खरी कुजबुज Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: भाजप देणार नवे चेहरे?

Khari Kujbuj Political Satire: ‘जुने ते सोने’ म्हणण्याचे धाडस करायला भाजप तयार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरून कळून येते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पोलिसांचे ठरलेले नाटक!

पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आणि त्याचा व्हिडिओही बाहेर आला. आता व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल्याचे दाखवले; पण खरे तर लोकांना आश्चर्य व्हिडिओचे वाटले की त्यांना पकडल्याचे, हा संशोधनाचा विषय आहे! आता पोलिस लाच घेतात की नाही, यावर चर्चा करण्याची गरज नाही; कारण सर्वांनाच याबाबत माहिती आहे. फरक इतकाच की यावेळी पुरावा कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे लगेच चौकशीचे आदेश निघाले. पोलिस अधीक्षकांनी उपअधीक्षकांना चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आता पुढचा चित्रपट सर्वांनाच पाठ आहे. आधी निलंबन, मग चौकशी, त्यानंतर काही काळ शांतता आणि मग योग्यवेळी पुनरागमन! त्यामुळे अनेकजण म्हणू लागले आहेत की, जर शेवट आधीच ठरलेला असेल तर मध्ये हे नाटक कशाला? ∙∙∙

त्यांच्या हातात पाण्याची बिले!

स्मार्ट वीज मीटरच्या वाढीव बिल आणि दंड आकारणीविरोधात आम आदमी पक्षाने वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या बांदोडा येथील निवासस्थानावर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढला. या मोर्चावर ‘मगो’च्या काही नेत्यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही; परंतु यात महत्त्वाची बाब म्हणजे ‘मगो’च्या नेत्यांना मोर्चात सहभागी झालेल्यांच्या हातात पाण्याची बिले असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी जाहीरपणे त्यावर टिप्पणी केली आहे. आता आम आदमी पक्षाचे नेते यावर काय म्हणतात, हे पाहावे लागणार आहे. खरोखरच आंदोलकर्त्यांच्या हातात वीज बिलांऐवजी पाण्याची बिले होती काय? आणि असतील तर ती कोणी आणली? याचा आता ‘आप’चे कार्यकर्ते तपास घेत आहेत. ∙∙∙

छत्र्यांचे राजकारण!

म्हापसा मतदारसंघात सध्या उन्हाळा संपून पावसाळा लागला असला, तरी राजकीय वातावरण मात्र भलततेच तापलेले दिसते. निमित्त मार्केटमधील छत्र्या! झाला प्रकार असा की, आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले एक इच्छुक सामाजिक कार्यकर्ते सध्या भलतेच सक्रिय झाले आहेत. सत्ताधारी पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. उदात्त हेतूने त्यांनी म्हापसा मार्केटमधील विक्रेत्यांना पावसापासून बचावासाठी मोठ्या छत्र्यांचे वाटप केले. विक्रेतेही सुखावले; पण हा सुखद गारवा विद्यमान लोकप्रतिनिधींच्या गोटात मात्र उकाडा निर्माण करून गेला. तिकीट कापले जाण्याच्या भीतीने की काय, विद्यमान साहेबांच्या जवळच्यांना हे समाजकार्य अजिबात रुचले नाही. मग काय, थेट वरून फर्मान सुटले, मार्केटमध्ये व्यवसाय करायचा की छत्र्या मिरवायच्यात? नको ती छत्री आणि नको तो राजकीय पाऊस म्हणत, बिचाऱ्या विक्रेत्यांनी त्या नवीन छत्र्या मुकाट्याने गुंडाळल्या आणि आपल्या जुन्या छत्र्या पुन्हा थाटल्या. शेवटी पोटाचा प्रश्न आहे साहेब! ∙∙∙

अश्‍लीलतेच्या गौरवाचे सुधीर संकेत!

नशेच्या अधीन झाल्यावर पोलिस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात याचे उदाहरण पाहायचे असेल तर सध्या गाजत असलेल्या मायणा-कुडतरी पोलिस कोठडी मारहाण प्रकरणाकडे पाहावे लागेल. याप्रकरणी आतापर्यंत पाच पोलिस निलंबित झाले आहेत. या मद्यधुंद पोलिसांनी ज्या तऱ्हेने पीडित युवकांचा छळ केला ते ऐकले की, कुणालाही किळस येणार. त्यात लैंगिक अत्याचाराचाही समावेश आहे. असे म्हणतात की, या प्रकरणात पाच पोलिस गुंतले असले तरी तिघांचा सहभाग जरा अतीच आहे. एकूणच हा सारा प्रकार अश्‍लीलतेच्या गौरवाचे सुधीर संकेत! असल्याचेच सांगितले जात आहे. ∙∙∙

ढीगभर पुरस्कार

पाटो-पणजी मुलुखात सध्या कोकणी लेखकांची गर्दी दिसते. सर्व वयोगटातील लेखकराव पुरस्कारांसाठी अर्ज पुस्तके सादर करत आहेत. फाईल्सचे ढीग आवरताना अधिकाऱ्यांना नाकीनऊ येतात. ‘पांटलोभर’ पुरस्कार आहेत. साहित्याचेच विविध प्रकारांचे ८ पुरस्कार असावेत. त्याशिवाय सेवक, कार्यकर्ता, संस्था, प्रज्ञा व प्रतिभा पुरस्कार हे अन्य. पुरस्कारांचे हे अर्ज सोपस्कार संपल्यावर परीक्षकांची बैठक होते. लेखक, परीक्षक यांची संख्या मर्यादित. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याने मुद्दाम डावलले, असे दोषारोप करणारे तिरस्कार सुरू होतात. आपण अधिकाधिक चांगले लिहू, अशी अहमहमिका कधीच दिसून आली नाही. पराकोटीची आंतरिक तहान-भूक असलेल्या लेखकांचा आत्मा शांत होतो. कधीकधी लेखणी खुंटीला लावणेही होते. इतर भाषांतील पुस्तकांचे अनुवाद वाचल्यास तो आरसा आपले प्रातिभ रूप दाखवतो. ∙∙∙

‘तो’ आयपीएस अधिकारी कोण?

एक आयपीएस अधिकारी सध्या चर्चेचा विषय बनला आहे; कारण एका प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी त्यांनी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर केला; पण आता चर्चा अशी आहे की, ती बुद्धी दुसऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी स्वतःचाच प्रश्न वाढवून बसली आहे. दोन पक्षांमधील आर्थिक व्यवहाराचा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला. सुरवातीला सर्व काही सुरळीत असल्याचे दिसत होते; पण पैशांच्या व्यवहारात आकडे बदलले की मैत्रीचे गणित बिघडते आणि बिघडलेल्या गणितात मध्यस्थाचे नावही येऊ लागते, हे नवीन नाही. आता यातील एका पक्षाने सत्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे त्या याचिकेत संबंधित आयपीएस अधिकाऱ्याचे नावही येण्याची चर्चा रंगली आहे. आता यातील सत्य आणि अफवा काय, हे न्यायालयीन कागदपत्रेच सांगतील; पण तोपर्यंत चर्चा मात्र सुरूच राहणार. कारण आपल्या राज्यात चर्चा थांबवण्याचा कायदा अजून तरी कुणी केलेला नाही! ∙∙∙

विजयचा आजपासून ‘दिग्विजय’

पूर्वीचे राजे-महाराजे आपल्या राज्याची सीमा वाढविण्यासाठी ‘दिग्विजय यात्रा’ काढायचे. आता राजे-रजवाडे राहिलेले नाहीत; पण प्रभाव क्षेत्र वाढविण्यासाठी अजून प्रयत्न सुरू असतातच. आता गोवा फॉरवर्डचेच पाहा ना, आतापर्यंत काँग्रेसचे युतीतील भागीदार म्हणवून घेण्यास धन्यता मानणाऱ्या या पक्षाने आता ‘तिसरा पर्याय’ ही भाषा सुरू केली आहे. या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई आता त्यासंबंधात ठामपणे वक्तव्य करू लागले आहेत. विजय सरदेसाई यांचा वाढदिवस असून या वाढदिवसाचे ऐलान करणारे फलक फक्त फातोर्ड्यातच नव्हे तर गोव्यात सगळीकडे लावले गेले आहेत. याचाच अर्थ गोवा फॉरवर्ड आता राज्यव्यापी पक्ष होऊ पाहत आहे. विजयची ही दिग्विजय यात्रा आजपासून सुरू होणार, असे म्हणायचे का? ∙∙∙

कुडतरीत अवघे दोन ‘पीएसआय’!

युवकांना मारहाण प्रकरण मायणा-कुडतरी पोलिसांना भरेच भोवले. या ठाण्यातील दोन ‘पीएसआय’ व तीन पोलिस निलंबित झाले. कायद्याला धरूनच ही कारवाई झाली आहे. मात्र, आता या पोलिस ठाण्यात वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. पूर्वी या ठाण्यात सात ‘पीएसआय’ होते. त्यातील दोघे आपल्या कर्माने निलंबित झाले आहे तर अन्य तिघांची बदली झाली आहे. आता या ठाण्यात फक्त दोन ‘पीएसआय’ शिल्लक राहिले आहेत. त्यातील एक लेडी ऑफिसर आहे. या पोलिस ठाण्याचा आवाका बराच मोठा आहे. हाती असलेल्या ‘पीएसआय’ना घेऊन ठाण्याचा कारभार हाताळावा कसा? ही चिंता ‘पीआय’ कपिल सायबाला लागून राहिली आहे. लवकरच नवीन ‘पीएसआय’ या ठाण्यात पाठवून देणार का? याच्या प्रतीक्षेत आता कपिल साहेब व ठाण्यातील अन्य पोलिस आहेत. ∙∙∙

भाजप देणार नवे चेहरे?

‘जुने ते सोने’ म्हणण्याचे धाडस करायला भाजप तयार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरून कळून येते. भाजप येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काही नवीन चेहरे उतरवणार, असे विधान दामू नाईक यांनी केले आहे. आता जिथे भाजप नाही त्या केपे मतदारंघात भाजप नवीन चेहरा उतरविण्याचा प्रयत्न करणार? सांगे मतदारसंघात सुभाष फळदेसाईंच्या जागी नवीन चेहरा देणार? नीलेश काब्राल व गणेश गावकर यांना रिप्लेस करून नवीन चेहरा देणार? कुंकळ्ळी मतदारसंघात नवीन चेहरा आणणार? फातोर्डा, नुवे, धारगळ, कुंभारजुवे या मतदारसंघात भाजप चेहरे बदलणार का? अशी चर्चा भाजपमध्येच सुरू झाली आहे. आता बघूया दामू आपला शब्द राखतात की नाही?∙∙∙

शिवसेना जोमात ...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गोव्यात सक्रिय होत असून आता मतदारसंघनिहाय पक्ष पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जात आहे. मुंबईहून अनेक बडे नेते गोव्यात येऊन ठाण मांडून पक्षाचे कार्य कशापद्धतीने सुरू आहे याचा आढावा घेत आहेत. शिवसेना म्हणजे हिंदुत्वाचे विचार, हे सर्वांनाच माहीत असल्याने राज्यातील हिंदुबहूल मतदासंघ टार्गेट करत कामाला सुरवात केली असून सध्यातरी १६ मतदारसंघांत पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. बड्या पक्षांच्या भांडणात शिवसनेसारख्या पक्षाने कूर्मगतीने का होईना, काम करत जर आपले आमदार निवडून आणले तर कुणाला आश्‍चर्य वाटणार नाही; कारण सध्याची स्थिती पाहता दोघांच्या भांडणात भलत्याचाच लाभ होण्याची स्थिती अधिक दिसत आहे. ∙∙∙

‘माझे घर’मुळे मडगावात नाराजी?

जेव्हा ‘माझे घर’ योजना सरकारने जाहीर केली तेव्हा मडगावातील मोती डोंगर, आझाद नगरी व इतर झोपडपट्टीतील घरे कायदेशीर केली जातील, असे तेथील लोकांना सांगण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत लोकांना सनदा वितरित करण्यात आल्या; पण मडगावमधील झोपडपट्टीतील लोकांना सनदा दिल्या नाहीत; कारण येथील झोपडपट्ट्यांचा प्रश्न न्यायालयीन आहे. या झोपडपट्ट्या मुळातच बेकायदेशीर आहेत तसेच कोमुनिदादचा त्यांच्या जागेतील घरे कायदेशीर करण्यास विरोध आहे व कोमुनिदादने ना हरकत दाखला दिला नाही; पण ज्यांनी पूर्वी आश्वासने दिली त्यांच्यावर आता लोक नाराज झाले आहेत. आश्वासन दिलेल्या लोकांची काहीही चूक नाही, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा, अशी या झोपडपट्टीवाल्यांची समजूत काढण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. हल्लीच एक व्यक्ती झोपडपट्टीतील लोकांची समजूत मडगावमधील एका हॉटेलमध्ये काढताना अनेकांनी पाहिले. या समजुतीवर या झोपडपट्टीवाल्यांचा विश्वास बसेल का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो, हे खरे! ∙∙∙

‘शोक’ आणि ‘शॉक’

समाजातील एखादा कलाकार वा लेखक निवर्तला की नंतर शोकसभा घेतात. समाज सुदृढ असल्याचे ते लक्षण. श्रद्धांजली अर्पण केली जाते. तो हयात असताना संस्थेला त्याची ओळख असायला हवी. त्याला आदराने एकदा तरी संस्थेने आमंत्रित करून कनेक्ट राखला पाहिजे. त्याच्या योगदानासाठी आदर व्यक्त करायला हवा. त्याच्या विचारांचे डॉक्युमेंटेशन करायला हवे. आपल्याच ८ लोकांशिवाय जेव्हा काहीच दिसत नाही व तेच महान दिसू लागतात तेव्हा ती शोकांतिका ठरते. आभाळाएवढ्या योगदानाने भाषेचे कला दालन कुणी जर उंच केले आहे, मंगळूरची संस्था मोठा पुरस्कार देऊन त्या कलाकाराचा सन्मान करते व स्थानिक संस्था कोण कोण केवढे मोठे कार्य करते याविषयी अनभिज्ञ राहिली तर ही करणी शेक्सपियरीन ट्रॅजेडीपेक्षा गहन व महान ठरेल. देवा, हे लोक तुलाच मानत नाहीत. माफ कर त्यांना. ∙∙∙

कोकणी पुस्तकांचा डिजिटल मंच

मल्याळम, बंगाली व इतर काही भाषांनी भाषा व साहित्याच्या प्रसारात बाजी मारली आहे. ई-बूक्स, ऑडिओ बूक्सनिशी त्यांनी आपले साहित्य जगभर असलेल्या भारतीयांपर्यंत पोहचविले आहे. पुस्तक प्रसाराविषयीच्या एका सर्वेक्षणात हे दिसून आले. छापील पुस्तकांच्या प्रमाणात किंचित घट दिसून येते; पण डिजिटल मंचावरून पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. तंत्रज्ञानाचा फायदा प्रभावीपणे घेणे कालसुसंगत. तूर्त, डिजिटल मंचावर कोकणीने काय प्रगती केली आहे, हे कळत नाही. कलाकार उत्तम आहेत. त्यांच्याकडून ऑडिओ बूक्स, यू-ट्यूब व्हिडियो तयार करून घेण्याचे प्रयत्न कमी पडत आहेत. प्रबळ इच्छा व प्रयत्न यांची जोड हवी. छापील पुस्तकांचा आषाढी पाऊस सुरू आहे, ठीक. डिजिटल साहित्य नसल्यास भाषा मागे उरते ही समज हवी. ∙∙∙

फ्रान्सिस सिल्वेरा सक्रिय!

सांतआंद्रे मतदरासंघात माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा सध्या सक्रिय झालेले आहेत. गतनिवडणुकीत याठिकाणी ‘आरजी’चा एकमेव आमदार निवडून आला होता. त्यामुळे सांतआंद्रे मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात आणण्यासाठी सिल्वेरा यांनी आपले काम जोरदारपणे सुरू केलेले आहे. त्यांनी सध्या आमदार नसतानाही मतदारसंघातील काही युवकांना नोकऱ्याही मिळवून दिल्या आहेत. त्याशिवाय युवकांसाठी क्रिकेट व फुटबॉलच्या स्पर्धा आयोजनावरही त्यांनी भर दिलेला आहे. तसेच मतदारसंघातील मतदारांच्या मुलांच्या शाळा प्रवेशांसाठीही त्यांनी हात आखडता घेतला नाही. या बाबीची सध्या सांतआंद्रेत बरीच चर्चा सुरू आहे. ‘आरजी’तील वादाच्या पार्श्वभूमीवर सिल्वेरांनी सध्या जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. यावरून त्यांनी येणारी निवडणूक चांगलीच मनावर घेतल्याची दिसते. ∙∙∙

प्रभारी बदलाची चर्चा!

अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) कधी काय निर्णय घेईल, हे काही सांगता येत नाही, असे म्हणावे लागेल; कारण प्रदेशाध्यक्ष बदलाची प्रक्रियाही धक्कादायक असल्याचे काँग्रेस नेते व कार्यकर्ते म्हणत आहेत. आता ‘एआयसीसी’ गोवा प्रभारीही बदलणार असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. नव्या कार्यकारिणीतील नेत्यांंनी मणिक्कम टागोर यांना पुन्हा गोव्यात पाठवावे, यासाठी फिल्डिंग लावली आहे. या सर्व घडामोडी माणिकराव ठाकरे यांच्या अपरोक्ष चालल्या असल्या तरी त्याची कुणकूण ठाकरे यांनाही लागली आहे. परंतु ठाकरे यांनी पक्षीय कामावर अधिक भर दिला आहे, त्यामुळे शनिवारी त्यांनी पक्षाच्या चार वरिष्ठ नेत्यांना कामांची जबाबदारीही देऊन टाकली आहे. ज्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष बदलला, त्याप्रमाणे अखेर प्रभारींविषयी ‘एआयसीसी’ने काही निर्णय घेतलाच तर पक्षीय निर्णय असल्याचे म्हणायला सगळेच मोकळे, नाही का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brazil vs Morocco, FIFA World Cup 2026: विश्वचषकाचा 'किंग' ब्राझील, सलामीच्या सामन्यात पराभव नाहीच, 88 वर्षांची परंपरा कायम

Goa Education: हिंदी विषय अभ्यासक्रमात कायम, 'जीएससीईआरटी'चे स्पष्टीकरण

IND W vs PAK W: भारताची टी-20 वर्ल्डकप मोहीम आजपासून, सलामीला पाक प्रतिस्पर्धी; अनुभवात हरमनप्रीतचा संघ वरचढ

Drishti Marine: किनाऱ्यांवर 450 जीवरक्षकांची 'दृष्‍टी', खवळलेल्‍या समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला

वीजमंत्र्यांच्या घराबाहेर 'आप'चा मोर्चा! स्मार्ट मीटर आणि दंड वसुलीवरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT