढाकार घेतल्याचे नैतिकता चौकशी समितीला आढळून आले. डिसेंबर २०२५ मध्ये नैतिकता समितीने चौकशीस सुरुवात केली. आता सप्टेंबरमध्ये दहा महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, असे जीएफएचे उपाध्यक्ष जोनाथन डिसोझा यांनी सांगितले.
फातोर्डा स्टेडियम फक्त फुटबॉलसाठीच हवे: हल्लीच गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) महेश देसाई यांनी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम राज्य सरकारने क्रिकेटसाठी जीसीएकडे द्यावे, अशी मागणी केली होती. त्याला जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी विरोध केला आहे. हे स्टेडियम राज्यातील एकमेव आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम असून, त्याचा क्रिकेटसाठी वापर होऊ नये. जीसीएपाशी स्वतःचा पुरेसा निधी आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःचे स्टेडियम बांधावे, असे कायतान यांनी सांगितले.
मॅच फिक्सिंग २०१८-२०२२ मध्ये फोफावले
जीएफए उपाध्यक्ष जोनाथन यांच्यानुसार, २०१५-१६ पासून राज्यातील फुटबॉलमध्ये मॅच फिक्सिंगच्या तक्रारी येत होत्या, तर २०१८ ते २०२२ या कालावधीत खेळातील ही कुप्रथा अधिकच फोफावली. मागील समितीने याकडे काणाडोळा केला. आमच्या समितीने २०२२ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर मॅच फिक्सिंग प्रकरण गांभीर्याने घेतले आणि त्यानंतर अशा तक्रारी खूपच कमी झालेल्या आहेत.
नावे अशी...
रोहन पेडणेकर, आकाश कुडणेकर, आकाश सनदी, भास्कर जल्मी, कृष्णनाथ शिरोडकर, विनायक राणे, चैतन दाभोळकर, सचिदानंद साटेलकर, अमन गोवेकर, मिनेश कुंकळकर, सतीश काणकोणकर, मौझान शेख, सूरज हडकोणकर, रोनाल्डो ऑलिव्हेरा.
सामन्यांच्या निकालावर प्रभाव टाकण्याचे प्रकार आणि मॅच फिक्सिंग हे फुटबॉलसाठी घातक असून अशा प्रकारच्या गैरकृत्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा मिळता कामा नये. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही संबंधितांमध्ये जागृती करण्याबरोबरच विविध कार्यशाळांचे आयोजन करत आहोत.
- कायतान फर्नांडिस, अध्यक्ष- जीएफए
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.