Goa Politics: खरी कुजबुज; राजकारणातला नवा भाई

Khari Kujbuj Political Satire: चिंबलमध्‍ये सरकार उभारू पाहत असलेल्‍या प्रशासन स्‍तंभ आणि युनिटी मॉल या दोन प्रकल्‍पांना गेल्‍या काही दिवसांपासून स्‍थानिकांकडून विरोध सुरू आहे.
Goa Latest Political News
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

राजकारणातला नवा भाई!

भाई हे नाव वेगवेगळ्या अर्थाने घेतले जाते. राजकारण असो वा गुंडगिरी भाई या नावाला एक वेगळेच त्या क्षेत्रात वजन असते. गोव्यातील राजकारणात भाई पर्रीकर हे नाव आजही अगदी आदराने घेतले जाते. गोव्यात सध्या राजकारणात अनेक भाई असून या भाईंच्या मांदियाळीत आणखी एका नावाची भर पडली आहे, आणि ती म्हणजे नावेली मतदारसंघात राजकारणात सक्रिय असलेल्यासिद्धेश भगत यांची. हे सिद्धेशराव प्रत्यक्ष मैदानापेक्षा सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. या दिवसात ते सोशल मीडियावर पोस्ट टाकताना, आपल्या नावासमोर कंसात भाई हा शब्द टाकण्यास विसरत नाहीत बरे का! ∙∙∙

खरेच जमिनींवर‘डोळा’?

चिंबलमध्‍ये सरकार उभारू पाहत असलेल्‍या प्रशासन स्‍तंभ आणि युनिटी मॉल या दोन प्रकल्‍पांना गेल्‍या काही दिवसांपासून स्‍थानिकांकडून विरोध सुरू आहे. या प्रकल्‍पांमुळे या भागात असलेल्‍या आणि केंद्र सरकारने दलदलीचा प्रदेश म्‍हणून अधिसूचित केलेल्‍या तोयार तळ्याचे अस्तित्व नष्‍ट होईल. त्‍यामुळेच हे प्रकल्‍प नको, अशी भूमिका आंदोलन गोविंद शिरोडकर मांडत होते. पण, पत्रकार परिषदेत मात्र त्‍यांनी यावरून मंत्री रोहन खंवटेंना आरोपीच्‍या पिंजऱ्यात उभे केले. चिंबलमधील अनेक जमिनींवर मंत्री खंवटेंचा ‘डोळा’ आहे. त्‍यामुळेच ते मुख्‍यमंत्र्यांशी ‘गोड’ बोलून अनेक प्रकल्‍प चिंबलमध्‍ये आणत असल्‍याचा दावा त्‍यांनी केला. आयटी पार्क ते युनिटी मॉल हा प्रवास पाहता खरेच शिरोडकर यांच्‍या दाव्‍यात तथ्‍य असेल का? असा प्रश्‍‍न स्‍थानिकांसमोर उभा राहिला आहे.∙∙∙

रामा तोंड का उघडत नाही?

समाजकार्यकर्ते रामा काणकोणकर हे मूग गिळून गप्प बसले आहेत, अशी चर्चा समाजकार्यकर्ते करू लागले आहेत. डॉ. ऑस्कर रिबेलो यांनाही तसा प्रश्न पडला आहे. गेली अकरा दिवस रामा काणकोणकर गोमेकॉत आहे. विरोधकांच्या मागणीला मान देऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत लागलीच गोमेकॉत जाऊन आले. मुख्यमंत्री काणकोणकर यांना भेटले विचारपूस केली, त्यामुळे काणकोणकर कुटुंबही खूष झाले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार काणकोणकर यांना व्हीआयपी कक्षात हलवण्यात आले आहे आणि त्यांची योग्य बडदास्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबीय आणखी खूष झाले आहेत. राण काणकोणकर यांची सुरुवातीला पोलिस जबानी घ्यायला गेले होते, त्यावेळी त्यांना बोलता येत नव्हते. आज रामा काणकोणकर बोलू शकतात आणि जबानी देण्याइतपत त्यांची तबियत योग्य आहे, तरीही गेली काही दिवस त्यांनी तोंड उघडलेले नाही. विरोधी पक्षही कोणी याबाबत बोलताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांची शिष्टाई उपयुक्त ठरली, अशी चर्चा गोव्यात पत्रकारांमध्येही सुरू आहे. ∙∙∙

... कशाचा होणार विचार?

प्रदेश काँग्रेसमध्‍ये नेतृत्‍व बदलाच्‍या हालचाली सुरू असल्‍याच्‍या बातम्‍या वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केल्‍यानंतर पक्षांतर्गत खळबळ माजली आहे. प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांना हटवून त्‍यांच्‍याजागी माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांच्‍याकडे पुन्‍हा प्रदेशाध्‍यक्षपदाची धुरा देण्‍याचा विचार दिल्लीतील नेत्‍यांनी चालवल्‍याचे सूत्रांकडून समजते. पाटकर यांना नेतृत्‍वामध्‍ये आलेले अपयश, पक्ष संघटनेतील फूट आदींसारखी काही कारणे पाटकर यांना हटवण्‍यामागे असतील असेही बोलले जात आहे. पण, या सगळ्यात पक्ष पाटकरांची ही बाजू सोडून अर्थकारणाच्या बाजूचा विचार करेल, अशी चर्चा पक्षाच्‍या नेत्‍यांत सुरू आहे. ∙∙∙

गिरीश इन, पाटकर आऊट!

गोवा प्रदेश कार्यकारिणीत लवकरच बदल होणार असून गिरीश चोडणकर यांच्या गळ्यात पुन्हा एकदा प्रदेश अध्यक्षपदाची माळ घालण्यात येईल असे सांगितले जात आहे. गिरीश आल्यावर पाटकर यांची गच्छंती अटळ आहे. मात्र हा बदल कधी होणार हे अजून स्पष्ट होत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर गिरीश यांच्या पूर्वीच्या दोस्तांना हुरूप आलेला आहे. यापैकी एक म्हणजे सिद्धनाथ बुयाव हे त्यापैकी एक आहेत. गिरीश गोव्यात युवा काँग्रेसचे अध्यक्ष असताना सिद्धनाथ त्यांचे सरचिटणीस होते. त्या दोघांनी पोळे चेक नाक्यावर जाऊन ट्रक अडविल्याने त्यांच्यावर त्यावेळी खटलाही दाखल करण्यात आला होता. नंतर सिद्धनाथ काँग्रेसपासून थोडे दूर गेले. पण आता गिरीश चोडणकर अध्यक्ष होणार असे म्हटल्यावर सिद्धनाथचा हुरूप वाढणे साहजिकच. त्यांनी फेसबुकवर पोस्टही टाकलेली आहे. काँग्रेसचा षटकार, इन चोडणकार, आऊट पाटकर.∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'आप' युती करण्यास तयार, अमित पालेकरांचे मोठे विधान

मास्टरमाईंड कोण?

गोव्यात सध्या रामा काणकोणकर वरील प्राणघातक हल्ल्याची घटना चर्चेत आहे. त्यामुळेच या हल्ल्या मागील मास्टरमाईंड कोण? त्याबाबत तर्कवितर्क चालू आहेत. असाच काहीसा प्रकार विरोधी काँग्रेस पक्षातही चालू आहे. या पक्षाची खासियत म्हणजे तो सत्तेवर असो वा नसो, तो कधीच एकजिनसी नसतो. आता तर म्हणे प्रदेशाध्यक्षांना हटविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे अनेकांना हसू फुटले. कारण गेली अनेक वर्षे तो सत्तेपासून पारखा असल्याने एकंदर यंत्रणाच विस्कळीत झालेली आहे. ही विस्कळीत संघटना हवी कोणाला? काँग्रेस संघटनेचे नेतृत्व करायची खुमखुमी आहे, कोणाला? काँग्रेस संघटने तरी दुसरा कोणी दिसतो का? त्यामुळे नेतृत्व बदल मागणारा मास्टरमाईंड कोण? ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; कोकणीच्या नावाने इंग्रजी शाळा

... स्टेडियमचे उद्‍घाटन?

गोवा क्रिकेट असोसिएशन अजून क्रिकेट स्टेडियमसाठी जागा शोधत असताना, कमला प्रसाद यादव यांनी वेर्णा आयडीसीजवळ खासगी स्टेडियम उभारले आहे. ज्याची माहिती फार कमी लोकांना आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या स्टेडियमचे उद्‍घाटन ३० सप्टेंबरला होणार आहे. गुरुवारी एकदिवसीय विधानसभा अधिवेशनादरम्यान या गटाने आपल्या स्टेडियमची जाहिरात विधानसभा संकुलात केली. यावेळी आमदार व मंत्र्यांना हॅम्पर बॅग्स देताना ते दिसले. विचारल्यास सांगितलं की, एका आमदार आणि एका मंत्र्याच्या परवानगीने बॅग्स वाटण्यात आल्या. तसेच हा स्टेडियम आयडीसीच्या जमिनीने वेढलेले असून, स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्याबाबतचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मग जेव्हा प्रकरण न्यायालयात आहे, तेव्हा उद्‍घाटनास कशी परवानगी मिळाली? विधानसभा संकुलात जाहिरात कोणत्या आमदार किंवा मंत्र्यांचा या स्टेडियममध्ये वैयक्तिक स्वारस्य आहे? यावर लोक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com