Goa Politics: खरी कुजबुज; दरोडेखोरांनाही कॅसिनोंचे आकर्षण

Khari Kujbuj Political Satire: मगो पक्षाचे अध्यक्ष तथा प्रियोळचे माजी आमदार दीपक भाऊंच्या कन्येच्या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ केरी - प्रियोळात आयोजित करण्यात आला होता.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

दरोडेखोरांनाही कॅसिनोंचे आकर्षण

मांडवीतील वाढत्या कॅसिनोंविरुध्द सध्या आंदोलन निर्माण होत आहे. या कॅसिनोंना सत्ताधाऱ्यांचा मूक पाठिंबा आहे, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. अन्यथा त्यांना वरचेवर जशी मुदतवाढ मिळाली, तसेच छोट्या कॅसिनोंच्या जागी अवाढव्य कॅसिनो आले तसे ते आलेच नसते. गोव्यात खाणव्यवसाय जोरांत चालत होता. त्यावेळी त्यांतून नवश्रीमंत झालेल्यांची मुले महागड्या गाड्या घेऊन तेथे जात असत असे म्हटले जात होते. पण खाणी बंद झाल्या तरी कॅसिनोंची संख्या काही घटली नाही, उलट वाढली असे म्हटले. बेंगळूर पोलिसांनी तेथील न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार तेथील एटीएम दरोड्याप्रकरणी पकडलेल्या टोळींतील दरोडेखोर म्हणे गोव्यातील कॅसिनोत खेळण्यासाठी एटीएम फोडतात आणि ते पैसे कॅसिनोत उधळत आहेत? कॅसिनोंचे आकर्षण दरोडे टाकण्यास प्रवृत्त करतात. ∙∙∙

फोंड्यात इच्छुकांची चाचपणी!

फोंड्यातील पोटनिवडणूक अजून जाहीर व्हायची आहे, पण त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे. वास्तविक ही पोटनिवडणूक होऊन साधारण आठ महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत उभे राहून काय विकास साधणार? असा प्रश्‍न इच्छुक उमेदवारांना पडला आहे. तरीपण या पोटनिवडणुकीत जिंकलो, तर २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत निश्‍चितच पुन्हा एकदा जिंकू असा विश्‍वास इच्छुकांना आहे, त्यामुळेच तर हा सगळा आटापिटा चालला आहे. कोण जिंकणार आणि कोण हरणार? हे काळच ठरवणार आहे, पण ह्याला या पक्षातून उमेदवारी मिळणार, हा हा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळणार, हा कदाचित माघार घेईल, अशा चर्चा मात्र फोंड्यातील नाक्यानाक्यावर होताना दिसत आहे. ∙∙∙

दीपकरावांना पुन्हा एकदा संधी!

मगो पक्षाचे अध्यक्ष तथा प्रियोळचे माजी आमदार दीपक भाऊंच्या कन्येच्या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ केरी - प्रियोळात आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्याला येणाऱ्यांचे स्वागत खुद्द मगो पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर करताना दिसले. अर्थातच सुदिनराव हे मितभाषी आणि नम्र स्वभावाचे असल्याने त्यांच्या स्वागताचा स्विकार उपस्थितांनी केलाच, पण स्वागत सोहळ्याला झालेली प्रचंड गर्दी मात्र वेगळेच सांगून गेली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दीपकरावाना पुन्हा एकदा संधी आहे, हेच ते...! ∙∙∙

अमित पाटकरांचा विश्वास!

फातोर्ड्यात गोवा फॉरवर्डतर्फे कार्निव्हल धुमधड्याक्यात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व प्रभारी माणिकराव ठाकरे सुद्धा उपस्थित होते. पाटकर यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत गोव्यात पुढील सरकार गोवा फॉरवर्ड व कॉंग्रेसचे असेल असे जाहीर करुन टाकले. शिवाय आमचे सरकार सत्तेत आल्यावर ‘गोमंतकीयांनी खाओ, पिओ व मजा करो’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या वेळी गोवा फॉरवर्ड, काँग्रेस. रिव्होल्युशनरी गोवन्स. आम आदमी या सर्व पक्षांचे नेते एकत्र येऊन त्यांनी हातात हात सुद्धा घेतला होता. नंतर जिल्हा पंचायतीत रेव्होल्युशनरी गोवन्स व आम आदमी पक्षांनी स्वतःचा रस्ता पकडला. निकाल काय लागला? भाजपाचे आयतेच मिळाले. यावेळी दोनच पक्ष आहेत. तरीसुद्धा इतर विरोधी पक्षांना सुद्धा घेऊन फॉरवर्ड गेले, तरच बदल शक्य आहे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. ∙∙∙

बाबूशच्या यादीत बदल होणार?

महानगरपालिका निवडणुकीसाठी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील ‘टुगेदर फॉर ए प्रोग्रेसिव्ह पणजी‘ या पॅनलखालील संभाव्य उमेदवारांची यादी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली. त्यामुळे या पॅनलकडून उमेदवार जाहीर करण्याची वेळ पुढे ढकलण्यात आली. यापूर्वीपासून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आदल्या दिवशी बाबूश यांच्याकडून आपल्या पॅनलचे उमेदवार जाहीर होत असत. पण संभाव्य उमेदवारांची यादीविषयी खासगी वृत्तवाहिन्यांनीही वृत्त प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाल्याने या पॅनलने उमेदवार अजूनही निश्चित झाले नाहीत, म्हणून खुलासा केला आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती, त्यांच्या आशा म्हणे पल्लवीत झाल्या आहेत. काहीजणांनी त्याविषयी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे कानोसाही घेतला. यावरून आता प्रोग्रेसिव्ह पणजी पॅनलचे संभाव्य उमदेवारांची यादी कायम राहणार की त्यात बदल होऊन ५० टक्के खरोखरच नवे चेहरे दिसणार हे पहावे लागणार आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'काँग्रेसने आळस झटकून कामाला लागावे'! सरदेसाईंचा सल्ला; कार्निव्हलमध्ये दिली विजयाची खात्री

विशालबाब आपण कुठल्या पक्षात?

‘शिशे के घर मे रहने वाले, दुसरो के घर पर पत्थर नही फेकते है।’ असे हिंदीत एक बोध वाक्य आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे वागणे पाहिल्यास खरेच काँग्रेस सत्तेत येण्यासाठी उत्सुक आहे का? असा प्रश्न आम जनतेला पडणे स्वाभाविक. युरी यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी राज्यांत ‘ग्रँड ओपोजिशन अलायान्स’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याला हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. परवा फातोर्डा कार्निव्हाल उत्सवाच्या वेळी विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे अमित पाटकर यांनी काँग्रेस गोवा फॉरवर्ड युतीची घोषणा केली. यावेळी अमित पाटकर यांच्या सोबत युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित शांताराम नायक होते. काँग्रेसचे आमदार व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांचे प्रखर टीकाकार विशालही होते. तसा फोटो ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र त्या फोटोत विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव दिसत नाहीत. विशाल हे गृहस्थ काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहे की गोवा फॉरवर्डचे हे मात्र माहीत नाही. जिथे विशाल तिथे युरी नाही, अशी पोस्ट आता व्हायरल व्हायला लागली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; विजयचा ‘नेहले पे देहला'

रात्रीच्‍यावेळी रान मोकळे का?

बांदोडकर मार्गावर वाहतूक कोंडी झाल्‍यानंतर वाहन चालक पणजीतून बाहेर पडण्‍यासाठी सर्रास पाटो–पणजीतील जुन्‍या पुलाचा वापर करीत असतात. परंतु, या पुलाच्‍या आसपास असलेल्‍या काही बारमध्‍ये रात्रीच्‍यावेळी जाणारे स्‍थानिक आणि पर्यटक आपली वाहने पुलावरच पार्क करीत असल्‍यामुळे वाहन चालकांसमोर अनेक समस्‍या उभ्‍या राहत आहेत. एरव्‍ही, या भागात दिवसभर उभे राहून वाहतूक पोलिस अशा वाहन चालकांना चलन देत असतात. पण, रात्रीच्‍यावेळी मात्र ते त्‍यांच्‍यासाठी रान मोकळे का सोडतात? असा प्रश्‍‍न स्‍थानिकांना वारंवार पडत आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com