पर्वरी: सध्या देशात आयपीएलचा हंगाम सुरु आहे. भारतात क्रिकेट हा एक वेगळाच धर्म असल्याने आयपीएल म्हटलं की चाहत्यांमध्ये उत्साह संचारतो. मात्र क्रिकेटच्या या महामुकाबल्यात अनेकवेळा सट्टेबाजेसारखे बेकायदेशीर प्रकार घडतात. आयपीएल २०२५ च्या रोमांचक सामन्यांवर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या दोघांना पर्वरी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.
गोवा पोलिसांकडून ही कारवाई शुक्रवारी (दि.३ एप्रिल) रात्री सुमारे रात्री पावणे अकराच्या सुमारास बार्देश तालुक्यातील सुकुर्रो येथील राघव्हन ग्रीनमधील लुसिताना येथील सी-२ व्हिला येथे करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हेमचंद्र तळकर, पोलीस उपनिरीक्षक, पर्वरी पोलीस ठाणे यांनी शनिवारी (दि. ४ एप्रिल) याबाबत तक्रार दाखल केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गोर जिग्नेशकुमार अश्विनभाई (वय ४६ वर्षे, रा. खेड़ा, गुजरात) आणि झाला किशांकुमार जयंतीभाई (वय २९ वर्षे, रा. खेड़ा, गुजरात) अशी आहेत. हे दोघेही लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू असलेल्या टी-२० टाटा आयपीएल २०२५ क्रिकेट सामन्यांवर मोबाईल फोन आणि ऑनलाईन माध्यमातून सट्टेबाजी स्वीकारताना पोलिसांना आढळले.
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि इतर उपकरणे असा सुमारे ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आकाश चोडणकर हे पोलीस निरीक्षक राहुल परब, पर्वरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी पर्वरी विश्वेश कर्पे आणि उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
गुजरात राज्यातील हे दोन तरुण गोव्यात आयपीएल सट्टेबाजीचा अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे गोव्यातील बेकायदेशीर सट्टेबाजीच्या नेटवर्कला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या मागील कनेक्शन आणि या सट्ट्याच्या नेटवर्कमध्ये आणखी कोण सहभागी आहे, याचा शोध घेत आहेत. आयपीएलच्या धामधुमीत सट्टेबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, अशा गैरकृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.