Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; नेत्यांचे फोटोसाठी काम

Khari Kujbuj Political Satire: गोवा फॉरवर्ड पक्ष जिल्हा पंचायत निवडणुकीत सुद्धा उतरणार आहे, असे संकेत मिळत आहेत. रुमडामळ-दवर्ली येथे या पक्षाने रणशिंग फुंकले आहे.

Sameer Panditrao

नेत्यांचे फोटोसाठी काम

संपूर्ण राज्यातील रस्त्यांवरचे खड्डे ‘जैसे थे’ आहेत, पण नेत्यांच्या आश्वासनांची मालिका मात्र थांबायला तयार नाही. सुरुवात झाली ती गणेश चतुर्थी पूर्वी खड्डे बुजणार म्हणून. मग ते काम पुढे ढकलले गेले आणि आश्वासने मिळाली की दिवाळीपूर्वी रस्ते चकाचक होतील. पण आता तर कहर झाला! हेच काही नेते चक्क, डिसेंबरपूर्वी राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवून टाकणार, असे सांगायला लागले आहेत. म्हणजे यांचा अजेंडा स्पष्ट आहे. काम कमी आणि बोलबच्चनगिरी जास्त! यावरून एक गोष्ट सिद्ध होते. या नेत्यांचे काम लोकांसाठी नाही, तर केवळ ‘फोटोसेशन’साठी आणि बातमी करण्यासाठी चालले आहे, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. रस्त्यांवर लोक मरत असताना, यांना केवळ आपल्या व्हिज्युअल पब्लिसिटीची चिंता आहे. खड्डे बुजवायला अख्खं वर्ष का लागतंय? की हे खड्डे नेत्यांना आपल्या आश्वासनांचे फलक लावायला जास्त सोयीचे वाटतात? लोकांमध्ये मात्र आता याची चांगलीच चर्चा आणि संताप आहे. ∙∙∙

फॉरवर्डमुळे निवडणुकीत रंगत!

गोवा फॉरवर्ड पक्ष जिल्हा पंचायत निवडणुकीत सुद्धा उतरणार आहे, असे संकेत मिळत आहेत. रुमडामळ-दवर्ली येथे या पक्षाने रणशिंग फुंकले आहे. या निवडणुकीत गोवा फॉरवर्डतर्फे एन्थनी कुलासो उमेदवार असण्याची शक्यता सुद्धा बोलली जात आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालावरून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे भवितव्य ठरणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र जिल्हा पंचायत निवडणुकीत गोवा फॉरवर्ड, काँग्रेस, भाजप, आम आदमी या पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले, तर मात्र नेमका कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला चांगली संधी आहे, हे सांगणे कठीण होणार आहे. मात्र या परिस्थितीत भाजपची स्थिती बॅकफूटवर येण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. नंतर त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीवर उमटतील अशी भितीसुद्धा भाजप कार्यकर्ते उघडपणे व्यक्त करू लागले आहेत. ∙∙∙

अशी कारवाई सुरूच रहावी!

पर्वरी पोलिस स्थानकाच्यावतीने सध्या या परिसरात मध्यरात्री वाहनधारकांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणी मोहिमेचे नागरिकांतून स्वागत होऊ लागले आहे. शनिवारी रात्री बेतीम वाळकेश्वरवाडा येथे ‘रोको ठोको’ मोहीम राबविली गेली म्हणे. पोलिस उपनिरीक्षक सचिन शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने हा उपक्रम राबविला. त्यामुळे या मार्गावरून जाणारे दोन बाईकस्वार पोलिसांना पाहताच आपले वाहन तिथेच टाकून पळाले. पोलिसांनी ते वाहन ताब्यात घेतले असून, दुचाकीमालकाचा तपास सुरू आहे. शनिवारी पोलिसांनी जवळपास २० ते ३० दुचाकीस्वारांची कसून चौकशी केली. या परिसरात रात्रीच्या वेळी अशा तपासणीची गरज आहे. परंतु सध्या रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या तपासणी मोहिमेत सहभाग घेतलेल्या अरविंद गवस, वरुण कोरगावकर व भिकाजी परब या पोलिसांचेही कौतुक करायला हरकत नाही. ∙∙∙

राज्य सरकार आयआयटीबद्दल गंभीर आहे?

‘हाणीर आसा चेडो आनी सोदता सगळो वाडो’ अशी कोकणीत एक म्हण आहे. राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून ‘आयआयटी’ कॅम्पससाठी जागा शोधत आहे. काणकोणपासून सत्तरी आणि सत्तरीपासून सांगेपर्यंत आणि सांगेपासून शिरोडा मतदारसंघातील कोडारपर्यंत सरकारने प्रयत्न केले, मात्र जनतेने आयआयटी प्रकल्पाला तीव्र विरोध केला. कुंकळ्ळीत एनआयटी कॅम्पस स्थापन झाल्यानंतर जनता आपल्याच जागेवर कशी पोरकी झाली व स्थानिकांऐवजी बाहेरच्यांना नोकऱ्या व एनआयटीत जागा मिळाल्या, हा अनुभव घेऊन जनता आता नकोच ती ‘आयआयटी’ म्हणायला लागली आहे. आता सरकार पुढे पर्याय उरला आहे, तो बेतूल येथील सरकारी जागेचा सरकार जर आयआयटीसाठी खरेच गंभीर असेल, तर जिथे विरोध नाही, ती बेतूलची जागा योग्य नाही काय? या बाबत चर्चा सुरू आहे∙∙∙

कोटी कोटींची उड्डाणे

गोवा सरकारातील मंत्र्यांकडून सध्या कोट्यवधींच्या खर्चाच्या घोषणा केल्या जात आहेत, पण त्या करताना वित्त खात्याचा सल्ला घेतला जातो, की त्याबाबत मात्र प्रश्नच आहे. कारण असे अनेक प्रस्ताव यापूर्वी वित्त खात्याने फेटाळल्याची उदाहरणे आहेत. हल्लीच पेयजलमंत्र्यांनी राज्यांतील पिण्याच्या पाणीपुरवठा सुधारणेसाठी दोन हजार कोटींची गरज असल्याची केलेली घोषणा, अशाच प्रकारची म्हटले जाऊ लागली आहे. हल्लीच जायकामार्फत अशी योजना राबवून म्हणे अनेक जुन्या जलवाहिन्या बदलल्या आहेत, पण पुरवठा काही सुधारलेला नाही. तरीही सरकार प्रत्येकवेळी असे खर्चाचे नवनवे प्रस्ताव नेमके कोणत्या हेतूने बाहेर काढते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ∙∙∙

खड्डा संस्कृती!

पर्वरीत रुग्णवाहिका खड्ड्यात पडण्याची घटना म्हणजे गोव्याच्या ‘खड्डा संस्कृती’चा कळस आहे. साधी रुग्णवाहिका जर खड्ड्यातून सुरक्षित जाऊ शकत नसेल, तर सामान्य नागरिकांचे हाल काय असतील? लोकांना वेळेत उपचार मिळणार का? याला प्रशासन किंवा सरकार कानाडोळा करणार की चांगले रस्ते देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता सगळ्यांचे लक्ष सरकारच्या कृतीकडे आहे. फक्त तात्पुरती डागडुजी करतात की उत्कृष्ट दर्जाचे खड्डे बुजवून रस्त्याची कायमस्वरूपी समस्या सोडवतात? हे पाहण्यास अनेकांना रस आहे. खड्डे बुजले नाहीत, तर हे स्पष्ट होईल, की सरकारला लोकांच्या सोयीपेक्षा आणि आरोग्यापेक्षा बाकीच्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. आता लोकांच्या मनातील हा संशय कितपत खरा आहे हे लवकरच समजेल. ∙∙∙

पत्र तयार करणारे कोण?

अमित पाटकर यांना प्रदेशाध्‍यक्षपदावरून हटवून त्‍यांच्‍या जागी पुन्‍हा माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांची वर्णी लावण्‍याचा विचार काँग्रेस श्रेष्‍ठींकडून सुरू असल्‍याची चर्चा सुरू झाल्‍यानंतर गिरीश समर्थकांमध्‍ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पाटकरांना हटवण्‍याची हीच वेळ असल्‍याचे ठरवून त्‍यांनी आता पत्रही तयार केले आहे. पाटकरच प्रदेशाध्‍यक्षपदी राहिल्‍यास आगामी निवडणुकांत काँग्रेसला यश मिळणार नसल्‍याचे म्‍हणत, पाटकर यांना तत्‍काळ न हटवल्‍यास सामूहिक राजीनामे देण्‍याचा इशाराही त्‍यांनी पत्रात दिल्‍याचे सूत्रांकडून समजते. राज्य कार्यकारिणीतील बहुतांशी पदाधिकाऱ्यांशी पाटकर यांनी जुळवून घेतलेले असतानाही पत्र तयार करणारे नेमके कोण आहेत? याचा शोध पाटकर समर्थकांकडून घेण्‍यात येत असल्‍याची चर्चा सुरू आहे. ∙∙∙

फर्मागुढी का नको?

काणकोण, सांगे, शेळ-मेळावलीनंतर कोडार येथील स्‍थानिकांनीही तीव्र विरोध दर्शवल्‍यामुळे सरकारने आयआयटी प्रकल्‍प कोडारमध्‍ये न उभारण्‍याचा निर्णय घेतल्‍याचे मंत्री तथा शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी स्‍पष्‍ट केले. आयआयटी सध्‍या फर्मागुढीत सुरू आहे. त्‍याच भागात सुसज्ज आयआयटी कॅम्‍पस उभारण्‍यासाठी पुरेशी जागाही सरकारकडे आहे. त्‍यामुळे आयआयटी प्रकल्‍प तेथेच उभारा, असे मंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर अनेक वर्षांपासून सरकारला सांगत आहेत. तेथील बहुतांशी जनतेचा प्रकल्‍पाला पाठिंबाही आहे, असे असतानाही सरकार फर्मागुढीत प्रकल्‍प उभारण्‍यास का टाळाटाळ करीत आहे? असा सवाल अनेकांसमोर उभा राहिला आहे... ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Accident: एकामागोमाग 4 गाड्या धडकल्या! बाईकस्वाराला वाचवताना उडाला गोंधळ, खराब रस्त्यांमुळे मधोमध घसरला

Mobor: 'रात्रीचे 1.30 वाजलेले, समुद्रात बोट बुडत होती आणि... ', पेलेने सांगितली 27 मच्छीमारांना वाचवण्याची थरारक गोष्ट

Makahrotsav: शांतादुर्गेच्या मखरोत्सवाला उत्साहात प्रारंभ! भाविकांची गर्दी; कीर्तन रंगले

Goa Crime: भाडयाची फॉर्च्युनर, जंगलात बदलली नंबरप्लेट, आलिशान गाड्या चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; 2 परप्रांतीयांना अटक

Goa Dairy: गोवा डेअरीला 1 कोटीहून जास्त नफा! आर्थिक तूट काढली भरून; 100% अनुदानाची दूध उत्पादकांची मागणी

SCROLL FOR NEXT