लोलीये: दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात हरित प्रकल्पाच्या रूपाने फिल्मसिटी प्रकल्प आणण्याचे निश्चित झाले आहे. लोलये भगवती पठारावर आयआयटी प्रकल्प आणण्याचा प्रस्ताव चुकीच्या धोरणामुळे मागे पडला पण आता काणकोण तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकल्पाला लोलये कोमुनिदाद संस्था व लोलये पंचायतीने हिरवा कंदिल दाखवला आहे. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर गोव्यातील फिल्म सिटी उभारली जाणार आहे.
फिल्मसिटी निर्माण करणाऱ्या संस्थेने या उपक्रमामुळे काणकोण परिसरात पाच हजार रोजगार उपलब्ध होतील, असा दावा केला आहे, तर गोव्यात सुरु होणाऱ्या फिल्म सिटीमुळे किमान तीन हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी सांगितले.
येत्या दोन वर्षात या प्रकल्पाला सरकार व खाजगी कंपनीतर्फे सुरूवात करण्यात येणार आहे. काणकोण तालुक्यातील युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रदूषण विरहीत प्रकल्प काणकोणात येणे गरजेचे आहे, असे सभापती तवडकर यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील काणकोणमधील लोलीये या गावात सुरु होणाऱ्या फिल्मसिटी प्रकल्पावर वक्तव्य केले होते. या प्रकल्पामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही तर हा प्रकल्प ५५० पेक्षा अधिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल असे मुख्यमंत्री म्हणाले होते आणि म्हणूनच गोव्याच्या उज्वल भवितव्यासाठी या प्रकल्पाला समर्थन करावे असे आवाहन काणकोणमधील रवींद्र भवनाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांनी केले होते.
गोव्यात उभी राहणारी ही फिल्म सिटी प्रख्यात गायिका स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने ओळखली जाईल, तसेच फिल्मसिटीमधल्या सभागृहाला काणकोणचे माजी मंत्री संयज बांदेकर यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मुख्यमंत्री, सभापती डॉ. रमेश तवडकर आणि इतर सदस्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर बांधणीसाठी आवश्यक मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.