Government Job: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नोकर भरतीत सध्या जो घोळ झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे कुडचडे भागातही साशंकतेचे वातावरण पसरले आहे. या नोकरभरतीत कुडचडे मतदारसंघातील युवकांचीच संख्या सर्वांत अधिक होती, असे सांगण्यात येते.
आता आमदार नीलेश काब्राल यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते राहिले नसल्यामुळे आणि ही नोकरी भरती प्रक्रिया रद्द होण्याची शक्यता असल्याने हे युवक नोकरीचे काय होणार, या चिंतेत दिवस काढत आहेत.
गेले तीन दिवस काब्राल यांच्या घराकडे त्यांच्या सांत्वनासाठी लोकांची गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर ही बाबही पुढे आली आहे. या गर्दीतील काहीजण नोकऱ्या मिळालेल्या उमेदवारांचे पालक असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे ही गर्दीही आता कुडचडेत चर्चेचा विषय बनली आहे.
काब्राल यांचे मंत्रिपद काढून घेतल्यानंतर त्यांच्यामार्फत ज्यांना लाभ मिळाला होता, ते सर्व विचलीत झाले आहेत. त्यात या नोकऱ्यांसाठीच्या उमेदवारांचाही समावेश असल्याचे ‘आरजी’चे नेते आदित्य देसाई यांनी सांगितले.
आम्ही नीलेश काब्राल समर्थक; पक्षाचे नव्हे !
शेल्डेच्या पंचसदस्य दीप्ती नाईक यांनी आम्ही भाजपचे नव्हे तर काब्राल यांचे समर्थक आहोत. आमचे मत काब्राल यांना होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली हाेती. निकीता गावडे यांनी त्याहीपुढे जाऊन काब्राल यांचे मंत्रिपद काढून घेणे हा सरळ सरळ त्यांच्यावर केलेला अन्याय आहे.
पक्षाने त्यांना पुन्हा मंत्री केले नाही तर आम्ही काब्राल यांनी सांगितले तरीही भाजपासाठी मतदान करणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या प्रतिक्रियांकडे सध्या भाजपकडून गंभीरपणे पाहिले जात आहे.
पक्षापेक्षा काब्राल मोेठे का ?
पक्षाने विनंती केली म्हणून आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मी या पक्षाचा प्रामाणिक असा कार्यकर्ता असून पक्षाच्या विरोधात मी कधीही जाणार नाही, असे एकाबाजूने माजी मंत्री नीलेश काब्राल म्हणत आहेत. तरी त्यांचे काही कार्यकर्ते मात्र मंत्रिपद काब्राल यांना परत दिले नाही तर लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपविरोधात काम करू, अशी धमकी देत आहेत. आम्ही भाजपचे मतदार नव्हे तर काब्राल यांचे मतदार, असे काही पंचही म्हणत आहेत. त्यामुळे काब्राल हे पक्षापेक्षा मोठे का? असा सवाल आता भाजपातच काहीजण करू लागले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.