Goa Cabinet Reshuffle: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दक्षिण गोव्यातील जागा जिंकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फर्मागुडी येथे 16 एप्रिल रोजी सभा झाली. ही सभा झाल्यापासून राज्यात मंत्रीमंडळ फेरबदलाची चर्चा रंगली आहे. आणि दिवसेंदिवस या चर्चेत भरच पडत चालली आहे.
नव्या माहितीनुसार आता 10 मे पुर्वी राज्य मंत्रीमंडळात फेरबदल होऊ शकतात. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच तसे संकेत दिले आहेत. याबाबतचे वृत्त इंग्रजी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज, 24 एप्रिल रोजी त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्त राज्यातील विविध प्रसारमाध्यमांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यातीलच एका मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी, कर्नाटक विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात मंत्रीमंडळात फेरबदल होतील, असे संकेत दिले आहेत.
सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे. म्हणजेच 10 मे पुर्वी गोव्यात मंत्रीमंडळात फेरबदल होऊ शकतात. याचा अर्थ आगामी दोन आठवड्यात गोव्यातील मंत्रीमंडळाबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकते.
त्यामुळेच आता राज्यातील मंत्रीमंडळ फेरबदलाला काही दिवस उरले आहेत, हे स्पष्ट झााल्याची चर्चा आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासूनच राज्याच्या राजकीय वर्तुळात मंत्रीमंडळात कुणाला स्थान मिळणार याची चर्चा सुरू आहे. यात आलेक्स सिक्वेरा यांचे नाव सर्वात वर आहे.
त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल, हे पक्के मानले जात आहे. तर दुसरे महत्वाचे नाव आहे दिगंबर कामत यांचे. तथापि, कामत हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपद देण्यापेक्षाही त्यांना केंद्रात भाजपकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
तथापि, जर सिक्वेरांना मंत्रीमंडळात स्थान द्यायचे तर सध्याच्या मंत्रीमंडळातील कुणाला तरी वगळावे लागणार आहे. यात मच्छिमार मंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे मंत्रीपद धोक्यात असल्याची चर्चा आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे.
शक्य तितक्या लवकर नव्या मंत्र्यांना मंत्रीमंडळात समाविष्ट करायचे आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वीच हे फेरबदल होतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.