Goa Tourism Canacona Railway: येथील नागरिकांच्या मागणीनुसार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर नेत्रावती व गांधीधाम या दोन लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय दूर झाली असून येथील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केला.
नागरकोयल-गांधीधाम रेल्वेला काणकोण रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखविल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, गोवा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष शंभा नाईक देसाई, भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, काणकोण ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष गिलेर्म मार्टिन्स, कोकण रेल्वेचे ज्येष्ठ अधिकारी निकम व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोना काळात काणकोण स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आला होता. काणकोणवासीयांनी त्या रेल्वेंना पूर्ववत थांबा देण्याची मागणी लावून धरली होती. याबाबत रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करण्यात आला.
मात्र, बोर्डाने तिकीटांच्या उलाढालीचा मुद्दा पुढे करून मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे कळविले होते, असे रेल्वेचे अधिकारी निकम यांनी सांगितले. पण सभापतींमुळे हा प्रश्न मार्गी लागला, असे ते म्हणाले.
रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
सध्या तिकीट आरक्षण काणकोण पोस्ट ऑफीसमध्ये सुरू करण्यात आले आहे. मात्र, तिथे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने नागरिकांना रेल्वे तिकीट आरक्षणासाठी अनेक वेळ ताटकळत उभे रहावे लागते.
ही बाब सभापतींनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत रेल्वे स्थानकावरच तिकीट आरक्षणाची सोय करण्याची सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना केली
मत्स्यगंधा रेल्वेलाही थांबा!
सभापती तवडकर, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, शंभा नाईक गावकर यांनी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काणकोण स्थानकावर तीनपैकी दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार रविवारी त्रिवेंद्रम नेत्रावती एक्स्प्रेस रेल्वेने येथे थांबा घेतला. मत्स्यगंधा रेल्वेलाही थांबा देण्याच्या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सभापतींनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.