स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या 19 डिसेंबरपर्यंत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले होते, ते आश्वासन त्यांनी पाळले नाही. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांनी गोवा मुक्तीदिनाचे औचित्य साधत सरकारी नोकऱ्यांसाठी आझाद मैदानावर सोमवारी आंदोलन केले. गोव्याच्या मुक्तीसाठी ज्यांनी लढा दिला, त्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्यात सरकारला अपयश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन का पाळले नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उपस्थित केला.
स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे, परंतु तेवढा कोटाही सरकार भरत नाही. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी 19 डिसेंबरपूर्वी या मुलांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जाईल, असे सांगितले होते, परंतु हा आरक्षित कोटा का भरला जात नाही, असा सवाल करीत स्वातंत्र्यसैनिकांनी आझाद मैदानावर आंदोलन केले. अमित पाटकर, आमदार विरेश बोरकर यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. बोरकर म्हणाले, एका बाजूला राज्य 62 वा मुक्तीदिन साजरा करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना हक्कासाठी आंदोलन करावे लागते.
‘विधानसभा अधिवेशनात प्रश्न मांडणार’
यापूर्वी अंगणवाडीच्या सेविकांना आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर आंदोलन करावे लागले होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊनही ते सरकारने पूर्ण केलेले नाही. विरोधी पक्षनेत्यास आपण येत्या अधिवेशनात स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मांडण्यास सांगू, असे आश्वासन पाटकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.