Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; खरेच युती की नुसता ‘दिखावा’?

Khari Kujbuj Political Satire: मडगावातील एका कार्यक्रमाला सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते. आपल्या भाषणात पूर्वीच्या व आताच्या महिलांमधल्या वेगळेपणाचा मुद्दा उपस्थित केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

खरेच युती की नुसता ‘दिखावा’?

नुकत्‍याच झालेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणूक काळात युती आणि जागावाटपाच्‍या मुद्द्यावरून काँग्रेस, आप आणि रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजीपी) या तीन पक्षांमध्‍ये फाटाफूट झाली. शेवटी ‘आप’ आणि ‘आरजीपी’ने वेगळी चूल मांडली आणि काँग्रेसने गोवा फॉरवर्डला सोबत घेत निवडणूक लढवली. या घडामोडींमुळे या पक्षांच्‍या आमदारांतही फूट पडल्‍याचे दिसून आलेले होते. परंतु, येत्‍या १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्‍या हिवाळी अधिवेशनाच्‍या निमित्ताने क्रूज सिल्‍वा वगळता चारही पक्षांचे सहा आमदार एकत्र आले, सरकारला घेरण्‍यासंदर्भातील रणनितीही त्‍यांनी आखली. त्‍यामुळे त्‍यांच्‍यात एकी तूर्तास दिसून आलेले आहे. परंतु, सभागृहात ते एकी अशीच ठेवणार की बैठकीच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी केवळ ‘दिखावा’ केला? या प्रश्‍‍नाचे उत्तर शोधण्‍यासाठी मतदार आतूर झाले आहेत. ∙∙∙

दामू नाईक यांना महिलांच्या मतांची गरज

मडगावातील एका कार्यक्रमाला सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते. आपल्या भाषणात पूर्वीच्या व आताच्या महिलांमधल्या वेगळेपणाचा मुद्दा उपस्थित केला होता. ते आताच्या महिलांच्या त्रुटी बद्दल बोलणार होते. पण लगेच त्यांना निवडणुकीची आठवण झाली व त्यांनी तो विषय पुढे उच्चारणे बंद केले. मात्र, त्यांनी सांगितले की महिलांबद्दल आपण काहीही विपरित बोलणे योग्य होणार नाही. यदा कदाचित भविष्यात निवडणूक लढण्याची वेळ आली तर महिलांची मते मिळायला नको का? यातून एक स्पष्ट होते की, निवडणूक लढविण्यास दामूबाब इच्छुक आहेत व दुसरे म्हणजे जिंकण्यासाठी महिलांच्या मतांची गरज तर लागेलच ना? ∙∙∙

अंडरग्राउंड ...

हडफडे येथील बर्च क्लबमधील आगीच्या दुर्घटनाप्रकरणात, हडफडे-नागवाचे अपात्र सरपंच रोशन रेडकर तसेच बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दोघांचे हे अर्ज न्यायालयाने फेटाळून आठवडा उलटला तरीही, दोघेही अद्याप हणजूण पोलिसांना सापडत नाहीत. ३० डिसेंबरला दोघांचे अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. त्यापूर्वी दोघांना अंतरिम दिलासा मिळाल्याने, दोघांनी पोलिस स्थानकात येऊन आपली जबानी दिली होती. परंतु, जामीन अर्ज फेटाळल्यापासून दोघेही ‘मिस्टर इंडिया’ प्रमाणे गायब झालेत. पोलिसांना दोघेही सापडत नसल्याने हा कुतूहलाचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, गोवा पोलिसांनी चक्क थायलंडला जाऊन फरार लुथरा बंधूंना गोव्यात आणले. परंतु, सरपंच व सचिव पोलिसांच्या गळाला लागत नसल्याने पोलिसांच्या तपासकामावर प्रश्नचिन्ह उभे राहतेय. पोलिसांना ते खरोखर सापडत नाहीत, की पाणी कुठेतरी मुरतंय म्हणायचं? ∙∙∙

वेंन्झींचा उसना आवेश

काही जण ‘आपण पडलो तरी आपले नाक वरच’ असे म्हणतात. आपच्या गोवा नेत्यांबाबतही असेच म्हणावे लागेल. कारण जिल्हा पंचायत काबीज करण्याच्या गोष्टी करणाऱ्या ‘आप’ची गाडी गोव्यातील मतदारांनी केवळ एकवर आणून ठेवल्यानंतरही आमचा ‘व्होट शेअर’ वाढला अशा गमजा या पक्षांच्या नेत्यांनी मारल्याच. आता अमित पालेकर आणि अन्य नेत्यांनी राजीनामा दिल्यावर बाणावलीचे आमदार वेंन्झी व्हिएगस हेही आता उसना आव आणत, पक्षात येतात किती आणि जातात किती, पक्ष तिथेच असतो अशा गोष्टी करू लागले आहेत. वेंन्झीचा उसना आवेश किती काळ टिकणार बुवा? ∙∙∙

काँग्रेस ‘ती’ रिस्‍क घेणार?

आपने राज्‍य संयोजकपदावरून उचलबांगडी केल्‍यानंतर ॲड. अमित पालेकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्‍यांच्‍यासह संयोजकपदाचा अतिरिक्त ताबा देण्‍यात आलेल्‍या श्रीकृष्‍ण परब यांच्‍यासह चार जणांनीही पक्षाला रामराम केला. अचानक घडलेल्‍या या घडामोडींमुळे आपचे राज्‍यभरातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. राजीनामा दिलेले नेते आता कोणत्‍या पक्षात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशातच पालेकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक सांताक्रूजमधून लढवण्‍याचे स्‍पष्‍ट करीत काँग्रेसमध्‍ये प्रवेश करण्‍याचेही संकेत दिले आहेत. परंतु, काँग्रेसचा बालेकिल्‍ला असलेल्‍या सांताक्रूजमध्‍ये ख्रिस्‍ती मतदार अधिक असून, तेथे ख्रिस्‍ती उमेदवारच निवडून येण्‍याचा इतिहास आहे. अशा स्‍थितीत काँग्रेस पालेकरांना पक्षात घेऊन सांताक्रूजची उमेदवारी देण्‍याची ‘रिस्‍क’ घेणार? की त्‍यांची व्‍यवस्‍था दुसरीकडे करणार? याबाबत सांताक्रूजमधील मतदारांत चर्चा सुरू आहे. ∙∙∙

राजेश फळदेसाई उवाच

राज्य नगर व ग्राम नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी निमित्त ठरला आता काम बंदचा आदेश बजावण्यात आलेला करमळी येथील बहुउद्देशीय व्यावसायिक प्रकल्प. या प्रकल्पाला विरोध करणारे आपल्याकडे आलेच नव्हते, असा खुलासा फळदेसाई यांनी केला आहे. आपण करमळी येथे गेलो असता ग्रामस्थांनी आपल्याकडे तो विषय मांडला. आपण त्याचा पाठपुरावा केला, असे फळदेसाई यांचे म्हणणे आहे. आपण याआधीच मंत्री विश्वजित राणे यांच्याशी तीन दिवसांपूर्वी बोललो होतो व त्यांनी परवानगी मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, असे फळदेसाई यांनी म्हटले आहे. असे आहे तर लोकांनी मोर्चा का काढला, हा प्रश्न उरतोच. ∙∙∙

फरार पण प्रसिद्ध!

बर्च दुर्घटनेनंतर हडफडे पंचायतीत जे वादळ उठलं, त्यानंतर सरपंच रोशन रेडकर अपात्र ठरले आणि सचिव रघुवीर बागकर यांना कायमचे कामावरून काढले गेले. तेव्हापासून दोघेही चर्चेत मात्र फुल ऑन आहेत! सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज बुधवारी सुनावणी आहे म्हणे. लोक म्हणतात, आज ठरेल जामीन मिळणार की थेट ‘हजर राहा’चा आदेश? मात्र गावातली खरी चर्चा वेगळीच आहे… न्यायालयात अर्ज पोहोचतो, वकील पोहोचतात, पण हे दोघे मात्र पोलिसांना अजूनही सापडत नाहीत! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

Goa Crime: टॉवेल आणण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार; 75 वर्षीय गुन्हेगाराला सश्रम कारावासाची शिक्षा

धक्कादायक! आरोपीने तुरुंगातून तक्रारदाराला लावला फोन; जेलमधील मोबाईल, ड्रग्जवरून हायकोर्ट संतप्त; दिले महत्वाचे निर्देश

Agonda Beach: आगोंद ‘कासव संवर्धन’ क्षेत्रात बेकायदा बांधकामांची रेलचेल! न्‍यायालय संतप्‍त; दिले चौकशीचे आदेश

Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

SCROLL FOR NEXT