बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये आता फक्त अभ्यास आणि परीक्षांची चर्चा नाही, तर एक वेगळीच चर्चा सुरू आहे. कॅम्पसमधील एका मागून एक होत असलेल्या मृत्यूंनी सगळ्यांना चिंतेत पाडले आहे. आधी चार मृत्यू झाले, पण त्यांची चर्चा दबक्या आवाजात झाली. आता मात्र पाचव्या मृत्यूने परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या पाचव्या मृत्यूचा उत्तर अहवाल जाहीर झाला त्यामुळे आधीच्या मृत्यूंच्या तुलनेत, या घटनेत काहीतरी वेगळे आहे, काहीतरी दडपले जात आहे, अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये देखील सुरू आहे. काहीजण प्रशासनाकडे संशयाने पाहत आहेत, तर काहीजण मोठ्या व्यक्तींची नावे चर्चेत करत आहेत. या सगळ्या प्रकरणाचे सत्य बाहेर येईल का? की हेही प्रकरण दडपले जाईल? असे प्रश्न प्रत्येकजण एकमेकांना विचारत आहे, पण उत्तर कोणाकडेच नाही. ∙∙∙
सांकवाळ येथील बिटस पिलानी ही विख्यात शैक्षणिक संस्था सध्या वेगळ्याच वादांत सांपडली आहे. गत दिवसात तेथे मृतावस्थेत सांपडलेल्या ऋषी नायर या विद्यार्थ्यांचा मृत्यु आत्महत्येमुळे नसल्याचे जरी उत्तरीय तपासणीत आढळून आलेले असले, तरी त्यामुळे गेल्या दहा महिन्यात तेथे पाचविद्यार्थ्यांचे जे मृत्यु झाले. त्यामुळे या शैक्षणिक संस्थेकडे सगळेच वेगळ्या दृष्टींतून पहाताना दिसतात. काहींनी तर पोलिस व वैद्यकीय तपासाचा निष्कर्ष उघड होण्यापूर्वीच तपास करून अशा संस्थांबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम केल्यांचे दिसत आहे. सत्य उघडकीस यावे, हा जरी त्या मागे उद्देश असला तरी या प्रकारामुळे अशा संस्थांची बदनामी होत आहे. मागे माशेल-टोक येथील फेरी धक्यावरून वाहनासह नदींत कोसळलेल्या व अजूनही बेपत्ता असलेल्या एका युवकाबाबत असाच प्रकार घडला होता. त्यामुळे सत्यप्रकार लोकांसमोर येत नाही, अशी चर्चा सध्या होत आहे.∙∙∙
शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. येथील सम्राट गार्डमध्ये बर्थ-डे सोहळ्याच्या आयोजनात कुठलीही कसर बाकी राहणार नाही, याची कसोशीने काळजी घेतली होती. तत्पूर्वी पणजी येथील भाजप कार्यालयात दामू सराला बर्थडे केक भरविण्यात आला होता. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी त्यांना शुभेच्छा देऊन केक भरविल्यानंतर दामूने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. दामू व श्रीपाद हे दोघेही मूळ आडपई गावचे. जेव्हा दामूला पहिल्यांदा फातोर्ड्यातून भाजपची उमेदवारी मिळाली होती, त्यामागे श्रीपाद भाऊचा सिंहाचा वाटा होता. दामूच्या जुन्या कार्यकर्त्यांना ते माहीत आहे. ∙∙∙
दामूंचा वाढदिवस गोव्यात जल्लोषात साजरा झाला. आजवर कोणत्याच भाजपाध्यक्षांच्या वाट्याला वाढदिवशी असा थाट आला नव्हता, असे दामूचे समर्थक छातीठोकपणे सांगत आहेत. केवळ पणजीतच नव्हे, तर मडगावांतही त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यामुळे अनेकांचे डोळे म्हणे विस्फारले. तशातही वाढदिवसाचे औचित्य साधून दामबाबांनी हरवळे रुद्रेश्वरचरणी लीन होऊन एकाच दगडांत अनेक पक्षी मारल्याचेही काही जण म्हणत आहेत. त्यांच्या वाढदिवसाला मिळालेल्या या प्रतिसादामुळे म्हणे केवळ फातोर्डांतीलच नव्हे, तर मडगावांतील भाजपवाल्यांना नवे स्फुरण मिळालेले आहे. नाही म्हटले तरी या दोन्ही मतदारसंघांवर दामूचा प्रभाव आहे खरा. त्यामुळेच परवा दामूचे अभिनंदन करणाऱ्यांत मडगावातील भाजपवाल्यांचीही रांग लागलेली असावी. आगामी निवडणुकीवर या वाढदिवसाचा प्रभाव किती प्रमाणात दिसणार याचे आडाखेही अनेकजण बांधू लागल्याची चर्चा ऐकूं येते.∙∙∙
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या वाढदिनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबरबाब कामत यांचे एकदम आवेशपूर्ण भाषण झाले. मात्र नेमके काय बोलतो, हे मात्र त्यांच्या कदाचित लक्षात आले नसेल. त्यांनी म्हटले ‘म्हाका खात्री आसा जशे पयर कोणे एकल्यान स्टेटमेंट केला, आचार्य प्रमोद कृष्णमान म्हळा भाजपा इस देश में २० साल नही आ सकती है। तशें इस गोवा मे १५ साल नही आ सकती।’ - असे वातावरण दामू नायकान करचे अशें हांव मागता". दिगंबरच्या या म्हणण्याचा अर्थ मंडपात गडबड, उत्साह असल्याने त्यावेळी कुणाच्या लक्षात आले नाही. पण मंचावर उपस्थित मुख्यमंत्री, एनआरआय कमिशनर सावईकर यांच्या लक्षात आले. त्यांनी सर्व बाजूंनी पाहण्यास सुरुवात केली. शर्मद रायतुरकरने लगेच माईक हातात घेऊन म्हटले की ‘आमी सगळे मानतात की भारतीय जनता पार्टी बीस नही, पचीस साल तर हार नही सकती।’. आज जेव्हा दिगंबरच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला व दिगंबरने जे बोलायला नको होते, ते बोलले, असे भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या निश्र्चितच लक्षात आले. पण दिगंबर असे का बोलले? त्यांना नेमके काय सांगायचे होते? विरोधक या भाषणाचा त्यांच्यावर डाव साधण्यासाठी उपयोग करताना दिसत आहेत. कधी कधी जे मनात असते, ते ओठावर येते असे आता कार्यकर्ते म्हणत आहेत. ∙∙∙
कित्येकदा बोलताना भावनेच्या भरात मोठ्या नेत्यांकडून चुकाही होतात आणि मग तो चर्चेचा विषय बनतो. दिगंबर कामत यांच्या बाबतीत काल असेच घडले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना, पुढच्या १५ वर्षात गोव्यात भाजप येऊ नये, अशी परिस्थिती दामू नाईक यांनी करावी, असे त्यांनी चुकून म्हटले. हा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल झाला असून काहींजण दिगंबर देवाचा माणूस आणि देवच हे त्यांच्या तोंडातून बोलला असेही म्हणू लागले आहेत. काही का असेना, हा व्हिडिओ सगळ्यांच्या चर्चेत आहे एवढे खरे ∙∙∙
कोडली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमास राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. त्यात २०२७ सालची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले विद्यमान आमदार डॉ. गणेश गावकर, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार नीलेश काब्राल, माजी मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर, माजी खासदार विनय तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा तेंडुलकर, गोवा राज्य बजरंग दल प्रमुख संकेत आर्सेकर, समाजसेवक तथा पंच रमाकांत गावकर आणि मान्यवर उपस्थित होते. या सर्व दिग्गज नेत्यांना पाहून उपस्थित लोकांना विधानसभा निवडणूक जवळ आल्याचा भास झाला. अनेकांनी तशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. घोडेमैदान काही लांब राहिलेले नाही, हे खरेच! ∙∙∙
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा वाढदिवसानिमित्त भाजपच्या कार्यालयाबाहेर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री आणि आमदारांची, पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. परंतु राज्यात मंत्री असतानाही अनेकांना मागच्या रांगेत उभे रहावे लागले होते, कारणही तसेच होते. कारण पक्षाचे आपण खरे कार्यकर्ते असल्याचे दाखवत काहीजण दामू नाईकांच्याजवळ उभे राहून छायाचित्रे घेत होती. त्यातील काही छायाचित्रे भाजपच्या समाजमाध्यमातील पेजवर व्हायरलही झाली आहेत. विशेष बाब म्हणजे काही छायाचित्रांमध्ये असे काही कार्यकर्ते छायाचित्रासाठीच उभे राहिलेले पाहून भाजपच्याच मूळ कार्यकर्तेही त्याविषयी चर्चा करू लागले आहेत. पक्षाचे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्तेही असे संधिसाधू पाहिल्यावर दुखावले असणार हे नक्की. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.