पणजी: गोव्यातील किनारी भागात जमिनीच्या बेकायदा रूपांतराविरुद्ध प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. अंजुणें येथील प्रसिद्ध 'क्लब गोंया'ला (Club Goya) शेतजमिनीचा विनापरवाना व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी १५ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे बेकायदा जमीन रूपांतरण करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, क्लब गोया ज्या जागेवर उभा आहे, ती मुळात कृषी वापरासाठी राखीव असलेली जमीन होती. मात्र, प्रशासकीय नियमांची पायमल्ली करत या जागेचे बिगरशेती (Non-Agricultural) कामासाठी रूपांतर करण्यात आले होते. महसूल विभागाने केलेल्या चौकशीत जमिनीच्या वापराबाबतचे नियम धाब्यावर बसवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी या क्लबवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.
केवळ दंडच नाही, तर प्रशासनाने क्लबला एक कठोर मुदतही दिली आहे. पुढील ३० दिवसांच्या आत संबंधित जमीन पुन्हा तिच्या मूळ शेतीयोग्य स्थितीत आणण्याचे आदेश 'क्लब गोया'ला देण्यात आले आहेत. जर क्लब व्यवस्थापन दिलेल्या मुदतीत जमिनीची डागडुजी करण्यात किंवा ती मूळ स्थितीत आणण्यात अपयशी ठरले, तर सरकारी यंत्रणा स्वतः पुढाकार घेऊन ही जमीन पूर्ववत करेल, असा स्पष्ट इशाराही आदेशात देण्यात आला आहे.
गोव्यातील शेतजमीन वाचवणे आणि जमिनीच्या वापराबाबतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे, हा या कारवाईमागचा मुख्य उद्देश आहे. बेकायदा जमीन रूपांतरण करणाऱ्या आस्थापनांना हा एक स्पष्ट संदेश मानला जात आहे. "शेतीचा वारसा जपण्यासाठी आणि नियमबाह्य कृत्यांना लगाम घालण्यासाठी सरकार कोणतीही गय करणार नाही," असे संकेत या निर्णयाद्वारे प्रशासनाने दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.