Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics : खरी कुजबुज: डॉ. प्रमोद सावंतांना मिळणार एक्स्टेंशन?

Khari Kujbuj : आता मंत्रिमंडळ बदल झाल्यास दिगंबर कामत यांची वर्णी नक्की लागेल अशी चर्चा आहे. कामत यांना दोन वर्षे भाजपात येऊनही मंत्रिमंडळाबाहेर राहावे लागले याची खंत आहे. शिवाय ते खूप निराश बनले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. प्रमोद सावंतांना मिळणार एक्स्टेंशन?

‘भगवान देता हैं, तो छप्पर फाड के देता हैं’ असे म्हणतात ते खरे. एक देश एक निवडणूक हे मोदी सरकारचे मिशन लवकरच अस्तिवात येणार आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास २०२९ ला लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. गोवा विधानसभेचा कार्यकाळ २०२७ ला संपत आहे.

जर सर्व विधानसभा. निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या झाल्या,तर गोवा विधानसभेला दोन वर्षांचे एक्स्टेन्शन मिळणार आहे. याचा अर्थ असा की, ‘एक देश एक निवडणूक’ अंमलात आल्यास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही दोन वर्षाचे ‘एक्स्टेन्शन’ जरूर मिळणार असा होतो.आम्ही नव्हे.भाजप समर्थकच तसे सांगताहेत. अनेक सरकारी अधिकाऱ्यांना वेळो वेळी डॉ. सावंत सरकारने सेवावाढ दिली आहे. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनाच सेवावाढ मिळणार म्हटल्यावर ‘सोने पे सुहागा’च नव्हे का?∙∙∙

कथा भूमिगत केबलची

गोव्याच्या विविध भागांत हजारो कोटी खर्चून भूवीज केबल घालण्याची कामे दिली जात आहेत व त्या कामाचे शिलान्यासही धूमधडाक्यात होत आहेत. पण प्रत्यक्षांत ही कामे कधी होतील व सुरळित वीजपुरवठा कधी होईल अशी विचारणा मात्र सर्वसाधारण लोक करत आहेत. कारण अनेक भागांत रस्त्यांच्या कडा खोदून अशा केबल घातल्या जातात पण ट्रान्स्फॉर्मर बसविले गेलेले नाहीत तर काही ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर बसविले गेले पण अजून केबलीच घातलेल्या नसल्याने हे नेमके काय चालले आहे, असा प्रश्न पडत आहे.

काणकोण तालुक्यात माशे-लोलये व पैंगिण सारख्या भागांत केबल घालून आता वर्ष उलटले आहे पण त्या पुढील पावले उचलून घरगुती जोडण्या दिल्या गेल्या नाहीत. तर त्या उलट नावेली मतदारसंघात मोजक्याच भागांत केबल घातल्या गेल्या पण तिने अजून ट्रान्स्फॉर्मर बसविले गेलेले नाहीत. दवर्ली सारख्या भागांत केबल न घालतांच ट्रान्स्फॉर्मर बसविली गेली आहेत. त्यामुळे तेथे केब कधी टाकणार व त्या ट्रान्स्फॉर्मरांना कधी जोडणार, असा मुद्दा उपस्थित होत आहे. काहीं जण तर हे प्रकार कंत्राटदारांच्या सोयीसाठी सुरू असल्याचे म्हणतात. ही कामे करताना वीजखात्याचे लोक मात्र कुठे दिसत नाहीत.∙∙∙

कामत यांचे भवितव्य

आता मंत्रिमंडळ बदल झाल्यास दिगंबर कामत यांची वर्णी नक्की लागेल अशी चर्चा आहे. कामत यांना दोन वर्षे भाजपात येऊनही मंत्रिमंडळाबाहेर राहावे लागले याची खंत आहे. शिवाय ते खूप निराश बनले आहेत. कोणतेही खाते द्या व कोणत्याही क्रमांकावर ठेवा, पण मंत्री बनवा, असा घोशा त्यांनी चालविला आहे. अलीकडे त्यांनी विश्‍वजित राणे यांच्याशीही जुळवून घेतले आहे.

त्यांना मंत्रिमंडळात घेतले तरी ते क्रमांकाने अगदी शेवटचे मंत्री असू शकतात. यापूर्वी पार्सेकर मंत्रिमंडळात राजेंद्र आर्लेकर यांना मंत्री बनविण्यात आले होते, तेव्हा ते क्रमांकाने अगदी शेवटचे मंत्री बनले होते. अगदी आवेर्तान फुर्तादो हेसुद्धा क्रमांकाने त्यांना ज्येष्ठ बनले होते. तसेच काहीसे कामत यांच्या नशिबी असेल...

मंत्रिमंडळ बदलास मुहूर्त?

मंत्रिमंडळ बदलाची चर्चा सुरू झाली आहे, परंतु हा बदल किती लवकर होईल, याची चर्चा राजकीय दरबारात सुरू आहे. लोकसभा अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. त्यात सत्ताधारी आघाडी मजबूत बनविण्यात आली आहे व त्यामुळे सर्व सत्ताधारी खासदारांना सभागृहात थांबण्याचे आदेश आहेत,

त्यात जे. पी. नड्डा व अमित शहा यांनाही पूर्णवेळ संसदेत दक्ष राहावे लागते. त्यामुळे महाराष्ट्र व गोव्यावर चर्चा करायला कोणालाच वेळ नाही. त्यानंतर सर्वजण आराम करण्यासाठी राजधानीतून दूर जातील. नंतर नाताळ. त्यानंतरच गोव्यावर विचार करायला केंद्रीय नेत्यांचा वेळ मिळू शकतो, अशी चर्चा आहे. ∙∙∙

पार्किंग शुल्‍क, पण गाड्यांची सुरक्षा नाही

गोव्‍यात पर्यटन मौसम सुरू झाल्‍याने राज्‍यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी करण्‍यास सुरुवात केली आहे. काणकोणच्‍या पाळोळे समुद्र किनाऱ्यावरही पर्यटकांची अशीच गर्दी होत आहे. पर्यटकांची वाहने पार्क करुन ठेवण्‍यासाठी पार्किग पालिकेने तेथे पार्किंग तळ उभारलेला आहे. या तळावर गाडी पार्क करण्‍यासाठी दर दिवसासाठी १४० रुपये आकारले जातात.

पण या जागी पार्क करणारी वाहने पर्यटकांनी स्वतःच्या जोखमीवर पार्क करावी, असे म्‍हणत पालिकेने या वाहनांच्‍या सुरक्षेची जबाबदारी नाकारली आहे. यावर गजानन बोरकर नावाच्‍या एका व्‍यक्‍तीने आपल्‍या फेसबुकवर एक पोस्‍ट टाकली आहे त्‍यात ते म्‍हणतात, जर वाहनांच्‍या सुरक्षेची जबाबदारी पालिका घेत नसेल तर पर्यटक त्‍या ठिकाणी येणारच कशाला? यावर काणकोण पालिका काही उत्तर देईल का? ∙∙∙

दक्षिण गोवा बैठकीतही कुरबूर

South Goa :दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेश समितीच्या पणजीत झालेल्या बैठकीत गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या समोर पदाधिकाऱ्यांचे मतभेद उफाळून आल्याची घटना ताजी असताना काल मडगावात झालेल्या दक्षिण जिल्हा बैठकीतही पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत कुरबुरी उफाळून वर आल्या.

खरे तर या बैठकीला १२० सदस्यांपैकी ३५ सदस्यच बैठकीला उपस्थीत होते. मात्र त्यांनाही त्यांच्या प्रश्र्नांची व्यवस्थित उत्तरे न मिळाल्याने बरेच जण बैठकीतून उठून गेले, असे सांगण्यात आले. एका बाजूने गोव्यात काँग्रेस पुढच्या निवडणुका स्वबळावर लढवू पाहत असताना दुसऱ्या बाजूने काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये ही अशी अस्वस्थता. हे कशाचे बरे द्योतक म्हणावे? ∙∙∙

योगेश हिमनगाचे टोक; अनेक कारनामे गुलदस्त्यात

मडगाव नगरपालिकेतील योगेश शेटकरचे नवनवे कारनामे दिवसागणिक बाहेर येत आहेत. तसे पाहिले तर असे शेटकर निरनिराळ्या रुपाने मडगाव पालिकेच्या पाचवीलाच पूजलेले आहेत. मुळात या गृहस्थाचा लेखा विभागाशी कोणताच संबंध नसताना त्याला फेस्त फेरीचे शुल्क गोळा करण्याचे काम कोणी सोपविले होते. तसेच गोळा झालेले शुल्क रोजच्या रोज पालिकेत जमा करण्यापासून कोणी रोखले त्याचे उत्तर आज आठ ते नऊ महिने उलटले तरी मिळालेले नाही.

यावरून या प्रकरणात अनेकांचे हात अडकल्याचा आरोप होत आहे. पालिकेतील तसे अनेक प्रकार अशा प्रकारे उत्तराविना पडून आहेत. अशा प्रकरणाशी संबंधित अधिकारी निवृत्त होऊन घरी गेले आहेत. पण त्यांच्या प्रकरणात खोलाशी जाण्याची कोणाची तयारी नाही. नगरपालिकेने खरेदी केलेल्या ई रिक्षा असोत, पदपथ स्वच्छ करण्यासाठी घेतलेले यंत्र असो वा चौतीस लाख खर्चून खरेदी केलेले व वापराविना गॅरेजमध्ये पडून असलेले टाटा ट्रक असोत पण त्यांच्या खोलात जाऊन तपास करण्याची इच्छा कोणालाच नाही. त्यामुळे शेटकर प्रकरणही दिवस जातात तसे असेच फाईलबंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT