गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे सत्तरी भागातील गावठी मिरची लागवड व उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. अनेक दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे व दमट हवामानामुळे मिरची उन्हात सुकविण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
तसेच पावसामुळे पिकलेली मिरची झाडावरच कुजत आहे व काळी पडत आहे. त्यामुळे तोंडावर आलेले पीक नष्ट होताना दिसत आहे.
गावठी मिरचीला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सध्या मिरची ४०० ते ६०० रुपये किलो दराने विकली जात आहे. जर असाच पाऊस पडत राहिला तर उरलेली मिरची खराब होणार आहे. सकाळच्या वेळी दमट हवामान व सायंकाळी पाऊस त्यामुळे मिरची वाळविणार कशी हा मोठा प्रश्न आहे. सत्तरीत ग्रामीण भागात मिरचीची लागवड केली जाते.
सरकारने नुकसान भरपाई द्यावी!
शिरोली-केरी-सत्तरी येथील महेश गावस यांनी सांगितले की, आम्ही मिरचीबरोबरच इतर पिकेही घेतो. मात्र, गेल्या महिन्यात गव्यानी शेतीची नासधूस केली व आता अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात उत्पादन मिळणार होते त्यालाही फटका बसला आहे.
दमट हवामान व पावसामुळे पिकलेली मिरची झाडावरच काळी पडून कुजत आहे. सध्या पिकलेली मिरची काढून घरातच वाळत घालण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
यंदा सत्तरीत गावठी मिरचीचे उत्पादन चांगले आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे मिरचीला फटका बसला आहे. पावसामुळे पिकलेल्या मिरचीवर पाणी राहते व मिरची काळी पडून कुजते. मे महिन्यातील कडक उन्हामुळे मिरची पिकून ती चांगल्याप्रकारे वाळवायला मिळायची. मा,त्र महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाने हजारे लावल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
- विश्वनाथ गावस, वाळपई विभागीय कृषी अधिकारी
(Edited By - सपना सामंत)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.