Goa Latest Political News Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; सायबाच्या अडचणी वाढल्या

Goa Latest Political News: अधिवेशनाआधी विरोधी पक्षनेते सर्वच विरोधी आमदारांची काही दिवस आधी बैठक घेऊन सरकारला विरोध करण्‍याची रणनीती ठरवत असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

सायबाच्या अडचणी वाढल्या!

संकटे आली, की ती एकामागून एक येत असतात असे म्हटले जाते. पीआय विक्रम नाईक हे सध्या पदोपदी त्याचा अनुभव घेत आहेत. कोलवा येथील चर्चमधील घटनेनंतर त्यांची त्वरित कोलवा येथून दक्षिण गोवा पोलिस मुख्यालय राखीव दलात बदली करण्यात आली होती. एवढ्यावर सर्व निभावून जाईल, असे विक्रम सायबाला वाटत होते. पण कसले काय? नाईक यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे व गुन्हा दाखल करावा, अशी मागणी द कॅथॉलिक असोसिएशन ऑफ गोवाने पोलिस महासंचालकडे केली आहे. त्यामुळे आता या सायबाच्या अडचणी वाढल्या आहेत. ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी त्यांची गत झाली आहे. याचा अर्थ प्रत्येकानी आपल्या परीने घ्यावा, ‘समझनेवाले को इशारा काफी है! ∙∙∙

सात ‘साथ’ की चार–तीन?

राज्‍य विधानसभेचे अर्थसंकल्‍पीय अधिवेशन येत्‍या ६ मार्चपासून सुरू होईल आणि २५ मार्चला संपेल. गत अधिवेशनांप्रमाणेच या अधिवेशनातही विविध विषयांवरून सरकारला जेरीस आणण्‍याची तयारी विरोधी सातही आमदारांनी केलेली आहे. परंतु, काँग्रेस, आप आणि रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स (आरजीपी) तीन पक्षांत युतीवरून तापलेले राजकारण अजूनही कायम आहे. अधिवेशनाआधी विरोधी पक्षनेते सर्वच विरोधी आमदारांची काही दिवस आधी बैठक घेऊन सरकारला विरोध करण्‍याची रणनीती ठरवत असतात. पण, गत अधिवेशनाआधी आदल्‍या दिवशी युरी आलेमाव यांनी बैठक घेतली होती. त्‍यावरून प्रश्‍‍नचिन्‍ह उपस्‍थित झाले होते. आता काँग्रेसच्‍या तीन आमदारांच्‍या जोडीला गोवा फॉरवर्डचे एकमेव आमदार विजय सरदेसाई आहेत. परंतु, या चौघांना आपचे दोन आणि आरजीपीचा आमदार साथ देणार? की आपापल्‍या पक्षांचे अजेंडे घेऊन सभागृहात उभे राहणार याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. ∙∙∙

विनयरावांची पुन्‍हा मध्यस्थी

सध्‍या सावर्डेच्‍या राजकारणात आग विझविण्‍याच्‍या बंबाचे जर काम कुणी करत असेल तर ते माजी मंत्री आणि माजी खासदार विनयभाई तेंडुलकर हेच. यापूर्वी कुळे येथे दुधसागर वाहन चालकांचा वाद झाला त्‍यावेळी मध्‍यस्‍थी करण्‍यासाठी विनयभाईच पुढे आले होते. सध्‍या मिराबाग येथे बंधाऱ्याला विरोध करण्‍यासाठी लोक जमले त्‍यावेळी त्‍यांची समजूत काढण्‍यासाठी विनयभाईच पुढे आले होते. आता मोहन गावकर यांनी पत्रकारांना धमकी दिल्‍यानंतर विनयरावांनी पुन्‍हा एकदा मध्‍यस्‍थी करताना मोहन गावकर हे असे बोलणाऱ्यांतले नाहीत. चुकून त्‍यांच्‍याकडून हे वक्‍तव्‍य बाहेर आले असावे असे म्‍हणत त्‍यांच्‍यावतीने पाहिजे तर मी माफी मागतो असे म्‍हटले आहे. विनयरावांची प्रतिमा थंड डोक्‍याने राजकारण करणाऱ्यांपैकी आहे. मोहन गावकर प्रकरणातही त्‍यांनी याचीच प्रचिती आणून दिली आहे, असे म्‍हटल्‍यास वावगे ठरणार नाही. ∙∙∙

प्लॅन बी की प्लॅन ‘भाटीकर’?

सध्या राजकीय वर्तुळात एक हलकीशी हवा फिरते आहे, केतन भाटीकर म्हणे काँग्रेसच्या वाटेवर! आणि ही वाट सापडावी म्हणूनच मंत्री सुदिन ढवळीकर यांनीच नकाशा हातात दिला, असा संदेश पसरत आहे. म्हणे, प्लॅन ‘ए’ असतोच. पण प्लॅन ‘बी’ खिशात असलाच पाहिजे! या चर्चेत तथ्य किती आणि फक्त ‘फॅन्टसी’ किती, हे ढवळीकर बंधू आणि भाटीकरच जाणतात. पण जर हे खरं ठरलं तर फायदा कोणाचा? चाल कोणाची आणि मात कोणाची? आणखी गंमत म्हणजे, जर हा सगळा डाव खराच असेल, तर काँग्रेसचाच ‘घात’ होणार का? की काँग्रेसही या खेळात स्वतःचा वेगळाच ‘ट्विस्ट’ आणणार? सध्या तरी राजकारणात एकच चर्चा “ही फक्त चर्चा आहे की पुढची ‘ब्रेकिंग न्यूज’?” उत्तर येईपर्यंत सगळेच कान टवकारून बसलेत एवढं मात्र नक्की! ∙∙∙

...जागोरातलं बोलणं चर्चेत!

शिवोलीत सध्या एक वेगळीच चर्चा रंगली आहे. म्हणे, घरातीलच एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी शिवोलीत झालेल्या जागोरमध्ये सूचक शब्द टाकले होते आणि ते असे होते, की माजी मंत्री विनोद पालयेकर यांचे खरे रूप लोकांसमोर आलेच पाहिजे! तेव्हा अनेकांनी ते फक्त भावनेतून आलेले वाक्य म्हणून घेतले. पण आता घडामोडींची मालिका पाहता, काहीजण म्हणू लागलेत की तेव्हाच इशारा दिला होता! यामुळे त्या जागोरातील विधानाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. आता यात सत्य किती आणि खोटे किती? हे चर्चा करणारेच जाणतात. शिवोली मतदारसंघात वाऱ्याच्या वेगाने हा विषय पसरला आहे. ∙∙∙

व्यथा स्मार्ट राजधानीची!

राजधानी पणजी स्मार्ट सिटीत गणली जाते. देशातील स्वच्छ शहरांपैकी एक शहर म्हणून राष्ट्रीय पातळीवर गौरव देखील करण्यात आला. परंतु आजही एखादा कार्यक्रम आयोजित केल्यावर तेथील कचरा एक दोन आठवडे तसाच पडून राहतो. त्यावेळी पणजी महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभे राहतात. गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचे नाव दिलेल्या मैदानावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतात, मात्र नंतर कचरा पडून राहतो. स्मार्ट सिटी म्हणून मिरविले म्हणून होणार नाही, तत्काळ कचरा उचलत स्वच्छता करणे गरजेचे आहे. पणजी महानगरपालिकेतील अधिकारी नेमके करतात काय? त्यांचे खरोखरच लक्ष आहे का ? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. ∙∙∙

हरमलातील मसाज स्पा!

हरमलमधील लोकांना मसाज स्पा बंद करण्यासाठी लोक एकवटले आहेत. सोमवारी ग्रामस्थांनी पंचायतीत जाऊन सरपंचांना निवेदन दिले आहे. किनाऱ्यावरील मसाज पार्लर बेकायदा असल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे बेकायदा नाईट क्लबनंतर हरमलमधील १० मसाज पार्लर ग्रामस्थांच्या रडारवर आली आहेत. बर्च बाय रोमिओ लेन प्रकरणानंतर लोक जागृत होऊ लागले असून बेकायदेशीरपणाचा मुखवटा ते टराटरा फाडू लागल्याची चर्चा आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT