Goa Politics: खरी कुजबुज; जिंकणाऱ्यांकडेच पक्षाचे लक्ष

Goa Latest Political News: रवी पुत्र रितेश सध्या फॉर्मात आहे. मृदुभाषी म्हणून परिचित असलेले रितेश यांनी गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रितेश गावकर यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता.
Goa Latest Political News
Goa Latest Political NewsDainik Gomatnak
Published on
Updated on

जिंकणाऱ्यांकडेच पक्षाचे लक्ष!

पणजी महापालिका निवडणुकीत विजय संपादन केल्या नंतर मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उत्पलने भाजपमध्ये प्रवेश करण्यास आपली कसलीच हरकत नाही. त्याचप्रमाणे आपला पुत्र रोहित २०२७ मध्ये आमदार होणार आहे, असे सांगितले. तसे पाहिले गेल्यास २०२२ मध्ये बाबूश मोन्सेरात विरोधात अपक्ष म्हणून उत्पलने निवडणूक लढवली होती व केवळ ७१६ मतांनी ते पराभूत झाले. त्यावेळी कॉंग्रेस, आप, यांचे वेगळे उमेदवार होते. मजा म्हणजे अजूनपर्यंत उत्पलने आपण भाजप सोडली किंवा भाजपने उत्पलला पक्षातून काढले, असे कधीही जाहीर केलेले ऐकिवात नाही. त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर बाबूश व रोहीतला उमेदवारी कशी आणि कुठे मिळणार? हा प्रश्‍न आहे. शेवटी जिंकणाऱ्यांकडेच पक्षाचे लक्ष असते. ∙∙∙

कार्यकर्त्यांची कसोटी!

रवी पुत्र रितेश सध्या फॉर्मात आहे. मृदुभाषी म्हणून परिचित असलेले रितेश यांनी गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रितेश गावकर यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. त्यावेळेला फोंडा आणि सावईवेरे भागातील डोंगराळ तसेच कुळागरी भाग रितेशनी आपल्या कार्यकर्त्यांसह पिंजून काढला होता. रवी पात्रांवचे वलयही प्रभावी ठरले, त्यामुळे साहजिकच भाजपची मतांची टक्केवारी वाढली होती, हे तत्कालीन विरोधकही मान्य करतात. आता प्रत्यक्ष विधानसभेची तिकीट रितेशला मिळाल्यात जमा आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची कसोटीच लागणार हे नक्की ∙∙∙

रेजिनाल्डचा आशावाद!

पणजी महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल बाबूश मोन्सेरात यांचे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी अभिनंदन केले आहे. जो जनतेची कामे करतो व मतदारांशी कनेक्टेड असतो, त्याला मतदार कधीच विसरत नाहीत, असे रेजिनाल्ड यांचे म्हणणे आहे. स्वतः ते आपल्या कुडतरी मतदारसंघात नेहमीच सक्रिय असतात. मागच्या खेपेला कुडतरीत अपक्ष म्हणून जिंकून आल्यानंतर त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. कुडतरी मतदारसंघ हा नेहमीच भाजप विरोधी राहिलेला आहे, आता मडगाव पालिकेची निवडणुका आहेत. या पालिकेचे दोन प्रभाग कुडतरी मतदारसंघात येतात. या निवडणुकीचे आलेक्सबाबांना‘टेन्शन’ नाही, परंतु पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. यावेळी रेजिनाल्ड पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात असणार हे नक्की, मात्र सध्या त्यांनी भाजपा सरकारला पाठिंबा दिला असल्याने कुडतरीतील मतदार त्यांना पुन्हा स्वीकारतील का? हा प्रश्न आहे. आलेक्स मात्र आपण याही खेपेला विरोधकांवर वरचढ असून याबाबत आशावादी आहेत. पुढे काय घडते ते पाहूया, ‘तूर्तास वेट अ‍ॅण्ड वॉच.’ ∙∙∙

नेमका हेतू काय असावा?

मडगाव कदंब बसस्थानकाची दुरुस्ती अंदाजे २५० कोटी रुपये खर्चून केला जाणार, असे वाहतूक मंत्र्यांनी जाहीर केले. कुठलाही प्रकल्प किंवा विकास कामे करण्यापूर्वी त्या मतदारसंघातील आमदारांना विश्वासात घेणे महत्त्वाचे असते. गेल्या दोन वर्षांपासून मडगाव कदंब बसस्थानकाची दुरुस्ती होणार, नूतनीकरण होणार अशा बातम्या येत असतात. मात्र याची माहिती आमदाराला नाही, यावर लोक आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. या दुरुस्तीबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, आपल्याला या कामाची माहिती दिल्याशिवाय दुरुस्ती होऊ देणार नाही, असे आमदार सरदेसाई यांनी विधानसभेत सांगितल्याने ही दुरुस्ती केवळ सरकारी पातळीवरून केली जात असल्याचे लोकांना समजले. या मागे नेमका काय हेतू असावा? यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

स्वप्न साकारणार!

मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी एका मुलाखतीत मुलगा रोहित मोन्सेरात यास आमदार बनवणार असल्याचे सांगितले. ज्यांच्यामध्ये विजयाची हमी आहे, त्यांना उमेदवारी मिळेल, हा अलिखित नियम असला तरी बाबूश कोणत्याही स्थितीत रोहितला आमदार बनवणार, हे स्पष्ट आहे. त्यांच्यासाठी सुरक्षित ताळगाव हाच मतदारसंघ आहे. तिसवाडीतील पणजी, सांताक्रूझ, कुंभारजुवे, सांतआंद्रे या चार मतदारसंघातून रोहित यांना निवडून आणण्याचे शिवधनुष्य बाबूश यांना उचलायचे झाले, तर ते एक आव्हान असेल, याचीही त्यांना कल्पना असेलच. ताळगाव, सांताक्रूझ आणि पणजीतून आमदार होण्याचे कसब बाबूश यांच्याकडे आहे, ते रोहित यांना जमेलच असे नाही, हेही ते पक्के जाणून असतील. २०२७ मध्ये ताळगावमधूनच रोहित विधानसभेत जातील, असे त्यांच्या समर्थकांना पक्के वाटू लागले आहे. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; धीरयोच्या बैलाला श्रद्धांजली

विरोधक संघटितरित्‍याच लढणार!

चौदा दिवसीय अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत आहे. विरोधी सातही आमदारांनी शुक्रवारी खासगी विधेयकांवरून सभागृहात गदारोळ माजवत दुपारपर्यंतचे कामकाज रोखून धरले आणि त्‍यानंतर नाराजी व्‍यक्त करीत कामकाजावर बहिष्‍कार टाकला. सभापती गणेश गावकर यांनी पहिल्‍या दिवसापासूनच विरोधकांना रोखून धरण्‍याचा प्रयत्‍न केलेला होता. पण, गुरुवार आणि शुक्रवारी विरोधकांनी त्‍यांच्‍या विरोध झुगारत आक्रमक पवित्रा घेतल्‍याने त्‍यांच्‍यासमोर सभापतींचेही काही चालले नाही. सोमवारपासून पुढील आठवड्यातील चार दिवसांतही आक्रमकपणेच सभागृहात लोकांचे प्रश्‍‍न मांडून त्‍यावर सरकारकडून तोडगा काढून घेण्‍याचा निर्णय सातही आमदारांनी संघटितरीत्या घेतल्‍याचे काँग्रेस, आप, आरजीपी, गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: खरी कुजबुज; आता पुन्हा पावले चुलीकडे

काँग्रेसच्या त्रिकुटावरील रिल!

काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते युरी आलेमाव यांच्या समर्थकांकडून एक व्हिडिओ रिल सध्या बरीच व्हायरल केली आहे. फिल्मी स्टायलमध्ये युरी-एल्टन-कार्लुसचे त्रिकुट जॅकेट घालून, डोळ्यांना गॉगल लावून ‘गोवा गॅरेज'' असे नाव असलेल्या एका गॅरेजमधून बाहेर पडत असल्याचे या व्हिडीओत दाखवले आहे. ‘जनता गॅरेज'' म्हणून तामिळ चित्रपट बराच गाजला होता. त्यामुळे ‘गोवा गॅरेज'' असे म्हटल्यामुळे, या व्हिडिओची उत्सुकता. या व्हिडिओत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस दिसत नाहीत. व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काँग्रेसला गॅरेजमध्ये टाकून आता आमदार कुठे निघाले, असा काहीजणांचा खोचक प्रश्नही आहेच. तर काहीजणांनी २०२७ मध्ये सत्तेत यायचे असेल, तर डोळ्याला गॉगल लावून नव्हे तर उघड्या डोळ्यांनी नष्ट होणारा गोवा बघण्याचे व त्यासाठी प्राणपणाने लढा देण्याचे धाडस दाखवले पाहिजे, असा सल्ला या आमदारांना दिला आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com