Goa Budget 2025: गोव्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, पर्यटन खात्यावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. विरोधी पक्षांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सरकारला धारेवर धरले. पर्यटन खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पर्यटन उद्योगाच्या ढासळत्या स्थितीवरून सरकारला लक्ष्य केले.
आमदार वीरेश बोरकर यांनी पर्यटन खात्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर खंवटे यांना उत्तर देण्यास भाग पाडले. त्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही पर्यटन खात्याच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली.
गोव्यात पर्यटकांची संख्या अचानक का घटली, पर्यटन खात्याने पर्यटनावर खर्च केलेल्या पैशांचा हिशोब काय, आणि रोड शो व जाहिरातींवर किती खर्च केला, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
खंवटे यांनी या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती पर्यटन सुधारणांवर काम करत आहे. कतारसारख्या देशातील पर्यटक गोव्यात ११ हजार रुपये खर्च करतात. कोविडनंतर गोव्याची जाहिरात करताना समुद्रकिनाऱ्यांपलीकडील गोव्याची विविधता दाखवण्यात आली. बर्लिन, दुबई, लंडनमध्येही गोव्याच्या पर्यटनाची माहिती देण्यात आली. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
मात्र, आलेमाव यांनी खंवटे यांच्या उत्तरावर समाधान व्यक्त केले नाही. गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असलेला पर्यटन उद्योग धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. खाणकाम उद्योगही ठप्प झाल्यामुळे राज्याच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत, असे ते म्हणाले. आगामी अर्थसंकल्पाकडून त्यांना कोणतीही अपेक्षा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
"पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारनं ठोस योजना तयार करायला हवी होती. मात्र, सरकारनं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे, गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे.
सरकारनं तातडीनं यावर उपाययोजना करावी, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे," असं आलेमाव म्हणाले. गोव्याच्या अर्थव्यवस्थेची ढासळती स्थिती आणि सरकारच्या निष्क्रियतेमुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आगामी अर्थसंकल्पात सरकार कोणते उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.