Goa Congress |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics Latest News: काँग्रेसमध्ये डबल कमांड? 'खरी कुजबुज'

हल्‍लीच आठ फुटीर आमदारांच्या विषयावर देखील गोंधळ निर्माण झाला

दैनिक गोमन्तक

Goa Politics: गोवा प्रदेश काँग्रेसमध्ये होत असलेल्या सध्‍याच्‍या घडामोडी पाहता आजी-माजी प्रदेशाध्यक्षांमध्ये या संघटनेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असल्‍याचे निरीक्षण नागरिकांकडून नोंदविले जात आहे. कोणताही ज्वलंत विषय असो किंवा पक्षाचे कार्यक्रम, माजी प्रदेशाध्यक्ष त्वरित आपण सक्रिय असल्याचे भासवून देताहेत.

हल्‍लीच आठ फुटीर आमदारांच्या विषयावर देखील असाच गोंधळ निर्माण झाला. नंतर आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांना सारवासारव करावी लागली. परंतु हा प्रकार कधीपर्यंत चालणार, हा प्रश्‍‍नच आहे.

आमदारांना ग्रामसभेत मज्जाव

नगरपालिकांची बैठक किंवा पंचायतींच्‍या ग्रामसभांना त्‍या-त्‍या मतदारसंघातील आमदार क्वचितच उपस्थित राहतात. वास्‍तविक त्‍यांनी उपस्‍थिती लावली तर या संस्‍थांसमोरील अडचणी, समस्‍या त्यांना प्रत्यक्ष कळू शकतात.

सभापती असलेले काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी आपल्‍या मतदारसंघात तसा उपक्रमही सुरू केला आहे. पण सांत-आंद्रेतील ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांना मात्र वेगळाच अनुभव आला.

कुडका ग्रामसभेत त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता काहींनी ते मतदार नसल्याचा मुद्दा उपस्थित करून त्‍यांना रोखले. त्यामुळे विचित्र स्‍थिती निर्माण झाली. ते त्या पंचायत क्षेत्रातील मतदार नसले तरी त्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत ना, असा युक्तिवाद त्यांचे समर्थक करत आहेत.

दातखिळी का बसली?

विषय कितीही गंभीर असो, तो हसण्यावारी नेण्यात वा त्याची खिल्ली उडविण्यात आमचे रवीबाब पटाईत आहेत. मुख्यमंत्री वा मंत्री या नात्याने विधानसभेत एखाद्या प्रश्नावर उत्तरे देताना ते इतके पाल्हाळ लावतात की प्रश्‍‍नकर्त्याची स्थिती ‘झक मारली आणि प्रश्‍‍न विचारला’ अशी होते.

पत्रकारांचीही फिरकी घेण्यात तरबेज असलेले रवी पात्रांव नागरीपुरवठामंत्री असतानाही या खात्यातील धान्य घोटाळ्‍याबाबत तोंड उघडत नसल्याने तो सार्वजनिक चर्चेचा विषय ठरला आहे. या घोटाळ्‍यात जो कोणी गुंतलेला आहे, तो पात्रांवाला जवळचा आहे असे सांगण्यात येतेय, त्यात तथ्य तर नसावे ना?

सुंठीवाचून खोकला गेला

गोवा सरकारने आयआयटीसाठी सुचविलेली सांगेतील जागा केंद्र सरकारने ती अपुरी असल्याने तसेच हरितपट्टयात मोडत असल्याचे कारण पुढे करून नाकारली आहे. या राष्ट्रीय संस्थेचे गोव्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ अजून संपलेले नाही असे सर्वसामान्यांना वाटत असले तरी सरकारला मात्र सुंठी वाचून खोकला असेच वाटत असावे.

सांगेत या प्रतिष्ठेच्या प्रकल्पाबाबत जो असंतोष निर्माण झाला होता व विरोधी पक्ष त्यात तेल ओतण्याचे जे काम करत होते, त्यामुळे सरकारने सध्या सबुरीची भूमिका घेतली होती. केंद्राच्या नकारामुळे दोतोर मुख्यमंत्री यांचा जीव आता निश्चितच भांड्यात पडला असेल. सुभाषबाब मात्र अजूनही आयआयटीसाठी पूर्वीच्याच जोमाने हातपाय मारणार काय, तेही पाहावे लागेल.

पाकलो आणि दुर्गादास एकत्र?

राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही. चर्चिल आलेमाव यांचे हे परवलीचे वाक्य. काही दिवसांपूर्वी भाजपवासी झालेले नगरसेवक सदानंद नाईक ऊर्फ ‘पाकलो’ आणि गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे असलेले पाहून चर्चिल यांच्या या वाक्‍याची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.

पूर्वी या पाकल्याला ‘विजयचा माणूस’ म्हणून ओळखले जायचे. आता तो ‘दामूचा माणूस’ झाला आहे. मात्र त्याने मडगाव नगराध्यक्षपदासाठी जो दावा केला होता, त्यास भाजप नेतृत्वाने वाटाण्याच्या अक्षता दाखविल्‍यावर पाकलो नाही म्हटला तरी नाराज आहे.

मागच्या सत्ताबदलात गोवा फॉरवर्डचा एक पाकलो (राजू नाईक) याला भाजपने फोडून नेल्यावर भाजपच्या या पाकल्याला गोवा फॉरवर्डने तर फोडले नसावे ना?

कमिशन पे चर्चा

सरकारी तिजोरीत खणखणाट आहे व कामे करण्यासाठी सरकारकडे निधी नसल्याचा आरोप होत आहे. गोवा फॉरवर्डने तर राज्‍याच्‍या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढण्‍याची मागणी केली आहे.

दुसरीकडे अनेक मंत्री कोटी कोटींची उड्डाणे करत आहेत. त्यात वीज, जलस्रोत व अन्य मंत्री आघाडीवर आहेत. सरकारच्‍या अनेक घोषणांबाबतही लोकांमध्ये संभ्रम आहे. खरेच या योजना साकारणार की त्या केवळ घोषणा आहेत, अशी विचारणा ते करीत आहेत. तर, अनेकांचा दावा आहे की, अशा घोषणा केवळ कमिशनासाठी होत असतात.

कारण जेवढा खर्च जास्‍त, तेवढे कमिशन जास्‍त हे ठरलेले असते. आता त्यात तथ्य किती ते संबंधित मंत्री व देणारा कंत्राटदारच जाणो.

जीत आरोलकरांची प्रतिज्ञा अन्‌ म्‍हापसा रवींद्र भवनचे दुखणे

मागील अनेक वर्षांपासून म्हापशातील लोक रवींद्र भवनाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक निवडणुकीवेळी हे भवन उभारण्याचे आश्वासन मिळते, मात्र त्यासाठी विशेष प्रयत्न होताना काही दिसत नाहीत.

अशातच, आता मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी नुकतेच एक वक्तव्य केले आहे की, येत्या सहा महिन्यांत मांद्रेत रवींद्र भवनाची पायाभरणी करणार. एकीकडे पहिल्यांदाच निवडून आलेले लोकप्रतिनिधी वेळमर्यादा देऊन रवींद्र भवन उभारण्याची ग्वाही देतात तर दुसरीकडे म्हापशात तसे काही होताना सध्या तरी दिसत नाहीय.

आता मांद्रेत खरोखरच रवींद्र भवन उभे राहते की नाही, हे पाहावे लागेल. अशावेळी म्हापशातील प्रलंबित असलेला हा रवींद्र भवनाचा विषय मांद्रेपूर्वी सोडवला जातो की म्हापसेकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागते, हे येणारा काळच सांगेल.

लक्ष्मणसरांचे ते स्वप्न पूर्ण कधी होणार?

‘वक्त से पहले और किस्मत से जादा किसिको कुछ नही मिलता’ हे बोधवाक्य आपण ऐकलेच असेल. कुंकळ्‍ळी नगरपालिकेत तीन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेले लक्ष्मण नाईक यांचे नगराध्यक्ष बनण्याचे स्वप्न युरी आलेमाव यांच्या आशीर्वादामुळे अखेर उतारवयात पूर्ण झाले.

मात्र आपल्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत कुंकळ्‍ळी नगरपालिकेचे नव्या इमारतीत स्थलांतरण करण्याचे लक्ष्मण सरांचे स्वप्न पूर्ण होणार का, याबाबत साशंकताच आहे. पालिका कार्यालय नव्या इमारतीत नेण्यासाठी इमारत तयार आहे.

मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांना वीजजोडणी व नवीन फर्निचर घेण्यासाठी वेळ नाही म्हणून पालिका अजूनही मोडक्या कार्यालयातच चालते. ज्या कूर्मगतीने पालिका नव्या इमारतीत नेण्याचे काम सुरू आहे, ते पाहिल्यास लक्ष्मणरावांचे स्वप्न स्वप्नच उरणार असे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT