Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: अटकेचा ‘डिजिटल सापळा’; संपादकीय

Government Action Against Cyber Fraud: सायबर गुन्हेगारांनी हा काल्पनिक प्रकार ‘व्यवहारा’त आणला आहे. अशा गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत, तर लोकांचा नव्या व्यवस्थांवरील विश्वास डळमळीत होण्याचा धोका आहे. विविध खात्यांच्या उत्तम समन्वयातूनच हा अटकाव शक्य आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल.

गोमन्तक डिजिटल टीम

Cyber Frauds

Goa News: तंत्रज्ञानाचा विकास-विस्तार झाला की व्यवहारसुलभता वाढते, सोईसुविधांचा परीघ रुंदावतो, हे जसे खरे आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारांचेही फावते, याचा प्रत्यय सध्या प्रकर्षाने येत आहे. ‘डिजिटल अटक’ ही नवी संज्ञा सध्या चर्चेत आहे. वास्तविक डिजिटल अटक नावाची कुठलीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पोलिसी कारवाई अस्तित्वातच नाही.

सायबर गुन्हेगारांनी हा काल्पनिक प्रकार ‘व्यवहारा’त आणला आहे. अशा गुन्हेगारीला अटकाव करण्यासाठी सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत, तर लोकांचा नव्या व्यवस्थांवरील विश्वास डळमळीत होण्याचा धोका आहे. विविध खात्यांच्या उत्तम समन्वयातूनच हा अटकाव शक्य आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल.

या गुन्हेगारीचे धागेदोरे परदेशांतही असल्याने त्याविरुद्धच्या लढाईतही आंतरराष्ट्रीय समन्वय गरजेचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये या ज्वलंत मुद्याला स्पर्श करताना डिजिटल अटकेच्या सापळ्यात अडकलेल्या सर्वसामान्यांना मानसिक पातळीवर दिलासा दिला असला तरी गुन्हे प्रतिबंधासाठी सक्षम व्यवस्था उभी केल्याशिवाय या प्रकारांना आळा घालता येणार नाही.

‘‘तुम्ही अमुक एका व्यक्तीला पाठवलेल्या कुरिअरमध्ये बंदी घातलेले अंमली पदार्थ सापडले आहेत’’, ‘‘तुमच्या मुलाला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे,’’ ‘‘तुम्ही लोकांकडून खंडणी वसुली करीत असल्याच्या तक्रारी असून तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’’ अज्ञात क्रमांकावरुन येणाऱ्या अशा फोनने कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या जीवाचा थरकाप उडणे स्वाभाविक आहे.

निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात संबंधित व्यक्ती संभाषणादरम्यान आणखी खोलात बुडत जाते आणि शेवटी आभासी माध्यमातून बनावट यंत्रणेद्वारे होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला पूर्णपणे बळी पडते. हा आहे देशाच्या वेगवान प्रगतीसाठी अनिवार्य ठरलेल्या डिजिटायझेशनचा साईड इफेक्ट. अगदी सत्तावर्तुळातील सर्वोच्च व्यक्तीपासून ते सर्वसामान्यांपर्यंत कोणीही यातून सुटलेले नाही. त्याचे कारण देशातील बहुतांश लोकांचे ‘गोपनीय’ मानले जाणारे आधारकार्ड क्रमांक सार्वजनिक झाले आहेत.

ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकाचे नाव, मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता यासारखा संवेदनशील तपशील सहजपणे उपलब्ध होत आहेत. नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड, बँक खाते आणि हाती असलेल्या अन्य वैयक्तिक तपशीलाच्या आधारे गुन्हेगारांची टोळी सावज हेरते. त्यातून सुरु होतो ‘डिजिटल अटके’चा जीवघेणा खेळ.

मोबाईल क्रमांकाच्या आधारे आधारकार्ड आणि बँक खात्यांचा मागोवा काढायचा, पीडित व्यक्तीशी संबंधित अस्सल वाटेल अशी माहिती मिळवून बनावट दस्तावेज तयार करायचे, तोतया पोलीस, सीबीआय, नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी भासवून, बनावट पोलीस ठाणे आणि प्रसंगी ‘न्यायालय’ स्थापन करुन व्हिडिओ कॉलवर पीडित व्यक्ती प्रारंभिक चौकशीतच कोलमडून पडेल, असा प्रचंड मनोवैज्ञानिक दबाव निर्माण करायचा, व्हिडिओ कॉलवर आभासी झडतीच्या नावाखाली निर्वस्त्र व्हायला लावून संबंधित व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण करायचे.

एकदा या सापळ्यात ती व्यक्ती अडकली की त्यातून बाहेर पडण्यासाठी मागेल ती रक्कम द्यायला भाग पाडायचे, अशी या सायबर खंडणीखोरीची कार्यपद्धती आहे. ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, किशोरवयीन मुले या मनोवैज्ञानिक दबावाला सहज बळी पडतात.

अमुक एका व्यक्तीला तुमचे आधारकार्ड वापरुन कुरिअरने अंमली पदार्थ पाठविण्यात आला आहे, असे तथाकथित कुरिअर कंपनीच्या व्यक्तीकडून फोनवर ऐकताच आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेले भलेभले टेकसॅव्ही आणि उच्चशिक्षितही क्षणार्धात गर्भगळीत होतात आणि ‘सायबर सापळ्या’त नकळत अडकतात.

सायबर गुन्हेगारांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रा’ची स्थापना केली आहे. सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये म्हणून मुले आणि महिलांशी संबंधित गुन्हे, वित्तीय गुन्हे आणि अन्य गुन्ह्यांविषयीचे मार्गदर्शन केले जात आहे. भारतीय नागरिकांनी चालू वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत डिजिटल फसवणुकीत १२० कोटी रुपये गमावले.

व्यापार-व्यवसायातील फसवणुकीत १४२० कोटी, गुंतवणुकीतील फसवणुकीत २२२ कोटी रुपये, डेटिंग आणि हनीट्रॅपच्या सापळ्यात सापडून साडेतेरा कोटी रुपये अशी विविध स्तरांवर ही सायबर लूट सुरु आहे. या संघटित रॅकेटचे सूत्रधार म्यानमार, लाओस, कंबोडिया, पाकिस्तानसारख्या देशांमध्ये बसून फसवणुकीचा जीवघेणा खेळ खेळतात. भारतातील विविध राज्यांतील शहरांतील गुन्हेगारही त्यात सामील आहेत.

इनकमिंग कॉल हा परदेशातून फसवणुकीच्या उद्देशाने केला जात असल्याचा अलर्ट फोनवर झळकला तर तो कॉल घ्यायचे टाळून संबंधित व्यक्ती ‘डिजिटल अटके’च्या सापळ्यात अडकणार नाही. केंद्र सरकारच्या पुढाकाराने मोबाईल सेवा प्रदान करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी ही व्यवस्था आणि त्याबाबतीतील जागरुकता निर्माण केल्यास अनेकांची सायबर फसगत टळेल. कुठलाही अनोळखी, अज्ञात क्रमांकावरुन येणारा फोन घेण्यापूर्वी ‘थांबा, विचार करा आणि कृती करा,’ हा त्यांनी दिलेला मंत्र प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT