

पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील दोन्ही विमानतळांवर फास्ट ट्रॅक इमिग्रेशन– ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम (एफटीआय–टीटीपी) सुरू करण्यास मंजुरी दिली असून, लवकरच ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
त्यामुळे राज्यात येणाऱ्या देशी–विदेशी पर्यटकांची कागदपत्रे आणि पासपोर्ट तपासणीची प्रक्रिया अवघ्या ३० सेकंदात होईल. या सुविधेमुळे गोव्याकडे नवे पर्यटक आकर्षित होतील, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मंत्री खंवटे यांनी पर्यटनासंदर्भात प्रथम केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांच्याशी गोव्याच्या पर्यटनाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा केली.
‘राज्यातील दोन्ही विमानतळांवर ‘एफटीआय–टीटीपी’ सुविधा निर्माण झाल्यास गोव्यातील पर्यटनाला त्याचा आणखी फायदा कसा मिळेल, याची सविस्तर माहिती आपण शहा यांना दिली.
केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे आपण पर्यटकांचा गोवा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर व्हावा यासाठी देशातील इतर सहा मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांप्रमाणेच गोव्यातील मोपा आणि दाबोळी विमानतळांवर ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’ सुविधा तत्काळ सुरू करावी, ‘ओपन स्काय’ धोरणांतर्गत आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना गोव्यात थेट उड्डाणे सुरू करण्याची परवानगी द्यावी तसेच पर्यटनक्षेत्रातील साधनसुविधा वाढवण्यासाठी अतिरिक्त प्रकल्पांवर भर देण्यात यावी’ अशा मागण्या आहेत.
- रोहन खंवटे, मंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.