सासष्टीत ग्रामसभा म्हणजे जणू मॅरेथॉनच! तासनतास चालणाऱ्या या सभा आणि त्यातील चर्चा सर्वश्रुत आहेत. पण हे सांगण्याचे कारण म्हणजे, एकीकडे तालुक्यात अशा दीर्घ ग्रामसभा होत असताना रविवारी रुमडामळ पंचायतीची ग्रामसभा मात्र अवघ्या एका मिनिटात आटोपली! नऊ पंच सदस्यांची ही पंचायत. त्यापैकी चार सदस्यांची अपात्रतेची चौकशी सध्या प्रलंबित आहे. त्यामुळे सध्या पंचायतीवर प्रशासक नेमण्यात आला आहे. रविवारी झालेल्या ग्रामसभेला केवळ पाच पंच सदस्य उपस्थित होते. उर्वरित सदस्यांनी बहुधा रविवारच्या सुट्टीचाच आनंद लुटणे पसंत केले असावे. सभेत उपस्थित ग्रामस्थही मग उपरोधिकपणे म्हणू लागले, “हेच आमचे लोकप्रतिनिधी!” ग्रामसभेत गावच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर, समस्यांवर चर्चा अपेक्षित असते. मात्र अवघ्या एका मिनिटाच्या सभेत नेमकी कोणती चर्चा झाली असेल, याची उत्सुकता आता अनेकांना लागली आहे. ∙∙∙
पंधरा वर्षांनंतर का होईना, पण गोव्यातील सर्व प्रभावी एसटी नेते एका व्यासपीठावर आल्याचे चित्र सर्वांनी पाहिले. यासाठी आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर आणि सभापती गणेश गावकर यांनी विशेष प्रयत्न केले आणि ते अखेर फळाला आल्याचे काल दिसून आले. कार्यक्रमात बोलताना तवडकर काहीसे भावूक झाल्याचेही जाणवले. एसटी नेत्यांच्या ‘इगो’मुळेच ही दरी निर्माण झाली होती, हे मान्य करताना ‘यापुढे ती चूक होऊ नये,’ असे ते म्हणाले. आपल्या पदाचा वापर समाजहितासाठीच करणार, अशी शपथही त्यांनी यावेळी घेतली. सुट्टीचा दिवस नसतानाही ‘प्रेरणा दिन’ कार्यक्रमाला लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांसाठी ही गर्दी निश्चितच प्रेरणादायी ठरली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ∙∙∙
रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) फेसबुक आणि सोशल मीडियाचा आधार घेत शेकडो कार्यकर्ते जोडले. पक्षाचा तळागाळापर्यंत प्रचार करण्यातही मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांनी याच सोशल मीडियाचा वापर केला. पक्षाच्या सर्वच नेत्यांची भाषणे, पत्रकार परिषदा ‘आरजीपी’च्या सोशल पेजवरून प्रसारित करण्यात येत होती. परंतु, आमदार वीरेश बोरकर यांची सोमवारची पत्रकार परिषद मात्र, या पेजवरून प्रसारित करण्यात आली नाही. याबाबतचा शोध घेत असताना गेल्या एका महिन्यापासून आमदार बोरकर यांच्याबाबतची कोणतीही अपडेट या पेजवर दिसत नसल्याने ‘आरजीपी’ने आमदार बोरकर यांना महिन्यापासूनच वगळल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे. ∙∙
कुठल्याही कार्यक्रमाचे भव्य, आकर्षक आणि तरीही शिस्तबद्ध आयोजन कसे करावे, हे शिकायचे असेल तर मंत्री रमेश तवडकर यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखे आहे. त्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘लोकोत्सवा’चे आयोजन नेहमीच भव्यदिव्य असते आणि ‘प्रेरणा दिन’ कार्यक्रमही त्याला अपवाद ठरला नाही. सुसज्ज व्यासपीठ, उपस्थितांसाठी करण्यात आलेली चोख व्यवस्था आणि प्रत्येक गोष्टीतील नीटनेटकेपणा यामुळे कार्यक्रम उठावदार ठरला. या कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत आणि नेटके व्हावे यासाठी आदिवासी कल्याण खात्याचे संचालक निलेश धायगोडकर तसेच खात्यातील अन्य कर्मचारी सतत धावपळ करताना दिसत होते. एकंदर काय, तर कार्यक्रमाचे आयोजन खरोखरच ‘नंबर वन’ होते. ∙∙∙
गोव्यातील प्रसिद्ध फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. मधू घोडकिरेकर यांचा अन्य तीन एसटी प्रज्ञावंतांसमवेत नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. मधूंनी फारसे भाष्य केले नाही, तरीही उपस्थितांमध्ये एक वेगळीच कुजबुज सुरू होती. डॉ. मधू लवकरच राजकारणात प्रवेश करणार का? याच चर्चेमुळे काही प्रस्थापित मंडळी बेचैन झाल्याच्याही चर्चा रंगल्या. डॉ. मधूंना राजकारणाची आवड असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे सरकारी सेवेतून निवृत्तीनंतर ते प्रत्यक्ष राजकारणात उडी घेतील का, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙
बऱ्याच दिवसांनी मंत्री रमेश तवडकर यांच्या समवेत एका व्यासपीठावर आलेले आमदार गोविंद गावडे प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात नेमके काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. नेहमीप्रमाणे नाट्यमय शैलीत भाषण करताना त्यांनी कुणाचेही नाव न घेता काहींवर कोरडे ओढलेच. मात्र, त्यांनी विशेष ‘फोग’ काढला तो सरकारमध्ये कार्यरत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर. “मंगेश आणि दिलीप यांनी आपल्या जिवाचे बलिदान दिले म्हणून तुम्हाला राखीव कोट्यातून नोकऱ्या मिळाल्या आहेत, हे विसरू नका,” असे सांगत “तुम्हीही समाजासाठी काहीतरी दिले पाहिजे,” असे ते म्हणाले. आता गोविंद गावडेंचा हा फोग सर्वच एसटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होता की एखाद्या ठराविक अधिकाऱ्याला उद्देशून होता, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. विशेष म्हणजे, ११० सरकारी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन एसटी समाजासाठी पुढील दहा वर्षांचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार केले होते आणि ज्या दिवशी त्याचे लोकार्पण होत होते, त्याच दिवशी त्यांच्यावरच हा फोग काढला गेला. त्यामुळे त्यांपैकी काहीजण मनोमन “हेचि फल काय मम तपाला…” असे म्हणत असावेत, अशी चर्चा रंगली. ∙∙∙
भाजप सरकार सध्या राज्यातील अनेक मंदिरांच्या नूतनीकरणावर भर देत आहे. मात्र, फातोर्ड्यातील मुरीडा येथील नाग मंदिर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. या मंदिराचा विकास करण्याचा आमदार विजय सरदेसाई यांचा मनोदय असला, तरी मडगाव पालिकेत त्याला विरोध झाल्याचे समोर आले. गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी मंदिर विकासकामासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव कौन्सिल बैठकीत मांडला होता. मात्र, सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी त्याला विरोध केल्याची माहिती स्वतः आमदार सरदेसाई यांनी एका कार्यक्रमात दिली. ‘या नगरसेवकांकडे दूरदृष्टी नाही. केवळ विरोधासाठी विरोध, एवढीच त्यांची भूमिका आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली. मात्र, मंदिराच्या विकासकामाला विरोध झाला म्हणून काम थांबणार नाही, असे स्पष्ट करताना ‘देव आमच्या पाठीशी आहे. आम्ही कोणाचेही, अगदी विरोधकांचेही वाईट चिंतत नाही,’ असे सांगण्यासही सरदेसाई विसरले नाहीत. आता फातोर्डेकरांना मात्र एकच प्रश्न पडला आहे, मंदिराच्या विकासकामालाच विरोध का? विकासाच्या मुद्द्यावरही राजकारण आडवे येत असेल, तर मग देव तरी कोणाच्या बाजूने उभा राहणार? ∙∙∙
जनतेला नको असलेला एखादा प्रकल्प सरकार लादत असेल आणि जनतेचे ऐकण्यास तयार नसेल, तर जनतेच्या बाजूने रस्त्यावर उतरून तो प्रकल्प रद्द करण्याची नैतिक जबाबदारी प्रमुख विरोधी पक्षांची असते. परंतु, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस रस्त्यावर उतरण्याआधी केवळ धमक्या देण्याचेच काम करीत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. स्मार्ट मीटरला जनतेचा विरोध आहे. त्यामुळे वीज खात्याने स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या शिष्टमंडळाने वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांच्याकडे केली. त्याबाबत त्यांना निवेदनही दिले आणि त्यानंतर बाहेर आल्यावर मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यामुळे काँग्रेसला जनतेची इतकी काळजी आहे, तर त्यांनी आधीच आंदोलन का नाही केले? असा प्रश्न जनता विचारत आहे.∙∙
मळा झऱ्याचं पाणी थांबलं... पण आश्वासनांचा प्रवाह मात्र अजूनही जोरातच सुरू! डासांची पैदास इतकी वाढलीय की आता वारसा स्थळ पाहायला पर्यटक नाही, तर मलेरिया विभागाची टीम यायला हवी. ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली झरा हिरवा झाला, आणि नागरिक लाल डोळे करून रात्री डासांशी झुंज देत बसलेत. काही दिवसांनी कदाचित फलक लागेल — ‘मळा झरा : डास संवर्धन प्रकल्प’! ∙∙∙
पणजी शहरात तंबाखूविरोधी कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी छापे टाकण्यात आले. एका हातात फलक, दुसऱ्या हातात दंडाची पावती... आणि मागच्या गल्लीमध्ये पानमसाल्याच्या पुड्या अजूनही खुलेआम उडतायत! धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाईचा फोटो काढायला सगळे हजर; पण शाळेजवळ गुटखा विकणाऱ्यांना पाहिलं की प्रशासनाची नजर मात्र ‘नो स्मोकिंग’ बोर्डासारखी फक्त भिंतीवरच दिसते! नियमांचे फलक जास्त आणि अंमलबजावणी कमी... अशी स्थिती असल्यामुळे छापा संपला की पुन्हा ‘एक सिगारेट देना’चा आवाज सुरूच! ∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.