Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

Khari Kujbuj Political Satire: केपे मतदारसंघाचे विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्टा व माजी आमदार बाबू कवळेकर यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य सगळ्यांना माहीत आहे.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

हे नगरसेवक आहेत कुठे?

‘असून नाथ मी अनाथ’ अशी स्थिती कुंकळळीतील जनतेची झाली आहे. काही अपवाद वगळता कुंकळ्ळी नगरपालिकेतील काही नगरसेवक गायब झाले आहेत. या पालिका मंडळाचा कार्यकाळ संपायला आज तरी काही नगरसेवकांचे त्यांच्या प्रभागातील लोकांनी तोंड ही पाहिलेले नाही. गेल्या चार वर्षात काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागात पायही ठेवलेला नाही. चार महिन्यांनी एकदा बैठकीला उपस्थिती एवढेच त्यांचे काम. काही नगरसेवक प्रदेशातून काम चालवतात. काही नगरसेवक आपल्या व्यवसायात व इतर उद्योगात व्यस्त आहेत. अपवाद वगळल्यास कुंकळळी नगरपालिका मंडळ नॉन फोक्शनिंग मंडल बनले आहे. आता पाहूया पुढच्या वेळी हे बिन कामाचे नगरसेवक पुढे कसे जातात. ∙∙∙

बाबू ,एल्टन व सुभाष एकत्र!

‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ अशी एक म्हण आहे. जे राजकारणी एकमेकांस पाण्यात पाहतात. एक दुसऱ्यावर जहाल टीका करतात, त्यांना एकाच व्यासपीठावर आणणे, केवळ ईश्वरालाच शक्य आहे. केपे मतदारसंघाचे विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्टा व माजी आमदार बाबू कवळेकर यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य सगळ्यांना माहीत आहे. मंत्री सुभाष फळदेसाई व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे एकाच पक्षात असले तरी त्यांच्या मधील दुरी व दरी सगळ्यांना माहित आहे. मात्र हे तिघे जण केपे गणेशोत्सव मंगळाच्या लॉटरी कूपन्स ड्रॉच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेले पहायला मिळाले. आता एकत्र खांद्याला खांदा लावून बसलेल्या सुभाष फळदेसाई व एल्टन डिकॉस्टा यांनी बाबूशी नजर मिळवली नाही, ते वेगळे. एक मात्र खरे विघ्नहर्ता गणेश विभक्तांना एकत्र आणतो, हे सत्य आहे. ∙∙∙

‘इन्स्पेक्टर झेंडे’ चर्चेत

‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटात ‘बिकिनी किलर’ चार्ल्स शोभराज याची कथा सांगितली आहे; परंतु त्यात गोवा पोलिसांची जी थट्टा केली आहे, ती अवर्णनीय आहे. गोवा पोलिसांच्या नाकावर टिच्चून मुंबई पोलिसांनी चार्ल्स शोभराजला उचलून नेले. गोवा पोलिस १९८६ मध्ये संपूर्णत: ढेपाळले होते. आजही त्यात फरक पडला आहे काय? गोवा पोलिस प्रमुखांपासून ही केस हाताळणाऱ्या निरीक्षकापर्यंत कोणालाही थांगपत्ता लागू न देता मुंबई पोलिस गोव्यात येतात, चार्ल्सचा माग काढतात आणि गोवा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याला घेऊन निघूनही जातात. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर गोवा पोलिसांचे चांगलेच वाभाडे निघणार आहेत. त्यामुळे गोवा सरकार या चित्रपटावर बंदी तर घालणार नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙

‘पणजीकरां'चा इतर सणांमध्येही सलोखा!

पणजीकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे यंदा गणपतीचे ‘पणजीचा राजा‘ असे नामकरण तर केलेच. परंतु मंडळाच्या उत्सव समितीत सर्वधर्म समभाव जपला गेला. या समितीत केवळ हिंदूच नाही, तर ख्रिश्चन-मुस्लिम सदस्यांना सामावून घेण्यात आले. सर्वधर्म समभाव समितीचे राज्यातील राजकारण्यांनी कौतुकही केले. त्याचबरोबर समिती आयोजित करीत असेल त्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले आहे. आता शनिवारी गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी महाप्रसादाचे नियोजन केले होते. याशिवाय दोन पोलिस अधीक्षक राहिलेल्या अधिकाऱ्यांना सल्लागार म्हणून घेतले असल्याने समितीच्या कामकाजात नेटकेपणा आला. या समितीने यापुढे गणेशोत्सवच नव्हेतर दिवाळी, ईद, नाताळ असे सणही सर्वधर्म समभाव राखत साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. पणजीकर मंडळाने नवा पायंडा घालण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असला तरी वास्तवात येईल आणि तो यशस्वी होईल अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही. ∙∙∙

ईव्ही नको, बस चालवा!

म्हजी बस योजनेखाली ग्रामीण भागात विजेवर चालणाऱ्या बस चालवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी बस नसल्याने प्रवाशांना ताटकळत रहावे लागते. विशेषतः लांब पल्ल्याच्या मार्गावर ही स्थिती उद्‍भवते. उदाहरणार्थ केरी (पेडणे) येथून पणजीला जाणारी बस पालयेपर्यंत भरून जाते त्यामुळे मांद्रे, आगरवाडा, चोपडे, शिवोलीच्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश करताच येत नाही. सकाळच्या पहिल्या दोन तासात ही स्थिती असते. त्यामुळे विजेवरील बस चालवा किंवा डिझेलवरील पण पुरेशा बस चालवा, अशी मागणी ग्रामीण प्रवाशांची आहे. सरकार ईव्ही आणेल, पण पुरेशा बस कधी चालवेल, अशी विचारणा यानिमित्ताने होत आहे.∙∙∙

वड हटवला जाणार का?

पर्वरी येथील श्री देव खाप्रेश्वराची मूर्ती उड्डाणपुलाच्या कामाचे निमित्त साधत हटवली गेली, ती तेथेच पुन्हा स्थानापन्न करावी लागली आहे. आता दाबोळी येथून जाणाऱ्या महामार्गाच्या निमित्ताने हटवावा लागणारा वड चर्चेत आला आहे. दाबोळीतून जाणाऱ्या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी काही बांधकामे हटवावी लागणार आहेत. त्याच पद्धतीने वडावरही संक्रांत येणार आहे. त्या वडाचे स्थलांतर कुठे केले जाणार याकडे अनेकांची बारीक नजर आहे. येत्या आठवडाभरात वडावरून सरकारला धारेवर धरणारे तेथे धाव घेतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे. दाबोळीतील अंतर्गत राजकारणाचा वासही या प्रकरणाला येऊ लागल्याची चर्चा आहे.∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: भाजपचा पराभव करण्यासाठी एकीची गरज, काँग्रेसमध्ये त्याचाच अभाव; विजय सरदेसाईं

आमठाणे परत भरणार!

आमठाणे धरणाच्या गोलाकार दरवाजातील झडप आता बसवण्यात आली आहे. भर पावसात आमठाणे धरणात जलसाठा नसल्‍याचा मुद्दा विरोधकांकडून उचलला जाण्याची भीती सत्ताधाऱ्यांना होती. मात्र याकडे कोणाचे लक्ष गेले नाही.आता या गोलाकार दरवाजाची झडप बसवल्याने पाणी साठवण्यास सुरुवात झाली आहे. बार्देशची तहान भागवण्यासाठी या धरणातील जलसाठी बहुतांशवेळा कामी येतो. विशेषतः तिळारीचे पाणी थांबले की या धरणाची आठवण काढली जाते. आता धरणाचा दरवाजा सुस्थितीत आल्याने विरोधकांच्या हातातून एक मुद्दा अलगदपणे निसटल्याची भावना सत्ताधाऱ्यांत आहे.∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

मौनातच गुपित दडले!

गोव्यातील कोळसा वाहतुकीवरून व रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणावरून सध्या बरेच राजकारण सुरू झाले आहे. अनेक राजकारण्यांनी त्यानिमित्त विरोध-प्रत्यारोप सुरू आहेत. तर काही जण मौन बाळगून आहेत. काही अतिउत्साहींनी तर काहींना मुख्यमंत्री व्हा? कोळसा वाहतूक बंद करा, असा सल्ला समाजमाध्यमांवरून दिला आहे. तर या प्रश्नावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणे काहीच बोलायला तयार नाहीत, म्हणजेच ते मौन बाळगून आहेत. दुसरे ज्येष्ठ मंत्री दिगंबर कामत यांनीही या प्रकरणी काहीच भाष्य करण्यास नकार दिला आहे. कारण त्यांच्या या मौनातच म्हणे राजकीय सूज्ञता आहे. कारण आता कोणाचेही सरकार आले व कोणीही मुख्यमंत्री झाला तरी कोळसा वाहतूक बंद करणे शक्य नाही, हे त्या दोघांनाही चांगलेच माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या मौनातच खरे गुपित दडलेले आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com