Lok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: दक्षिण गोव्यात भाजपची मोर्चेबांधणी, काँग्रेसची रणनीती मात्र गुलदस्त्यात

गोमन्तक डिजिटल टीम

Lok Sabha Election लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी उत्कंठाही वाढू लागली आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरणार असून येथे जिंकण्याकरिता भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

गेल्यावेळी हा मतदारसंघ अवघ्या 9 हजार मतांनी हुकल्यामुळे भाजपला हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा ठरला आहे. या मतदारसंघात सासष्टीचे आठ मतदारसंघ येत असल्यामुळे भाजपला कडव्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.

नावेली मतदारसंघ भाजपकडे असला तरी लोकसभा निवडणुकीत तो भाजपसोबत राहील, याची शाश्‍वती नाही. सावर्डे-कुडचडे, केपे, काणकोण, सांगे हे मतदारसंघही भाजपच्या दृष्‍टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.

यापैकी चार मतदारसंघांत भाजपचे आमदार असून, येथे भाजप आघाडी घेईल, अशी शक्यताही वर्तविली जात असली तरी सांगोपांंग विचार केल्यास त्यांना परिस्थिती म्हणावी एवढी अनुकूल वाटत नाही.

सावर्डे मतदारसंघात गणेश गावकर हे आमदार असून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष दीपक पाऊसकर यांच्यावर जवळजवळ 5 हजार मतांनी विजय प्राप्त केला होता.

पाऊसकर माजी मंत्री असल्यामुळे त्यांचा या मतदारसंघावर बऱ्यापैकी प्रभाव आहे. अजूनही त्यांची भूमिका स्पष्ट न झाल्यामुळे या मतदारसंघातील चित्र थोडे धूसर वाटतेे.

या मतदारसंघात काँग्रेस पक्ष बराच पिछाडीवर असून तो लोकसभेत बाजी मारेल, असे सध्या वाटत नाही. पण पाऊसकरांनी जर विरोधी पक्षाला पाठिंबा दिला तर चित्र थोडेफार पालटू शकते.

कुडचडे मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी काँग्रेसचे अमित पाटकर यांच्यावर केवळ ६७२ मतांनी विजय प्राप्त केला होता.

आताही जुने व नवे भाजप कार्यकर्ते यांच्यात धुसफूस असल्यामुळे त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला होऊ शकतो.

गेल्या विधानसभा निवडणुकीत केपे मतदारसंघात काँग्रेसचे एल्टन डिकॉस्ता यांनी माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यावर 3 हजार मतांनी विजय प्राप्त केला होता. त्यामुळे येथेही काँग्रेस वर्चस्व प्राप्त करू शकतो.

यदाकदाचित दक्षिण गोव्यात भाजपची उमेदवारी बाबू कवळेकर यांना प्राप्त झाली तर स्थानिक उमेदवार म्हणून त्यांच्या पारड्यात या मतदारसंघातील मते पडू शकतात. सांगेत भाजपचे सुभाष फळदेसाई यांनी अपक्ष उमेदवार बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांच्यावर १,५०० मतांनी विजय प्राप्त केला होता.

यावेळी सुभाष भाजपला आघाडी मिळवून देऊ शकतात; पण सावित्री कवळेकर यांचीही या मतदारसंघात चांगली ‘शक्ती’ असल्यामुळे त्या कोणती भूमिका घेतात, यावर भवितव्य ठरणार आहे.

काणकोण मतदारसंघात सभापती रमेश तवडकर हे भाजपचे आमदार असल्यामुळे त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो;

पण या मतदारसंघात कॉंग्रेसने तयारी सुरू केली असल्याची माहिती प्राप्त झाली असून गेल्या विधानसभा निवडणुकीतील त्यांचे उमेदवार जनार्दन भंडारी हे आता सक्रिय झाल्यामुळे ते कॉंग्रेस उमेदवाराला आघाडी मिळवून देऊ शकतात की काय, हे बघावे लागेल.

पण एकंदरीत हे पाचही मतदारसंघ भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. याचे कारण म्हणजे सासष्टीमध्ये मिळू शकणारी पिछाडी या मतदारसंघात भाजपला भरून काढावी लागणार आहे.

त्याकरिता या पाचही मतदारसंघांवर भाजपला लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. या पाच मतदारसंघांतून किती आघाडी मिळू शकते, यावर भाजपचे दक्षिण गोव्यातील विजयाचे समीकरण अवलंबून असेल.

काँग्रेस पक्ष ‘सुशेगाद’

दक्षिण गोवा मतदारसंघ हा अजूनही काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो. पण 2014 साली भाजपचे नरेंद्र सावईकर यांनी हा मतदारसंघ जिंकला होता. मात्र 2019 साली कॉग्रेसने बाजी उलटविली होती.

आता यावेळी कॉग्रेसने इतर विरोधी पक्षाशी युती केल्यास ते भाजपला धोबीपछाड देऊ शकतात, असा होरा राजकीय विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

पण सध्या तरी कॉंग्रेस पक्ष सक्रिय झालेला नसल्याने त्यांची रणनीती स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे त्यांचे यशापयश हे त्यांच्या रणनीतीवर अवलंबून असणार, एवढे निश्‍चित.

तानावडेंची भूमिका महत्त्वाची

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे या पाच मतदारसंघांत किती सक्रिय होतात, यावरही भाजपचे यशापयश अवलंबून असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या साखळी व फोंडा पालिका निवडणुकीत तानावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

स्वतः फिरून काही विरोधात जाऊ शकणारे प्रभाग त्यांनी भाजपकडे खेचून आणले होते. आता हीच भूमिका त्यांना या मतदारसंघात बजावावी लागेल.

सध्या ते राज्यसभा निवडणुकीचे भाजपचे उमेदवार असल्यामुळे त्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर ते या मतदारसंघावर किती लक्ष देतात, त्यावर अनेक समीकरणे अवलंबून असणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT