सासष्टी: गोव्यात ख्रिसमसची तयारी सुरू झाली असताना अंड्यांची किंमत मात्र गगनाला भिडली आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी अंड्यांची ७० ते ७२ रुपये प्रतिडझन अशी विकली जायची. एका महिन्यापूर्वी तो दर ८० रुपये प्रतिडझन असा होती. सध्या मात्र अंड्यांच्या किमतीत दहा रुपयांनी वाढ झाली असून प्रतिडझन ९० रुपये अशी बाजारात विकली जात आहेत.
गोव्यात अंड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यासाठी गोव्याला कर्नाटक व महाराष्ट्रावर विसंबून राहावे लागते. महाराष्ट्रातून ८० टक्के तर कर्नाटकहून २० टक्के अंड्यांची आयात होत असते. आता अंड्यांना विदेशात व इतर राज्यांत मागणी वाढल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील विक्रेते अंडी तिथे निर्यात करतात. त्यामुळे गोव्यात अंड्यांचे वितरण गरजेपेक्षा कमी होत आहे, असे अखिल गोवा पोल्ट्री ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयकृष्ण नाईक यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारतर्फे अंड्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवले जात नाही. तसे करणे सरकारच्या नियमाबाहेर आहे, असे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ज्यावेळी मासळी उपलब्ध होत नाही, त्यावेळी अंडी खाण्याकडे खवय्यांचा जोर असतो. विविध प्रकारचे खेळ खेळणारे आणि व्यायामपटू अंडी सेवनावर भर देतात.
ख्रिसमसमुळेही वाढते मागणी
गोव्यात जवळ जवळ सात ते आठ लाख अंड्यांची मागणी दररोजची आहे. हिवाळ्यात खासकरून ख्रिसमसच्या दिवसांत अंड्यांची मागणी वाढते. हिवाळ्यात कोंबड्या जास्त प्रमाणात अंडी देत नाहीत, हे अंडी महाग होण्यामागचे आणखी एक कारण असल्याचे नाईक यांचे म्हणणे आहे.
रॉयल फूड्सचे मालक मारियो वालादारीस यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात ख्रिसमसमध्ये केकसाठी अंड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. शिवाय इतर खाद्यपदार्थांतही अंडी वापरली जातात. या मोसमात अंडी महाग होणे हे वार्षिक आहे. दर आणखी वाढल्यास कोणाला नवल वाटू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.