मंगेश बोरकर
मडगाव येथे माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित केलेल्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने तेथील रवींद्र भवनचा परिसर पाच दिवस मुलांच्या चिवचिवाटाने गजबजून गेला होता. यंदा या चित्रपटाचे तिसरे वर्ष. गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदाच्या महोत्सवाला शाळा व्यवस्थापन व पालकांकडून अधिक प्रतिसाद लाभला. त्यामुळे ५० हजारांपेक्षा जास्त मुले या महोत्सवाचा आनंद घेऊ शकली.
यंदाचा हा चित्रपट महोत्सव निव्वळ चित्रपट पाहण्यापुरता मर्यादित नव्हता, तर मुलांना नाविन्यपूर्ण गोष्टी शिकवणे, वेगवेगळ्या कार्यशाळांतून त्यांची सर्जनशीलता विकसित करणे, हादेखील महोत्सवाचा उद्देश होता. केवळ मुलांसाठीच नव्हे, तर पालक व शिक्षकांसाठी देखील विविध कार्यशाळा, स्पर्धा व सत्रे आयोजित केली होती.
यंदा फ्रान्स, बेल्जियम, कॅनडा, रशिया, पोलंड, इराण, द. आफ्रिका, जर्मनी, भारत या देशांसह एकूण ३८ देशांमधील ७३ विविध विषयांवरील चित्रपटांचे प्रदर्शन झाले.
प्रत्येक चित्रपट हा मुलांवर संस्कार घडविणारा, त्यांच्या जीवनातील पुढील ध्येय काय असू शकते, याचा अंदाज देणारा होता. यंदाच्या महोत्सवाची थीम होती- ‘प्राणी आणि निसर्ग’. त्यामुळे या महोत्सवात अधिकाधिक चित्रपट हे प्राण्यांवर आधारित होते. प्राण्यांमध्येही प्रेम असते. त्यांनाही भावना असतात, हा संदेश या चित्रपटांतून देण्यात आला.
बेल्जियमहून आलेले सिने निर्माते, सिने दिग्दर्शक गर्ट नेकेरब्रोक तसेच हिल्डे स्टेनसेन्स ही मंडळी मुलांचा उत्साह पाहून भारावून गेली.
त्यांनी विद्यार्थ्यांना चित्रपट तयार कसा करावा, कसा पाहावा व कसा अनुभवावा, यावर उत्तमरित्या प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. संगीत, चित्रपटाचा ट्रेलर, चित्रपटाची सुरुवात, दृश्ये व पोस्टर पाहून सिनेमा कसा समजावा, याची विस्तृत माहिती त्यांनी दिली.
गृहिणींसाठी आयोजिलेल्या खास कार्यशाळेत पुणे येथील मधुरा बचल यांनी उपस्थितांना खाद्यपदार्थांच्या सोप्या आणि उपयुक्त टिप्स दिला. त्यांच्या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद लाभला. मधुरा यांनी महाराष्ट्रीयन, भारतीय व जागतिक विविध खाद्यपदार्थांची माहिती कार्यशाळेत दिली.
दुसऱ्या एका कार्यशाळेत पालकत्वाचे महत्त्व व ते कसे करावे, याबद्दलचे मार्गदर्शन शिक्षणतज्ज्ञ दिलीप बेतकेकर यांनी केले. त्याशिवाय थ्रीडी मास्क मेकिंग, ज्वेलरी मेकिंग, भांडी तयार करणे, रोपट्यांची लागवड यावरील कार्यशाळेत तसेच आर्ट गॅलरी, टेलिस्कोप, प्लेनेटरियम डोम पाहण्यासाठी मुलांनी गर्दी केली होती. ‘सायबर गुन्हे कसे टाळता येतील’ या विषयावर रक्षित टंडन यांनी मुलांना केलेल्या मार्गदर्शनालाही भरघोस प्रतिसाद लाभला.
साप व सरपटणारे प्राणी यावरील सौमित्र रानडे यांचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांनी मुलांना या प्राण्याविषयी चांगली माहिती मिळाली. या प्राण्यांचे पर्यावरणीय महत्त्व यावर त्यांनी जास्त भर दिला. यंदाचा हा बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव मुलांना अदभुत अनुभव देणारा ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.