म्हापसा: बार्देश तालुक्यात झेडपी निवडणुकीत एकूण नऊ मतदारसंघांपैकी सहा जागा भाजपने, तर दोन जागा काँग्रेसने जिंकल्या. हाय-व्होल्टेज हणजूण मतदारसंघात, काँग्रेसचे युवा उमेदवार योगेश गोवेकर यांचा भाजपचे नारायण मांद्रेकर यांनी २५३ मतांनी पराभव केला. याच मांद्रेकरांच्या वडिलांचे मतदानादिवशी निधन झाले होते. निकाल जाहीर करतेवेळी मांद्रेकर केंद्राबाहेर गैरहजर राहिले. मात्र, आमदार दिलायला लोबो व इतर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
सगळ्यात शेवटी मतमोजणीला घेतलेल्या हणजूण मतदारसंघाचा निकाल जाहीर होण्यास रात्रीचे ८ वाजले. विशेष म्हणजे, आम आदमी पक्ष व आरजीला बार्देशात भोपळा फोडता आला नाही. मात्र, आरजीला प्रत्येक मतदारसंघात लक्षवेधी मतदान झाले. आरजीपीसोबत काँग्रेसची युती झाली असती तर बार्देश तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असती.
दरम्यान, प्रभाव नसलेले उमेदवार तसेच कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका पराभूत तिन्ही मतदारसंघांत भाजपला बसला. गेल्या झेडपी निवडणुकीत भाजपने ९ पैकी ७ जागा जिंकल्या होत्या. शिवोली आणि हणजूण या दोन्ही झेडपी मतदारसंघात भाजपने आपली पकड टिकवून ठेवण्यात यश मिळविले.
त्यामुळे राजकीय प्रतिष्ठेची बनलेली ही लढाई, आमदार दिलायला लोबोंनी अखेर जिंकली. कोलवाळ मतदारसंघातून कविता कांदोळकर या अपक्ष म्हणून पुन्हा एकदा निवडून आल्या. त्यांना काँग्रेस पक्षाने समर्थन दिले होते. त्यामुळे माजी आमदार किरण कांदोळकरांचा अजूनही राजकीय दबदबा या परिसरात कायम आहे, हेच या निकालातून अधोरेखित होते.
१कळंगुट : सत्ताधारी भाजपला तालुक्यातील कळंगुट मतदारसंघात प्रतिष्ठेची लढाई बनली होती. हडफडेचे सरपंच रोशन रेडकर यांनी आमदार मायकल लोबो तसेच भाजपची साथ सोडल्यामुळे येथे भाजपला फटका बसेल, अशी चर्चा होती. मात्र, ६४३ मतांनी फ्रांझेलिया रॉड्रिग्ज या विजयी ठरल्या.
२ हळदोणा : मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुभाष मोरजकर हे केवळ २७४ मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात काँग्रेसने मुसंडी मारली. मेरी ऊर्फ मारिया मिनेझिस यांना मतदारांनी कौल दिला. भाजपने हा मतदारसंघ जिंकण्यासाठी दिवस-रात्र केले होते. परंतु मोरजकर यांचा मतदारांवर प्रभाव न पडल्याने भाजपला ही जागा गमवावी लागली.
३ शिरसई : मतदारसंघात काँग्रेसचे नीलेश कांबळी हे अवध्या ७९ मतांनी निवडून आले. काँग्रेस कार्यकर्ते, माजी आमदार किरण कांदोळकर समर्थक व फुटीर भाजप कार्यकर्त्यांची साथ त्यांना मिळाली. कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे भाजपला ही जागा गमवावी लागली.
४ कोलवाळ : मतदारसंघात कविता कांदोळकर या अपक्ष उमेदवारीवर विजयी झाल्या. त्यांनी दुसऱ्यांदा अपक्ष उमेदवारीवर निवडून येण्याचा मान मिळवला. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवार सपना मापारी यांनी त्यांना कडवी झुंज दिली. ‘आरजी’च्या उमेदवाराने येथे सुमारे २ हजार मते मिळवली. त्यामुळे कांदोळकर यांचे मताधिक्य कमी झाले. त्या १,३९१ मतांनी विजयी झाल्या.
५ हणजूण : मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली. यात भाजपने बाजी मारली. भाजपचे उमेदवार नारायण मांद्रेकर हे अवघ्या २५३ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे योगेश गोवेकर यांना ४,५०१ मते मिळाली. तर ‘आरजी’चे उमेदवार मिंगेल किरोझ यांनी २३६४ मते घेतली. आमदार दिलायला लोबो यांच्यासमोर ही जागा जिंकण्याचे आव्हान उभे राहिले होते.
६ सुकूर : मंत्री रोहन खंवटे यांचा बालेकिल्ला असलेल्या पर्वरी विधानसभा मतदारसंघातील सुकूर व पेन्ह दी फ्रान्स हे झेडपी मतदारसंघ भाजपने काबीज केले. सुकूरमधून भाजपचे अमित अस्नोडकर हे ५,६८७ मतांनी विजयी झाले. त्यांना ९,१९५ मते मिळाली तर काँग्रेसचे गोरक्षनाथ मांद्रेकर यांना ३,५०८ मते मिळाली.
७ पेन्ह दी फ्रान्स : मतदारसंघातही मंत्री रोहन खंवटे यांनी जोर लावला. भाजपचे संदीप साळगावकर हे ४,७३९ मतांनी विजयी झाले. त्यांना ७,५११ मते मिळाली तर काँग्रेसचे एल्ड्रीच डिसोझा यांना २,७७२ मते मिळाली.
८ रेईश-मागूश : मतदारसंघात आमदार केदार नाईक यांचे वर्चस्व राहिले. भाजप उमेदवार रेश्मा बांदोडकर यांचा ३५७८ मताधिक्क्याने विजय झाला. त्यांना ७१६२ मते मिळाली तर. काँग्रेसच्या सोनल मालवणकर यांना ३५७८ मते मिळाली.
९शिवोली : मतदारसंघात भाजप व ‘आरजी’मध्ये थेट लढत झाली. या लढतीत भाजपचे महेश्वर गोवेकर यांनी १,७१४ मताधिक्य मिळवून बाजी मारली. तर ‘आरजी’चे जयनाथ पाडोलकर यांना ३,२३९ मते मिळाली. येथे काँग्रेसचे रोशन चोडणकर हे १,२१८ मते मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिले.
पर्वरी, ता. २२ (वार्ताहर): पर्वरी विधानसभा क्षेत्रातील पेन्ह द फ्रान्स व सुकूर जिल्हा पंचायत मतदारसंघावर आज भाजपाचा भगवा फडकला. पेन्ह द फ्रान्समधून संदीप साळगावकर यांनी ४ हजार ७३९ तर, सुकूरमधून अमित अस्नोडकर यांनी ५ हजार ६८७ मतांची प्रचंड आघाडी घेत विजय संपादन केला.
पेन्ह द फ्रान्समध्ये भाजपच्या संदीप साळगावकर यांना ७ हजार ५११, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार एल्ड्रीक डिसोझा यांना केवळ २ हजार ७७२ मते मिळाली. साळगावकर यांनी तब्बल ४ हजार ७३९ मतांनी काँग्रेस उमेदवाराला धूळ चारली. इतर उमेदवार आरजीचे रोहन धावडे यांना ५४७ मते मिळाली. १० हजार ९५६ वैध तर १९९ मते बाद ठरली.
सुकूरमध्ये भाजपचे अमित अस्नोडकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारास ५ हजार ६८७ मतांच्या फरकाने चारीमुंड्या चीत केले. अस्नोडकर यांना ९ हजार १९५ मते मिळाली तर काँग्रेस उमेदवार गोरक्षनाथ मांद्रेकर यांच्या पारड्यात केवळ ३ हजार ५०८ मते पडली. इतर उमेदवार माजी जि.पं सदस्य कार्तिक कुडणेकर (अपक्ष) यांना केवळ १ हजार १४ तर रिव्होल्युशनरी गोवन्सचे तिओतिनो लोबो यांना कुडणेकर यांच्यापेक्षाही अधिक म्हणजेच १ हजार ६०५ मते मिळाली. १८६ मते बाद ठरली. एकूण १५ हजार ९३० पैकी १५ हजार ७४४ मते वैध ठरली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.