Mega Projects in Goa: गोव्यात का होतोय 'मेगा प्रोजेक्ट्स'ना विरोध? 'गावपण' गमावण्याची भीती की सरकारी 'यंत्रणेवर' अविश्वास?

Goa News: रोजगाराच्‍या नावाखाली सरकार अनेक वादग्रस्‍त प्रकल्‍प जनतेच्‍या माथी थोपवू पाहत असल्‍याचा आरोप होऊ लागला आहे. या प्रकल्‍पांमुळे गावागावांतील शांतता, जैवसंपदा आणि संस्‍कृतीसुद्धा नष्‍ट होण्‍याची भीती नागरिकांना वाटत आहे. परिणामी ठिकठिकाणी अशा मेगा प्रकल्‍पांविरोधात लोक रस्‍त्‍यांवर उतरू लागले आहेत.
Goa Mega Projects
Goa Mega ProjectsCanva
Published on
Updated on

Distrust in Government Grows as Goa Faces Mega Project Backlash

पणजी: रोजगाराच्‍या नावाखाली सरकार अनेक वादग्रस्‍त प्रकल्‍प जनतेच्‍या माथी थोपवू पाहत असल्‍याचा आरोप होऊ लागला आहे. या प्रकल्‍पांमुळे गावागावांतील शांतता, जैवसंपदा आणि संस्‍कृतीसुद्धा नष्‍ट होण्‍याची भीती नागरिकांना वाटत आहे. परिणामी ठिकठिकाणी अशा मेगा प्रकल्‍पांविरोधात लोक रस्‍त्‍यांवर उतरू लागले आहेत.

थिवी, कुडचिरे आणि वेलिंग-म्‍हार्दोळ-कुंकळये ग्रामसभांमध्‍ये पंचायत मंडळाला धारेवर धरून ग्रामस्‍थांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. ग्रामसभेला खूपच कमी लोकांची उपस्‍थिती असते. मात्र गावावर संकट आले की सर्व लोक एकत्र येतात, याची प्रचिती यानिमित्याने सर्वांना आली. लोकांनी रुद्रावतार धारण करून प्रकल्‍पाविरोधात ठराव घेण्यास पंचायतीला भाग पाडले. पंचायत मंडळानेही नमते घेऊन तसा ठराव घेतला. त्‍यामुळे ग्रामस्‍थांनी समाधान व्‍यक्त केले.

थिवीत तीव्र विरोध

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने दिलेल्या थिवी येथील २ लाख चौरस मीटर कोमुनिदादच्‍या जमिनीत उभारण्‍यात येणाऱ्या वर्ल्ड पीस खासगी विद्यापीठ प्रकल्पाला ग्रामस्‍थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सदर प्रकल्‍पामुळे गावातील जैवसंपदा, वनराई नष्‍ट होऊन आमचे अस्‍तित्‍वच धोक्‍यात येईल, असे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे. सदर सर्वेक्षण क्रमांकातील सुमारे साडेचार लाख चौरस मीटर जमीन वनक्षेत्र आणि गुरांसाठी चरण्‍याचे क्षेत्र म्हणून पूर्वी अधिसूचित केले होते. आता त्‍यात सरकार वेळोवेळी बदल करत आहे.

येथील स्थानिकांकडे शेळ्या, म्हशी, बैल आहेत. त्यांना चाऱ्याची आवश्यकता असते तसेच येथील बहुतांश लोक हे दुधाचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्यासाठी डोंगराचे मोल अधिक आहे. जागा प्रस्तावित करण्यापूर्वी सर्वेक्षण झाले आहे. त्यानुसार निम्म्याहून जास्त घरे जमीनदोस्त होणार आहेत. तूर्तास १५ हून जास्त घरे जातील, असा अंदाज आहे.

हा प्रकल्प नको, म्हणून विरोध करण्यासाठी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांची भेट घेतल्यावर त्यांनी पाठिंबा न देता उलट त्यांनी तुम्हाला इथे साफसफाई करण्याची कामे मिळतील, अशा भाषेत आमचा अपमान केल्याने स्थानिक आणखी नाराज झाले. हा प्रकल्प आणण्यामागे आमदाराचा हात आहे, असा दावाही स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

कुडचिरेवासीय आक्रमक

कुडचिरे येथील देवस्थान परिसरात सरकारच्या कचरा व्यवस्थापन महामंडळातर्फे प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ४४ हजार चौरस मीटर जमीन संपादित करण्यात आली आहे. या मुद्यावरून कुडचिरेवासीय आक्रमक बनले असून संपूर्ण गावच पेटून उठला आहे. ‘गावात कचरा प्रकल्प नकोच’ या मागणीवर ठाम असलेल्या कुडचिरेतील लोकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी व शक्तिप्रदर्शन केले आहे.

ग्रामस्‍थांनी देवाला गाऱ्हाणे घालून ‘‘गावावर आलेले संकट दूर करून प्रकल्प लादू पाहणाऱ्यांना सुबुद्धी दे’’ अशी प्रार्थनादेखील केली आहे. ऑगस्ट महिन्यात ग्रामस्‍थांनी रस्त्यावर उतरून भू-संपादन रोखण्याचा प्रयत्न केला होता.

वेलिंग ग्रामसभेत वज्रमूठ

कुंकळ्ये गावात भूखंड पाडण्याच्या प्रकार नुकताच घडला. कुंकळ्येत भूखंड पाडून ते विकण्याचा प्रकार चालला आहे त्यामुळे सामाजिक विषमतेला खतपाणी मिळत असून गावातील नैसर्गिक स्त्रोत नष्ट होण्याबरोबरच शांती भंग पावण्याचा धोका ग्रामस्‍थांनी व्यक्त केला आहे.

वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये पंचायतीच्या ग्रामसभेत निसर्गाला बाधा पोहोचविणाऱ्या कोणत्याच मेगा प्रकल्पाला परवानगी न देण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. गावची संस्कृती तसेच निसर्ग सांभाळताना पर्यवणीय संतूलन बिघडता कामा नये अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

Goa Mega Projects
Goa Crime: ..अखेर अट्टल गुन्हेगार गजाआड! 100 घरफोड्यांमध्ये सहभाग; जुने गोवे पोलिसांची यशस्वी कामगिरी

नवीन जेटीला हळदोण्यात विरोध

हळदोणे पंचायतीची ग्रामसभा नुकतीच पार पडली. त्यामध्ये हळदोण्यातील अस्तित्वात असलेल्या जेटी वगळता शासकीय किंवा खासगी जागेत कुठल्याही नवीन तात्पुरती किंवा कायमस्वरुपी जेटी उभारणीसाठी अनुमती देऊ नये असा ठराव पंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.

मांडल्या गेलेल्या प्रस्तावात पंचायत कार्यक्षेत्रात पर्यटन किंवा इतर कारणास्तव खासगी जेटी उभारण्यास प्रस्ताव पंचायतीकडे सादर करण्यात आलाय का? तसेच विद्यमान जेटीचे विस्तारीकरण केले जाणार का? असे प्रश्न मांडण्यात आले. अशा प्रस्तावास परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. सरपंचांनी जेटीसाठी प्रस्ताव पंचायतीकडे सादर झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानतर जेटीला परवानगी न देण्याचा निर्णय ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com