Goa Police Recruitment: पोलिस खात्यात 28 थेट पोलिस उपअधीक्षक भरतीच्या जाहिरातीला तसेच गोवा पोलिस नियम 2022 दुरुस्तीला आयआरबी व गोवा पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे.
या दोन वेगवेगळ्या याचिकांवरील प्राथमिक सुनावणीनंतर खंडपीठाने कामकाजात दाखल करून घेऊन अंतिम सुनावणीसाठी त्यावरील सुनावणी तहकूब केली आहे. या याचिकांमधील निवाडा या उपअधीक्षक भरती निवड प्रक्रियेला बंधनकारक असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) दामोदर विश्वनाथ नाईक व 9 जणांनी तसेच गोवा पोलिस निरीक्षक परेश नावेलकर यांनी सध्या सुरू असलेल्या पोलिस उपअधीक्षक भरतीला आव्हान दिले आहे. ही थेट उपअधीक्षक भरती प्रक्रिया रद्द करावी अथवा याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला स्थगिती द्यावी, अशी विनंती याचिकांमध्ये करण्यात आली आहे. गोवा लोकसेवा आयोगाने 25 ऑगस्ट 2023 रोजी पोलिस खात्यातील उपअधीक्षक भरतीसाठी जाहिरात दिली आहे. या भरतीसाठी गोवा पोलिस सेवेतील नियमांमध्येही दुरुस्ती करून नव्याने हे नियम तयार करण्यात आले आहेत.
25 वर्षांहून अधिक काळ रखडली भरती
1 यापूर्वी थेट उपअधीक्षक भरती 50 टक्के तर बढतीद्वारे 50 टक्के असे प्रमाण ठेवून केली जात होती. त्यानंतर हे प्रमाण 80 टक्के बढतीद्वारे तर 20 टक्के थेट भरतीसाठी ठेवण्यात आले होते. हल्लीच नव्याने 60 टक्के बढतीद्वारे तर 40 टक्के थेट उपअधीक्षक भरतीद्वारे करण्यात आले आहे.
2 त्यामुळे गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ थेट उपअधीक्षक भरती न केल्याने त्याच्या राहिलेल्या २८ जागा आता भरण्यात येत आहेत. त्यामुळे १० वर्षांहून अधिक काळ पोलिस निरीक्षक पदावर असलेल्यांवर तसेच बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्यांवर हा अन्याय आहे.
3 या थेट भरतीमुळे अनेक पोलिस निरीक्षक या पदावरच सेवानिवृत्त होणार आहेत. खात्यांतर्गत मिळणारी उपअधीक्षक बढती अनेक वर्षे होणार नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
गोवा लोकसेवा आयोगामार्फत भरती
सध्या गोवा लोकसेवा आयोगामार्फत थेट पोलिस उपअधीक्षकाची भरती प्रक्रिया सुरू आहे. 28 जागांसाठी 58 उमेदवार आयोगाने घेतलेल्या पूर्वचाचणी परीक्षेत पात्र ठरले आहेत. ही संख्या खूपच असल्याने आयोगाने 32 उमेदवारांना फेरपूर्वचाचणी परीक्षेसाठी संधी दिली आहे. त्याची परीक्षा रविवारी (ता.५) झाली आहे. या उपअधीक्षकांची निवड झाली तरी याचिकेतील निकालावर त्यांची नियुक्ती बंधनकारक राहणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.