
पर्वरी: पर्वरी मतदारसंघातील रस्त्यांची धोकादायक स्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी पर्वरी मतदारसंघाला भेट देताना तत्काळ तीन जेटपॅचर मशीन वापरून रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी भाजप सरकार सुरक्षित रस्ते उपलब्ध करून अपघात टाळण्यास कटिबद्ध असल्याचा दावा केला होता.
मात्र प्रत्यक्ष स्थितीने भाजप सरकारचे उघडेपण आणि खोटेपणा समोर आणला आहे. मोठमोठी आश्वासने देऊनही आज पर्वरीमधील रस्ते धोकादायक खड्ड्यांनी भरलेले आहेत. त्याहूनही वाईट म्हणजे जीव वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका देखील या खुनशी रस्त्यांवर सुरक्षित नाहीत. हे म्हणजे भाजप सरकारकडून झालेली मोठी निष्काळजीपणा आणि मानवी जीवनावरील गुन्हेगारी दुर्लक्ष असल्याचे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीने या परिस्थितीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. लोकांचे प्राण वाचवण्याऐवजी भाजप सरकार केवळ प्रसिद्धीसाठी लोकांचा पैसा उधळत आहे. पर्वरीचे आमदार मंत्री रोहन खंवटे हे देखील पर्वरीच्या जनतेला न्याय देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
काँग्रेस पक्ष पर्वरीचे आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्याकडून जबाबदारीची मागणी करतो आणि गोमंतकीयांचे जीव धोक्यात घालण्याबद्दल भाजप सरकारला थेट जबाबदार धरतो. गोव्याच्या जनतेला सुरक्षित आणि मोटारयोग्य रस्ते मिळायला हवेत, पोकळ आश्वासने आणि स्वस्त प्रसिद्धी नव्हे, असं अमरनाथ पणजीकर म्हणालेत.
अमरनाथ पणजीकर यांनी पुढे सांगितले की, पर्वरीपुरते मर्यादित नसून संपूर्ण गोवा राज्यभर रस्त्यांची स्थिती चिंताजनक आहे. उपरोधिक बाब म्हणजे, जेव्हा दिगंबर कामत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांनी खराब रस्त्यांची स्थिती दाखवण्यासाठी खड्ड्यांसमोर सेल्फी घेऊन आंदोलन केले होते.
आता सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी या समस्या सोडवण्यास काहीही केलेले नाही. यामुळे भाजपची दुहेरी भूमिका आणि जनतेवरील विश्वासघात स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.