Mister Kurkurit | Ruben Rodrigues | Goan Influencer | Social Media  Dainik Gomantak
गोवा

रूचकर गोव्याचा 'मिस्टर कुरकरीत!'

Akshay Nirmale

Mister Kurkurit: सोशल मीडियातून वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ करणारे, मत व्यक्त करणारे अनेक एन्फ्ल्युएन्सर नावारूपाला आले. फूड, रेसिपीज याबाबतचे व्हिडिओज करणाऱ्यांची तर संख्या खूप मोठी आहे.

पण, या सर्वात अगदी नावापासून स्वतःचं वेगळंपण जपलेल्या एका गोमंतकीय युवकाचे चॅनेल चर्चेत आहे. रूबेन रॉड्रिगेज असं नाव असलेला हा तरूण आता मिस्टर कुरकुरीत म्हणून ओळखला जातो. आज तीच रूबेनची आयडेंटिटी बनलीय.

दैनिक गोमंतकने घेतलेल्या यु ट्युबर्स मीटमध्ये रूबेन सहभागी झाला होता. रूबेन रॉड्रिगेजचा मिस्टर कुरकुरीत कसा झाला, हजारो फॉलोवर्सपर्यतंची झेप, लाखोंची कमाई... अगदी आवडत्या माजरांचे नावही एका पदार्थावरून ठेवणारा रूबेन आहे तरी कसा?? त्याच्याशी गप्पा मारून जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...

सर्वात आधी तर तुझ्याविषयी सांग. तुझे शिक्षण? घरात कोणकोण असतं?

रूबेन- मी सध्या 22 वर्षांचा आहे. मी बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट केलेय. घरात आई, वडील, बहिण आणि आजी (वडिलांची आई) आहे. बहिण शिकतीय. वडिल मॅनेजर म्हणून नोकरी करतात. आई प्राध्यापक आहे. ती सेक्रेटरीयल प्रॅक्टिस आणि पॉलिटिकल सायन्स हा विषय शिकवते.

फूड चॅनेल सुरू करावे असे का वाटले?

रूबेन- काय झालं की, लॉकडाऊनमध्येच मी इन्स्टाग्राम सुरू केले होते. माझी मम्मी ही खूप चांगली कूक आहे. तिचा स्वयंपाक अनेकांना आवडतो. अनेकजण तिला रेसिपी विचारत असतात. मी स्वतः फूडी आहे. त्यामुळेही मी हे सांगू शकतो की ती किती चांगली कूक आहे.

मी हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर मलाही तिच्याकडून शिकायचे होते. आजही मी तिच्याकडून शिकतो. असे शिकत शिकत हे यु ट्युब चॅनेल सुरू आहे.

तुझ्या यु ट्युब चॅनेलविषयी सांग...

रूबेन- यु ट्युब चॅनेलची आयडिया माझी नव्हती. ती मम्मीची आयडीया होती. मम्मी म्हटली की यु ट्युब चॅनेल असते तर बरं झालं असतं. खरंतर, तिने आग्रहच धरला. एका संध्याकाळी मी आणि मम्मीने बोलत बोलत अचानक यू ट्युब चॅनेल सुरू केले.

त्या पुर्वी मी केवळ इन्स्टाग्रामवरच व्हिडिओ करत होतो. कोविडकाळात जून 2021 मध्ये हे यूट्युब चॅनेल सुरू केले. या यु ट्युब चॅनेलचे नाव आहे 'द फूड डायरी फ्रॉम मॉम टू सन.' त्यातून अजूनही माझं शिकणं सुरूच आहे.

मग मिस्टर कुरकुरीत हे वेगळं चॅनेल आहे का?

रूबेन- हो, ते माझं वेगळं चॅनेल आहे. तिथे फनी वे ने मी सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो. गोवन फूड अथवा सर्व प्रकारचे फूड, त्याच्या रेसेपीज असतात. कोकणी लँग्वेज आणि ह्युमर यांचे फ्युजन तुम्हाला त्यातील व्हिडिओंमध्ये पाहायला मिळेल.

सुरवातीला मम्मीचे रेसिपीचे व्हिडिओज केले. दुसरीकडे इन्स्टावर माझे व्हिडिओ सुरू होते. नंतर विचार करून मी माझी एक स्टाईल विकसित करण्याचा प्रयत्न केला. माझे व्हिडिओ हे फनी, मजेशीर असतात. तेव्हा व्हिडिओ करताना कधी वाटले नव्हते की, लोक इतका प्रतिसाद देतील.

इन्फ्ल्युएन्सर झालो आहोत असे कधी वाटले?

रूबेन- मी व्हिडिओ करत होतो. ब्रँडकडून बोलावणे येऊ लागले. आमचेही प्रमोशन कर म्हणून. काही लोकांनी मुलाखती घेतल्या. मीडियामध्ये झळकलो. लोकं ओळखू लागली. मगं मला वाटलं, यात काहीतरी सीरीयस करता येईल करियरसाठी.

25 हजार फॉलोवर्सचा टप्पा पार केल्यानंतर वाटायला लागले की, मुझ में कुछ तो है... बात बन सकती है...

आता तुला फॉलोअर्स किती आहेत?

रूबेन- आमच्या यु ट्युब चॅनेलला 23000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर 74000 हून अधिक फॉलोअर्स आहेत.

तुला मिळालेली सर्वांत चांगली प्रतिक्रिया काय होती?

रूबेन- एकाने मला प्रतिक्रिया दिली होती की, गोव्यात तू एकमेव सर्वाधिक हम्बल इन्फ्ल्युएन्सर आहेस. सो, मला ही प्रतिक्रिया खूप आवडली. ती माझ्या लक्षात राहिली.

व्हिडिओतून काय दाखवायचे आहे हे कसे ठरवतोस? किंवा कंटेटचा विचार कसा करतोस?

रूबेन- खरंतर मी विचार करून काही करत नाही. बऱ्याचदा काहीही कोरियोग्राफ केलेले नसते. एकदम स्पॉन्टेनियसली आम्ही करतो. मी स्क्रिप्टिंग करत नाही. ऑन द स्पॉट व्हिडिओ करतो. म्हणजे, आज चिकन काफ्रियल करायचे आहे. तर, आम्ही थेट सुरू करतो. सर्व काही स्पॉन्टॅनियस असते.

कुणाचे प्रोत्साहन मिळाले? वाईट प्रतिक्रिया आल्या किंवा टीका झाली का?

रूबेन- घरातून सपोर्ट मिळाला. घरचे, आजूबाजूचे आधी विचारायचे काय करतोयस. काम काय करतोयस? मी त्यांना सांगायचो, कामच तर करतोय. आता हळहळु अनेकांना कळतेय की हे पण काम आहे. मम्मीचा सपोर्ट मिळाला. बाकीच्यांना कळेल तसा त्यांनी सपोर्ट केला. टीका कुणी केली नाही.

व्हिडिओ कसा बनवतोस, काही सेटअप आहे का?

रूबेन- माझ्याकडे आयफोन-11 हा फोन आहे. मी सर्व काही त्यावरच करतो. शुटिंगपासून ते एडिटिंगपर्यंत. बेडरूममध्ये कोंडून घेऊन शांततेत स्वतःच रेकॉर्डिंग करत असतो अनेकदा. माझ्याकडे एक ट्रायपॉड आहे बास आणि जिंबल आहे बास. बाकी माझ्याकडे काही सेटअप नाही. पुर्वी एक टीम होती. पण ते खूप महाग पडते.

आजकाल इन्फ्ल्युएन्सर चांगलं कमावतात, तर तुझी कमाई किती आहे जर तुला सांगावेस वाटत असेल तर..?

रूबेन- यु ट्युबवर पैसे कमावणे सोपे नाही. पण तिथे खूप कमी पैसे आहेत. सुरवातीला तिथे काहीच पैसे नाहीत. एकदा तुम्ही यु ट्युबरवर मोठे झालात की मग त्यात पैसा खूप आहे. मी तिथे वर्षाला 25 ते 50 हजार रूपये कमावले असतील. इन्स्टाग्रामवर मात्र महिन्याला 1 लाख रूपये महिन्याला मिळत होते.

तुझ्या चॅनेलचे वेगळेपण काय?

रूबेन- फूडमध्ये माझेच चॅनेल वेगळे आहे. बाकी सर्वजण सेम करायचा प्रयत्न करतात. मला अॅक्च्युअली माहितीय फूड काय आहे. मी हॉटेल मॅनेजमेंट केलेय. रितसर प्रशिक्षण घेतलेय. तरीही मी म्हणतो की, मला केवळ दहा टक्केच फूड माहिती आहे.

म्हणजे एखादे फूड जज करताना माझ्या हे लक्षात असते. दुसरी गोष्ट माझ्या व्हिडिओत ह्युमर असतो. त्यामुळे किड्सपासून सिनियर सिटिझनपर्यंत माझे व्हिडिओ पाहिले जातात.

गोव्यात सर्वात आधी मी व्हॉईस ओव्हर युज करायला सुरवात केली. नंतर माझी कॉपी करायला सुरवात केली इतर व्लॉगर्सनी.

व्ह्युअर्सना एंगेज ठेवण्यासाठी काय करतोस?

रूबेन- लोक तुमच्याकडे येण्याची वाट पाहू नका. तुम्हीच लोकांपर्यंत पोहचा. लोकांमध्ये मिसळा. त्यांना मानसन्मान द्या. असे केले तर लोक तुम्हाला लाईक करतात. मी प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय देतो. प्रत्येक मेसेजला रिप्लाय देतो. माझ्याकडे वेळ असतो.

मी रात्री प्रत्येकाला रिप्लाय करतो. माझे बहुतांश व्हिडिओज हे कोकणी भाषेतून आहेत. पण माझा ऑडियन्स कोकणीसह मराठी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक विषयांतील आहेत.

गोव्याविषयी काय वाटते?

रूबेन- गोवा हे बीच, अल्कोहोल, पार्टी एवढ्याचसाठी प्रसिद्ध असावे असे वाटत नाही. गोव्यात अनेक परंपरा आहेत. शिगमो, कार्निव्हल, हेरिटेज आहे. गोव्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना प्रॉपर गोवन फूड मिळाले पाहिजे. गोव्याची स्वतःचे एक चांगले फूड कल्चर आहे.

ते समोर आले पाहिजे. विंडालू, काफ्रियाल, शॅकुती हे खास गोवन मांसाहारी पदार्थ त्यांना मिळाले पाहिजे.

तु कुणाला फॉलो करतोस किंवा तुझे आवडते इफ्ल्युएन्सर्स कोण आहेत?

रूबेन- भारतातील कमी पाहतो. भारताबाहेरचे अनेक जण मला आवडतात. युएसमधील एक निक डिजवानी म्हणून एक आहे. त्याला फॉलो करतो. गोल्डन बॅलन्स म्हणून एक चॅनेल आहे. ते खूप इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह आहे.

सर्वात महागडे मटण, सर्वात महागडे चीज असे व्हिडिओज ते करतात. त्यांच्यासोबत काम करायचे आहे मला. इटक्युसीपी, मॅक्स द मीट गाय यांनाही मी फॉलो करतो.

'मिस्टर कुरकुरीत' हे असं इतकं भारी नाव कसं सुचलं?

रूबेन- इन्स्टाग्रामवर माझ्या अकाऊंटचे नाव पूर्वी मास्टर क्लास.डीई.आर7 असे नाव होते. आर. सेव्हन. म्हणजे रूबेन सेव्हन. क्रिस्तियाने रोनाल्डोचा फॅन असल्यामुळे त्याचे आरसेव्हन घेतले. पण मी ते रूबेन सेव्हन अशा अर्थाने वापरत होतो.

सुरवातीला माझे व्हिडिओ चालत नव्हते फारसे तेव्हा वाटलं बंद करावं. तर एका व्हिडिओत मी व्हॉईस ओव्हरमध्ये मी एकेठिकाणी क्रिस्पी पोटॅटो असं म्हटलं होतं. नंतर माझ्या तोंडात सहज अगदी 'कुरकुरीत बटाटा' असं आलं. त्यावर फॉलोअर्समध्ये चर्चा सुरू झाली. की अरे उसने कुरकुरीत बोला.

त्यानंतर कुरकुरीत शब्दावर कॉमेंटमध्ये बरीच चर्चा सुरू होती. मग एका फॉलोअरने कॉमेंट केली. की चेंज युअर नेम टू मिस्टर कुरकुरीत. मग मलाही वाटले इट्स नाईस आयडीया. बहुत डिफरंट है. करते है.

असं चक्क एका फॉलोवरने मला हे नाव दिलंय. दीड वर्ष होऊन गेलं असेल माझं नाव मिस्टर कुरकुरीत आहे.

फूड फिल्डशिवाय आणखी काय आवडतं?

रूबेन- मला लोकांमध्ये बोलायला आवडते. मला पार्टी होस्ट करायला आवडते. मला ते शिकायचं आहे. काही कॉमेडी करायलाही आवडेल. जर फूड व्लॉग केले नसते तर ट्रॅव्हल व्लॉग केले असते. काहीतरी कॉमेडी केली असती. दिवसभरचे व्हिडिओ केले असते.

तुझा फ्युचर प्लॅन काय आहे?

रूबेन- अॅक्चुअली मी विचार नाही केलेला. पण मला अभ्यास करायचा आहे. प्रॉपर जॉब मिळवायचा आहे. शिक्षण झालेय. पण आणखी शिक्षण घ्यायचे आहे. मला फूड या क्षेत्रात अधिक शिक्षण घ्यायचे आहे. सध्या एज फॅक्टर माझ्या बाजूने आहे.

गोव्यात इन्फ्ल्युएन्सर्सना फारसा वाव आहे, असे वाटत नाही. एखादा मोठा इव्हेंट असेल तर गोव्याचे इन्फ्ल्युएन्सर्स तिथे चालतीलच असे वाटत नाही. कदाचित तिथे मराठी किंवा पंजाबी फूड एन्फ्ल्युएन्सर्स जास्त भाव खातील.

एखाद्या ब्रँडसाठी किंवा कॅम्पेनसाठी प्रमोशन केलेय का ?

रूबेन- खूप केलेय. गोव्यातच सहा रेस्टॉरंटना मी अगदी प्रॉपर प्रमोट केलं आहे. सेल, मार्केटिंग अगदी सर्व केलेय त्यांच्यासाठी. सनबर्न, ट्युबर्ग, मॅगी इंडिया सारख्या बिग ब्रँडसाठीही काम केलं. आता स्पॉन्सर्ड असे काही करत नाहीय. सध्या माझ्या काँटेटचाच मी विचार करतोय.

मांजरीचे नाव...

रूबेनचे गोवन खाद्यपदार्थांचे प्रेम किती असावे? एका उदाहरणातून ते कळेल. रूबेनकडे दोन मांजरी आहेत. त्यातील एका मांजरीचे नाव शॅकुती ठेवले आहे. शॅकुती म्हणजे मांसाहारी रस्सा किंवा ग्रेव्ही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT