पणजी: राज्यात वाहनचालकांना लक्ष्य करून सायबर भामट्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार सुरू केल्याचे उघडकीस आले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा बनाव करत चालकांच्या मोबाईलवर बनावट ‘ई-चलन’चे संदेश पाठवले जात असून, त्यासोबत दंड भरण्यासाठी खोटी पेमेंट लिंक सुद्धा दिली जात आहे. या प्रकारामुळे अनेक वाहनचालक आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उत्तर गोवा वाहतूक विभागाचे उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी सांगितले की, वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास ई-चलन हे केवळ वाहनाच्या नोंदणीकृत मालकाच्या मोबाईल क्रमांकावरच पाठवले जाते. चालकाला थेट आलेला कोणताही संदेश बनावट असून, अशा संदेशांतील लिंकवर क्लिक करू नये.
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी सांगितले की, सध्या या फसवणुकीबाबत कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र, सर्व वाहनचालकांनी यासंदर्भात काळजी घ्यावी.
लिंकवर क्लिक केल्यास...
सायबर फसवणूक करणारे भामटे ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉट्सॲप’द्वारे संदेश पाठवून दंडाची रक्कम नमूद करतात. ‘तातडीने पेमेंट करा’ असा दबाव टाकून दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडतात. मात्र, ही लिंक पूर्णतः बनावट असून, त्यावर क्लिक केल्यास बँक तपशील, ओटीपी किंवा यूपीआय माहिती चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.
वाहन चालकांनो...
संशयास्पद संदेशातील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
घाईघाईने कोणतेही पेमेंट करू नका.
बनावट ‘ई-चलन’ संदेश मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधा.
अधिकृत ई-चलन वाहन मालकाच्या मोबाईलवरच येते आणि दंड भरण्यासाठी सरकारच्या अधिकृत व सुरक्षित पोर्टलचाच वापर केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.