Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: घोषणांपलीकडचे राजकारण!

Khari Kujbuj Political Satire: राजकारण म्हणजे फक्त घोषणा, मोर्चे, सभा आणि सोशल मीडियावरील पोस्ट एवढेच असते, असा अनेकांचा समज असतो.

दैनिक गोमन्तक डिजिटल

घोषणांपलीकडचे राजकारण!

राजकारण म्हणजे फक्त घोषणा, मोर्चे, सभा आणि सोशल मीडियावरील पोस्ट एवढेच असते, असा अनेकांचा समज असतो. दापोलीतील तीन दिवसांच्या शिबिराने शिवसेनेच्या गोव्यातील पदाधिकाऱ्यांना हा समज किती उथळ आहे, याची जाणीव करून दिली. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची मार्गदर्शने ऐकताना समाज, अर्थकारण, प्रशासन, कायदे, पर्यावरण आणि संवादकौशल्य यांचाही राजकारणाशी तितकाच जवळचा संबंध असतो, हे कदाचित प्रथमच उमगले असेल. शिबिर संपल्यानंतर ही शिकवण फक्त वहीत राहते की प्रत्यक्ष जनतेच्या प्रश्नांमध्येही दिसते, हेच खरे परीक्षेचे उत्तर ठरणार आहे. ∙∙∙

राज्य पुरस्कारांचा वाद?

कला व संस्कृती खात्याचे राज्य पुरस्कार जाहीर झाले की वाद सुरू होणार हे ठरलेलेच असते. याचे कारण म्हणजे ‘रात्र थोडी आणि सोंगे फार’प्रमाणे पुरस्कार कमी आणि इच्छुक जास्त. यंदाही वाद सुरू झाला आहे. खासकरून नाटकाबाबतच्या पुरस्काराविषयी. ज्या दोघांना नाट्य पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे नाट्यशेत्राला योगदान काय, हे कला व संस्कृती खात्याने जाहीर करावे, अशाप्रकारची पत्रके सध्या सोशल माध्यमावरून फिरत आहेत. या पुरस्काराकरता अनेक ज्येष्ठ रंगकर्मी दावेदार होते; पण त्यांना डावलून या दोघांना पुरस्कार दिल्यामुळे काहीजण खवळलेले दिसत आहेत. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ तशातला हा प्रकार. त्यापेक्षा कला संस्कृती खात्याने अर्ज न मागवता त्या-त्या क्षेत्राचे मूल्यमापन करून हे पुरस्कार जाहीर केले तर ते जास्त उचित ठरेल, असे या क्षेत्रातील जाणकार बोलायला लागले आहेत. ∙∙∙

विजयची पुढची चाल!

सांगेचे नगरसेवक मॅश्‍‍यू डिकॉस्‍ता हे काल गोवा फॉरवर्ड पक्षात सामील झाले आहेत. सांगेत त्‍यानिमित्ताने एक कार्यक्रमही झाला. एकाबाजूने गोवा फॉरवर्ड काँग्रेसबरोबरची आपली युती कायम आहे, असे सांगत असतानाच दुसऱ्याबाजूने वेगवेगळ्‍या भागात जाऊन स्‍थानिक नेत्‍यांना आपल्‍या पक्षात सामील करून घेत आहेत. आम्‍ही आमची भूमिका ३० जूननंतर स्‍पष्‍ट करू, असे विजयने यापूर्वी म्‍हटले होते, याची आठवण सर्वांनाच असेल. १ जुलैला विजय आपली पुढील भूमिका स्‍पष्‍ट करणार, असे सांगितले जाते. विजयची नवीन भूमिका काय असेल? आणि गोव्‍यातील राजकारणावर त्‍याचा काय परिणाम होणार, हे जाणून घेण्‍यासाठी सर्वांचीच उत्‍सुकता ताणली आहे. काय असेल बरे विजयची नवीन भूमिका? ∙∙∙

आता मॅश्यूचे चल या फुडें!

यशस्वी व्हायचे असेल तर रिस्क ही घ्यावीच लागते. सांगे मतदारसंघातील विरोधकांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे मॅश्यू डिकॉस्टा यांनी अखेर गोवा फॉरवर्ड पक्षाचा मफलर आपल्या गळ्यात घातलाच. मॅश्यू गोवा फॉरवर्डमय होणार, असा अंदाज आम्ही याच सदरात व्यक्त केला होता. एवढे दिवस मॅश्यू गोवा फॉरवर्ड पक्षात का आले नाहीत? मॅश्यू गोवा फॉरवर्ड पक्षात जाणार की काँग्रेस पक्षात? यावर चर्चा होती. तसे पाहिले तर मॅश्यूला काँग्रेसची ओढ होती, असे म्हणतात. मात्र, काँग्रेस पक्षाकडून सकारात्मक होकार न मिळाल्याने त्यांनी आपला दुसरा पर्याय स्वीकारला, असे राजकीय विद्वान सांगतात. आता मॅश्यू गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते म्हणून थोडेच राहणार; त्यांची नजर आहे आमदारकीवर. गोवा फॉरवर्ड व काँग्रेसची युती होवो अथवा न होवो, सुभाष फळदेसाई यांच्याविरुद्ध पुढचे उमेदवार मॅश्यूच, असे त्यांचे समर्थक म्हणतात. आता पाहूया ‘चल या फुडें’ची गाडी विधानसभेपर्यंत राहते की संगमपुरातच स्थिर होते. ∙∙∙

रस्ता वाहतुकीसाठी की रीलसाठी?

आता पर्यटन म्हणजे निसर्गाचा आनंद नव्हे, तर सोशल मीडियावर ‘व्ह्यूज’ मिळवण्याची स्पर्धा झाली आहे. असोळणे-केळशी पुलावर भर वाहतुकीत नाचत रील चित्रीकरण करणाऱ्यांना पूल हा सार्वजनिक मार्ग नसून वैयक्तिक स्टुडिओच वाटला असावा. काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्याची ही ‘रील संस्कृती’ किती बेफिकीर झाली आहे, याचे हे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल. ‘लाईक्स’ आणि ‘फॉलोअर्स’च्या नादात वाहतूक नियम, सार्वजनिक शिस्त आणि सुरक्षितता यांना ‘अनफॉलो’ करणाऱ्यांवर आता केवळ टीका नव्हे, तर कठोर कारवाईचीही वेळ आली आहे. ∙∙∙

केवळ हेल्मेट पुरेसे नाही!

‘हेल्मेट घाला, जीव वाचवा’ हा संदेश निश्चितच योग्य आहे; पण प्रत्येक अपघातात हेल्मेटच जीव वाचवेल, असा समजही तितकाच धोकादायक ठरू शकतो. बोरी येथे शनिवारी झालेल्या भीषण अपघातात हेल्मेट घातलेल्या युवकाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. हा प्रसंग हेल्मेटच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उभे करत नाही, तर रस्ते सुरक्षा ही केवळ एका साधनावर अवलंबून नसते, याची जाणीव करून देतो. सुरक्षित रस्ते, अवजड वाहनांवर प्रभावी नियंत्रण, वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, वाहनचालकांचे प्रशिक्षण आणि जबाबदार वाहनचालकांची मानसिकता यांचा एकत्रित परिणामच जीव वाचवू शकतो. हेल्मेट हे संरक्षणाचे महत्त्वाचे कवच आहे; पण ते नियतीवर मात करणारे अभेद्य चिलखत नाही. त्यामुळे जनजागृतीसोबतच सुरक्षित वाहतूक व्यवस्था उभारण्याची जबाबदारी सरकार, प्रशासन आणि प्रत्येक वाहनचालकानेही समानपणे स्वीकारली पाहिजे. ∙∙∙

प्रतिमाची घरवापसी?

काँग्रेसमध्‍ये चांगली वागणूक मिळत नसल्‍याचा दावा करून आम आदमी पक्षात सामील झालेल्‍या आणि नंतर आम आदमी पक्षालाही कंटाळून त्यांना ‘राम राम’ केलेल्‍या प्रतिमा कुतिन्‍हो या मागचा कित्‍येक काळ कोणत्‍याही पक्षात सामील न होता आपल्‍यापरीने सामाजिक कार्य करत होत्‍या. मात्र, काल अकस्‍मात त्‍यांना काँग्रेस हाऊसमध्‍ये पाहिल्‍यावर कित्‍येकांच्‍या भुवया वर गेल्‍या. याबद्दल त्‍यांना विचारले असता, काँग्रेस हे माझे मूळ घर आणि आपल्‍या स्‍वत:च्‍या घरात कुणी आल्‍यास त्‍यात वाईट काय? असा सवाल त्‍यांनी केला. काँग्रेसमधील वातावरण आता चांगले झाले आहे, असेही त्‍यांनी पत्रकारांशी बोलताना म्‍हटले. प्रतिमाने मारलेला हा बाण नेमका कुणावर होता, हे कळू शकले नाही; पण नावेलीतून निवडणूक लढविण्‍याची इच्‍छा असलेल्‍या प्रतिमा पुन्‍हा घर वापसी करणार हे जवळपास नक्‍की झाले आहे. प्रतिमा काँग्रेसमध्‍ये आल्या तर वालंका काय बरे करतील? ∙∙∙

जना झाले भावुक!

काँग्रेसमधील धडाडीचे आणि आक्रमक नेते म्हणून पाहिले जाणारे जनार्दन भंडारी यांचा वाढदिवस काल काँग्रेस भवनात युवक काँग्रेसच्यावतीने साजरा करण्यात आला. सायंकाळी कार्यालयात त्यांची छबी झळकत असलेला केक कापण्यात आला. यावेळी अमरनाथ पणजीकर, अमित पालेकर आणि अर्चित नाईक यांनी जना यांचे भरभरून कौतुक केले. त्यांच्यातील आक्रमकता आणि लोकसंपर्क ठेवण्याची कला युवकांनी आत्मसात करावी, असेही या नेत्यांनी सांगितले. त्याशिवाय काणकोणात ते करीत असलेल्या पक्षाच्या कामामुळे ते पुढील आमदार होतील, असा विश्वासही व्यक्त केला. त्यावेळी जना भावुक झाले. गॉगल असल्याने त्याआडून भरून आलेले डोळे दिसले नाहीत, एवढेच. ∙∙∙

परीक्षांवरचा विश्वास अटल होणार कधी?

‘नीट’ परीक्षेचे पेपर फुटले, ही घटना ताजी आहे. जखमा भळभळत आहेत. आज महाराष्ट्रभर होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा ऐनवेळी झाली. भिवंडीला पेपर फुटले, असा सुगावा लागल्याने पोलिसांनी छापा टाकला. परीक्षा मंडळाला कळवले. काही प्रश्न परीक्षेतील होते, असे दिसून आले. घाबरायची गरज नाही, अभ्यास करा, असे परीक्षा उपायुक्तांनी सांगितले खरे; पण ज्यांना झळ लागते त्यांचा जीव टांगणीला लागतो. विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. एक हजार केंद्रांत सुमारे ४ लाख २८ हजार उमेदवार, शिक्षक होण्यासाठी परीक्षेला बसणार होते. या परीक्षेत पेपरफुटी होत आहे, असा आवाज काही संस्था सात वर्षांपासून काढत होत्या. भले मोठे अवर्षण आल्याशिवाय कडक सुरक्षा कवच लागू करण्याची सुबुध्दी होत नाही. परीक्षा यंत्रणेवरचा विश्वास अचल, अटल कधी होणार? ∙∙∙

‘ती’ दोन वाक्ये!

बंदर कप्तान खात्याच्या टर्मिनलच्या उद्‌घाटनावेळी प्रमुख पाहुणे असलेले केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हे कोकणीत दोनच वाक्ये बोलले आणि तीही लक्ष वेधणारी ठरली. सुरवातीला ‘सगळ्यांक येवकार’ आणि भाषण झाल्यानंतर ‘देव बरे करू’ ही ती दोन वाक्ये. या दोन्ही वाक्यांना उपस्थितांनी दाद दिली; परंतु सोनोवाल यांनी काही चुकले असले तर माफ करा, असा आर्जव केला. ही दोन्ही वाक्ये त्यांना नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी एका कागदावर लिहून दिली होती. मात्र, तो कागद पुरवण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले, त्यामुळे ही वाक्ये उपस्थितांच्या लक्षात राहिली असणार, हे नक्की. ∙∙∙

पडद्यामागे नेमके काय?

डिचोलीत काँग्रेसचे गट संयोजक मनोज नाईक यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री बगलमार्गावर स्कूटरवरून आलेल्या दोघांनी ‘तुला काँग्रेस हवी काय?’ असा सवाल करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचवेळी घटनास्थळी आलेल्या नॅनो कारमुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’च्या आधारे तपास सुरू केला आहे. मात्र, काँग्रेसने हा हल्ला राजकीय प्रेरित असल्याचा आरोप करत सरकारवर कायदा-सुव्यवस्थेच्या अपयशाचा ठपका ठेवला आहे. या घटनेमागे नेमके कोण आणि उद्देश काय, याची चर्चा आता डिचोलीत रंगू लागली आहे. पोलिस तपासातून सत्य समोर येणार की राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तापणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙

आदेशाचा प्रयोग की डाव!

सरकारने गावांचे शहरीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आणि गावोगावी चर्चा रंगली. त्यानंतर विरोधाची चाहूल लागताच निर्णय मागे घेण्यात आला. आता राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच चर्चा सुरू आहे. हा काही साधा निर्णय नव्हता, तर जनतेची नाडी ओळखण्याचा एक ‘प्रयोग’ होता! आधी एखादा आदेश काढायचा, लोक शांत बसले तर तो कायम ठेवायचा आणि जर लोक रस्त्यावर उतरले तर ‘जनतेच्या भावनांचा आदर करून’ आदेश मागे घ्यायचा. म्हणजे दोन्ही बाजूंनी सरकारच जिंकणार. आदेश टिकला तर ‘धोरण यशस्वी’ आणि मागे घेतला तर ‘जनतेचा आवाज आम्ही ऐकला.’ आहे की नाही गंमत. ∙∙∙

ड्युटी मास्तरची चर्चा!

सध्या एका ड्युटी मास्तरच्या विचित्र वागण्याची चर्चा सुरू आहे. एका पोलिस चालकाच्या नातेवाईकाचे निधन झाले होते, त्यामुळे तो अंत्यविधीसाठी रितसर सुट्टी घेऊन घरी गेला होता; पण संशयी ड्युटी मास्तरला वाटले की तो सुट्टीचे खोटे कारण सांगून मजा करायला गेला आहे. त्याने त्या कर्मचाऱ्याला फोन करून थेट जळत्या सरणासोबत सेल्फी काढून पाठवण्याचा क्रूर हुकूम दिला. नोकरीच्या भीतीने आणि वरिष्ठांच्या दबावामुळे त्या हतबल कर्मचाऱ्याने दुःखाच्या प्रसंगातही तसा सेल्फी काढून पाठवला. हा प्रकार समोर येताच संपूर्ण गोवा पोलिस दलात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ड्युटी मास्तरला कर्मचाऱ्यांचा छळ करायची जुनीच सवय आहे; पण यावेळी त्याने माणुसकीच्या सर्व मर्यादा पार केल्या, अशी चर्चा पोलिस कट्ट्यांवर रंगली आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙

याचा राग त्याच्यावर का?

केपे मतदार संघाचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी राज्यातील धनगर समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा अपराध केल्याचा आरोप धनगर समाज करायला लागला आहे. धनगर समाजाला एसटी दर्जा नाकारला जात आहे म्हणून समाज दुःखी आहे. त्यात आमदार एल्टन यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याची मागणी एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यास अडथळा निर्माण करण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. एल्टन यांचे धनगर समाजाचे नेते बाबू कवळेकर यांच्याशी वैर आहे. बाबू कवळेकर यांना अपमानित करण्यासाठी एल्टन समस्त धनगर समाजाला अपमानित करीत असल्याचा आरोप धनगर समाज करत आहे. ‘एल्टन बाब आपण मदत करू नका, निदान आमच्या जखमेवर मीठही चोळू नका’ अशी मागणी आता धनगर समाजातून व्हायला लागली आहे. ∙∙∙

रायगडावर फडकवला भगवा!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचे नव्हे तर भारतीयांचे आराध्य. गोमंतकीयही छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या भक्तिभावाने पूजतात. गोव्यात जागोजागी उभे राहिलेले छत्रपतींचे पुतळे व मंदिर याची ग्वाही देतात. येथील मराठ्यांसाठी तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ऊर्जास्थान. याच भक्तीने छत्रपतींचे परम भक्त सुभाष फळदेसाई, त्यांच्या पत्नी अलका फळदेसाई यांनी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यात खास उपस्थिती लावून महाराजांच्या पालखी मिरवणुकीत भाग घेतला. एवढेच नव्हे अखिल गोमंतक मराठा समाजाच्या एक खास टीमने रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. शिवरायांना आदर्श मानणाऱ्या मराठ्यांच्या युवा टीमने शिवाजी महाराज आम्हास शक्ती द्या, अशी प्रार्थनाही यावेळी शिवरायांच्या चरणी केली. ∙∙∙

बंगल्‍याचे ‘मूळ’ शोधणे सुरू

रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षातील (आरजी) विश्‍‍वेश नाईक-अजय खोलकर आणि आमदार वीरेश बोरकर या दोन गटांतील वाद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आला आहे. काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्‍ट टाकत सरचिटणीस विश्‍‍वेश नाईक यांनी ‘सांतआंद्रेत सध्‍या एक बंगला गाजत आहे. त्‍याचा भांडाफोड आम्‍ही त्‍याचवेळी केला असता तर बरे झाले असते’, असे विधान केले होते. त्‍यामुळे ‘तो बंगला आमदार बोरकर यांचा आहे का?’ असा प्रश्‍‍न सर्वांसमोरच होता. त्‍यानंतर आमदार बोरकर यांनी पलटवार करीत आपला कोणताच बंगला नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे ‘आरजी’चे कार्यकर्ते आता मात्र ‘त्‍या’ बंगल्‍याच्‍या मुळापर्यंत जाण्‍याच्‍या प्रयत्‍नात असल्‍याचा चर्चा आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Retirement: क्रिडाविश्वात खळबळ! विश्वचषकातून बाहेर पडताच 3 दिग्गज खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'रामराम'

ग्रामशक्तीचा विजय; शहरीकरणाला 'ब्रेक', एकजुटीपुढे सरकारची माघार

Ethan Vaz: गोव्याचा एथन वाझ बनला सक्रिय युवा ग्रँडमास्टर!वयाच्‍या 14 व्या वर्षी तिसऱ्या नॉर्मची पूर्तता; देशाचा 96 वा बुद्धिबळपटू

America Attack Iran: अमेरिकेचा इराणवर 24 तासांत दुसरा हल्ला; होर्मुझ सामुद्रधुनीजवळील लष्करी ठिकाणं उद्ध्वस्त VIDEO

Goa Accident Death: हेल्मेट घालूनही काळाने झडप घातली! बोरी येथे ट्रकची दुचाकीला भीषण धडक, 32 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT