
MLA Praveen Arlekar opposes Sunburn Festival
मोरजी: जरी पर्यटन खात्याने या महोत्सवाला परवानगी दिली असली तरी, आजपर्यंत स्थानिक नागरिकांकडे, स्थानिक आमदाराकडे याविषयी चर्चा केलेली नाही. ज्या पद्धतीने सुरुवातीपासून धारगळ पंचायत क्षेत्रात आणि पर्यायाने पेडणे मतदारसंघात सनबर्न महोत्सव होऊ देणार नाही, असा इशारा आपण लोकांच्या साक्षीने दिला होता. तोच निर्णय आपला अखेरपर्यंत राहणार आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात पोहोचलेले आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आमची भूमिका स्पष्ट होणार असल्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.
पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सुरुवातीपासून धारगळ पंचायत क्षेत्रात आणि पर्यायाने मतदारसंघात कुठल्याही परिसरात सनबर्न होण्यास आपला विरोध असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी भव्य जाहीर सभेचे आयोजन केले त्याला पेडणे तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य कार्यकर्त्यांनी या सभेला प्रतिसाद दिला होता.
त्यावेळी उपस्थित आणि आम्ही सर्वजण सनबर्न उधळून लावू, आमदार प्रवीण आर्लेकर हे रस्त्यावर उतरले तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा सर्वांनी दिला होता. त्या वेळेपासून धारगळ पंचायत क्षेत्रात दोन गट निर्माण झाल्याचे दिसून येत आहेत. एक गट सनबर्न महोत्सवाला पाठिंबा देतो, तर दुसरा गट सनबर्नला विरोध करत आहे. या संदर्भात उलट सुलट प्रतिक्रिया ही ऐकायला मिळतात.
दरम्यान, धारगळ ग्रामसभेमध्ये सनबर्नसाठी विरोध दर्शवणारा ठराव मंजूर झाला. त्यानंतर आठ दिवसांरी पंचायत मंडळाची १५ दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत मात्र पाचविरुद्ध चार मतांनी सनबर्नचा ठराव मंजूर केला होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची धारगळ सरपंच सतीश धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ गटाने भेट घेतली. या गटाने सनबर्न महोत्सवाला पाठिंबा दिल्यानंतरही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या मंडळाचे स्वागत केले आणि विकासालाही प्राधान्य देताना सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे सरपंच सतीश धुमाळ यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.