Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; विजयचे एका दगडात अनेक पक्षी

Goa Latest Political News: मिराबाग बंधाऱ्याला लोकांनी विरोध केला. शेवटी सरकाराला झुकावे लागले. ते काम बंद करण्याची घोषणा झाली. त्या अगोदर युनिटी मॉलच्या विषयावर प्रचंड निषेध झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

विजयचे एका दगडात अनेक पक्षी!

राजकारणात आपण किती परिपक्व बनलेलो आहे, हे सरदेसाईंनी अखेरच्‍या दिवशी सत्ताधाऱ्यांना दाखवून दिले. संपूर्ण अर्थसंकल्‍पाला मान्‍यता मिळवण्‍याचा प्रयत्‍न मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करीत असताना इतर सहा आमदारांनी सभापतींसमोरील हौदात जाऊन गोंधळ घातला. त्‍यामुळे सभापतींनी त्‍यांना सभागृहाबाहेर काढले. परंतु, विजय मात्र आपल्‍या जागेवर शांतपणे उभे होते. गोंधळ कमी झाल्‍यानंतर संपूर्ण अर्थसंकल्‍पाला मान्‍यता न देता मुख्‍यमंत्र्यांनी पुढील चार महिन्‍यांसाठी लेखानुदान मंजूर करून घ्‍यावे आणि त्‍यानंतर पुन्‍हा अधिवेशन बोलवावे, अशी मागणी त्‍यांनी केली. त्‍याचवेळी त्‍यांनी ‘डाव’ साधत २०१३ मध्‍ये अशीच स्‍थितीत उद्‍भवलेली असताना माजी मुख्‍यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर यांच्‍याही निर्णयाची आठवण सभागृहाला करून दिली. एकाबाजूला केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच सरकार पुरवणी मागण्‍यांवरील चर्चेआधीच अर्थसंकल्‍प मंजूर करून घेत असल्‍याचे त्‍यांनी जनतेला दाखवून दिले, तर दुसऱ्या बाजूला सरकार विरोधकांवर कसा अन्‍याय करीत आहे, याचेही दर्शन घडवले. या कृतीतून विजयनी एका दगडात अनेक पक्षी मारल्‍याची चर्चा भाजपसह सर्वच पक्षांत सुरू आहे.∙∙∙

फुलले ऋतू आंदोलनांचे!

मिराबाग बंधाऱ्याला लोकांनी विरोध केला. शेवटी सरकाराला झुकावे लागले. ते काम बंद करण्याची घोषणा झाली. त्या अगोदर युनिटी मॉलच्या विषयावर प्रचंड निषेध झाला. सरकारने नमते घेतले म्हणजे घ्यावेच लागले. लोक रस्त्यावर येऊ लागले. जमीन रूपांतरण विषयावर टीसीपी ‘३९ अ’ नियमासंदर्भात लोकांचा क्षोभ मंत्र्यांच्या घराकडे चालून गेला. हे मोर्चा, ही ज्वालामुखीसारखी खदखद हे खऱ्या लोकशाहीचे लक्षण होय. कला अकादमीची कामाच्या दुरुस्तीची चौकशी सुरूच आहे. संपणार कधी कळत नाही. कलाकार रस्त्यावर आले. अधिकाऱ्यांनी नाटक स्पर्धेवेळी भ्रष्टाचार प्रकरणात नाक कापून घेतले. त्याची चौकशी गोठली असावी. नागेश खन्ना व राकेश खन्ना मात्र निर्धास्त असून फेसबूकवर फिडल वाजवत आहेत. सध्याचे दिवस आंदोलनांच्या ऋतूंचे. इराण आखातात युध्दाचा वणवा भडका पेटलाय. विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखीन नवऋतू मोर्चे- उठावाच्या बंडाच्या ज्वालारुपात दिसू शकतात. त्यांना फळं लागणारच झाडपिक्या नवमतांची! ∙∙∙

गोव्यातील लेखकांना द्राक्षे आंबट

केंद्रीय संस्कृती मंत्रालय व साहित्य अकादमी यांच्या तिढ्यामुळे डिसेंबरात घोषित व्हावयाचे पुरस्कार काल एकदाचे घोषित झाले. कोकणीचा साहित्य अकादमी पुरस्कार उडपी जिल्ह्यातील लेखक पारमेल यांना घोषित झाला. कर्नाटक, केरळच्या कोंकणी लेखकांना गोव्याचे लेखक फारसे ओळखत नाही ती गोष्ट अलाहिदा. असो. दहा पुस्तके शॉर्टलिस्टमधे होती ती यादी पारदर्शकपणे अकादेमीच्या संकेतस्थळावर दिली आहे. त्यात गोव्याच्या लेखकरावांची नावे आहेत. काही नावे मागील ५-६ वर्षे दिसतात. वर्षभर पराकोटीच्या उत्कंठेने जीवनाचे ईप्सित समजून पुरस्कारावर लक्ष केंद्रित करून असलेल्यांची हताशा समजण्यासारखी आहे. तीन परीक्षकांची नावेही संकेतस्थळावर आहेत. कला अकादमीच्या भजन स्पर्धेत चिंबलचा व डिचोलीचा असे दोन परीक्षक असल्यावर आम्हाला बक्षीस मिळणे कठीण, असे दक्षिणेचे कलाकार म्हणायचे. तसे काल पुरस्कार हुकलेले लेखक, दोन मंगळूरी परीक्षक असल्याने ‘कोमिनार’ होऊन असे होणारच, अशी खंत व्यक्त करताना दिसत होते. ∙∙∙

पणजीत ट्रिपल इंजिन

पणजी महापालिकेत भाजपप्रणीत बाबूश यांचे पॅनल सत्तेवर आल्याने काही लोकांना आता चर्चेसाठी वेगळाच मुद्दा मिळाल्यासारखे झाले आहे. आपले मुख्यमंत्री नेहमीच डबल इंजिन सरकारच्या गोष्टी तर करतातच, पण डबल इंजिनामुळे गोव्याचा चौफेर विकास झाल्याचे व आताही होणार असल्याचे म्हणतात. पण पणजीत भाजपप्रणीत पॅनल सत्तेवर आल्याने तेथे ट्रिपल इंजिन व्यवस्था झाल्याचे ही मंडळी म्हणते. मात्र या व्यवस्थेमुळे पणजीतील विकासकामे नीटपणे मार्गी लागतील, की स्मार्ट सिटीचा घोळ यापुढेही चालू राहणार असे प्रश्नही केले जात आहेत. गोव्याच्या शेजारील कर्नाटकात स्मार्ट सिटी योजनेनुसार छोट्या छोट्या शहरांचाही कायापालट केला गेला, तसा कायापालट पणजीत झाला तर ट्रिपल इंजिनाला काही अर्थ राहील, असेही म्हटले जाते. ∙∙∙

हरमलचा ‘पट्टेरी पाहुणा’

हरमलमध्ये म्हणे वाघ दिसला! छायाचित्रे व्हायरल झाली, वर्तमानपत्रांतही वार्ता आली आणि गावात चर्चा सुरू ‘वाघ खरा की फोटोचा खेळ?’ पण, गोष्ट येथेच थांबली नाही. आता तोच वाघ आणि त्याची दोन पिल्ले असे चित्र व्‍हायरल होत आहे. वाघापेक्षा त्याचे फोटोच जास्त वेगाने फिरत आहेत! मात्र हरमलमधील स्थानिकांनी हात वर करून सांगितले “अहो, हे सगळं फेक आहे.” पण सोशल मीडियाच्या जंगलात एकदा वाघ शिरला, की मग तो खरा असो वा फोटोशॉपचा, चर्चा मात्र जोरातच होते. खरं तर आता प्रश्न असा पडला आहे, की हरमलमध्ये वाघ आला होता की नाही, की वाघापेक्षा मोबाईलमधील “एडिटिंगचा वाघ”च जास्त ताकदवान ठरला? काहीही असो, एका फोटोने गावात अशी चर्चा पेटवली की जणू वाघाने नव्हे, तर चर्चेनेच हरमलमध्ये फेरफटका मारला! ∙∙∙

मांद्रेतील असाही शिमगोत्सव

मांद्रे येथे होणाऱ्या शिमगोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. मांद्रेत मगोचे आमदार जीत आरोलकर आहेत. मांद्रेत भाजपचा पुढील उमेदवार कोण याविषयी आत्तापासूनच कुतूहल आहे. त्यातच आरोलकर यांनी आपल्या व्यक्तीगत संपर्काचा वापर करत चव्हाण यांना आमंत्रित करून आपण भाजपचा किती जवळचा आहे हे दाखवून दिले आहे. अलिकडेच सचिन परब यांचा वाढदिवस प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजपच्या मंडळ प्रशिक्षण शिबिरात साजरा केला. यामुळे मांद्रेतील भाजपमध्येच विविध अंगाने चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

बाबूश यांनी ‘बारामती’ पहावी!

तीन दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची मुलाखत पाहिली. या मुलाखतीत मोन्सेरात यांनी बऱ्याच विषयावर स्पष्ट मते व्यक्त केली. पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्यांनी दिलेली ही मुलाखत तशी विशेषच म्हणावी लागेल. स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्जाविषयी त्यांचा आजही आक्षेप राहिला आहे. या कामाचा विषय निघाला की ते ताळगावात त्यांनी निर्माण केलेल्या रस्त्याच्या कामाचे ते उदाहरण देतात. खरेतर या कामाचे कौतुक केलेच पाहिजे. पण एक आमदार, मंत्र्याचा मतदारसंघ म्हणून आदर्शवत मतदारसंघ बनवण्याची संधी त्यांच्याकडे होती आणि अजूनही आहे. खरे तर त्यांनी असा मतदारसंघ पाहण्यासाठी लांब न जाता ‘बारामती’ला जावून पाहून यावे म्हणजे कदाचित ते ताळगावात आणखी सुधारणा करू शकतील, हे मात्र नक्की.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Unseasonal Rain: गुढीपाडव्याला वरुणराजा लावणार हजेरी! गोव्यात 18, 19 मार्चला 'यलो अलर्ट'; विजांच्या कडकडासह बरसणार सरी

Konkan Railway: 'कोकण रेल्वे' मार्गावर मान्सूनपूर्व तपासणी! मडगाव-ठोकूर, मडगाव-रोहा मार्गावर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगारात होणार 35 टक्क्यांची बंपर वाढ?8व्या वेतन आयोगाबाबत अर्थ मंत्रालयाने मागवल्या सूचना

Canacona: काणकोणात वाढती ‘ड्रग्स’ची तस्करी! पाळोळे, आगोंद परिसर विळख्यात; विद्यार्थी, पालकांसाठी धोक्याची घंटा

"हा खरा गोवा होता जो मला कधी दिसलाच नव्हता"! ‘गोंयकार’पण जपायचे आहे तर डोळ्यात अंगार हवा, मनात निर्धार हवा...

SCROLL FOR NEXT