Major Accident On Banastarim Bridge
Major Accident On Banastarim Bridge  Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident : मद्यधुंद अवस्‍थेमुळेच अपघात; चालकाला कोठडी

दैनिक गोमन्तक

Banastarim Bridge Accident : मद्यधुंद अवस्‍थेत बाणस्तारी येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातास कारणीभूत ठरलेला कारचालक श्रीपाद ऊर्फ परेश सिनॉय सावर्डेकर (48) याला पहाटे चारच्या सुमारास म्हार्दोळ पोलिसांनी मिरामार-पणजी येथून अटक केली. त्याला फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

तोच कार चालवत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. पार्टी करून तो परतत होता. साक्षीदारांच्‍या जबान्‍या नोंद करण्‍याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. कारचालक सावर्डेकर याने जामिनासाठी उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर मंगळवारी निकाल होणार आहे.

दरम्‍यान, मृत फडते दाम्‍पत्‍यावर आज संध्याकाळी नार्वे येथे शोकाकूल अवस्‍थेत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात तिघांचा मृत्‍यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

बाणस्तारी येथे काल रात्री आठच्या सुमारास सावर्डेकर चालवत असलेल्या मर्सिडीझ कारने (जीए०७ के ७३११) चुकीच्या मार्गाने भरधाव येऊन एकूण पाच वाहनांना धडक दिली होती. त्यात तिघांचा बळी गेला होता. अन्य तिघे गंभीर अवस्‍थेत गोमेकॉत उपचार घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कार फोंड्याहून पणजीच्या दिशेने जात होती.

जोडरस्त्यावरून पुलाजवळ मुख्य रस्त्यावर घेताना या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण गेल्याने ती दुसऱ्या बाजूला गेली. त्यामुळे फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींसह तीन कारना धडक देऊन कार खांबाला आदळली व पुलाच्या पदपथावर अडकली. अन्यथा ती सरळ नदीच्या पात्रात कोसळली असती, असे प्रत्यक्षदर्शी वाहनचालकांनी सांगितले.

या अपघातात दुचाकीवरील दिवाडी येथील सुरेश विनायक फडते व त्यांची पत्नी भावना सुरेश फडते ही ठार झाली. तर दुचाकीस्‍वार अरुप करमाकर (फातोर्डा) हा ठार झाला. त्‍याच्‍या मागे बसलेली वनिता भांडारी (सांताक्रुझ-फोंडा) ही युवती तसेच अन्‍य कारमधील राज माजगावकर (ताळगाव) व शंकर रोहिदास हळर्णकर (बाणस्तारी) गंभीर जखमी झाले.

अपघातास कारणीभूत ठरलेल्‍या कारगाडीत परेश सावर्डेकर, त्याची पत्नी मेघना सावर्डेकर व अन्य तीन मुले होती. मात्र अपघातानंतर आपल्या पतीला वाचवण्यासाठी मेघना सावर्डेकर ही चालकाच्या सीटवर बसली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अपघातानंतर सावर्डेकर कुटुंबीयांनी घटनास्थळाहून पळ काढला. अपघाताचा पंचनामा म्हार्दोळ पोलिसांनी केला असून पोलिस निरीक्षक मोहन गावडे पुढील तपास करीत आहेत.

अरुपचा मृतदेह नेणार पश्‍चिम बंगालला

या अपघातात मरण पावलेल्या अरुप कर्माकर हा मूळ पश्‍चिम बंगाल येथील आहे. त्‍याचा मृतदेह त्याच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे. सध्‍या त्‍याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे.

अरुप हा कुंडई येथे औद्योगिक वसाहतीत कामाला होता. पूर्वी हे कुटुंब बांदोडा येथे राहायचे, त्यानंतर कुटुंबातील सदस्य फातोर्डा येथे राहायला गेले.

कुंडईत गावठी भाजी पोचलीच नाही!

या अपघातात बळी पडलेले दिवाडी येथील सुरेश फडते व भावना फडते हे दाम्‍पत्‍य सुस्वभावी होते. सर्वांशी ते मिळून-मिसळून राहायचे. या दाम्‍पत्‍याला एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा पोलिस खात्यात फोटोग्राफर म्हणून कामाला आहे तर मुलगी शिकत आहे.

भावना फडते यांची एक बहीण मानसवाडा-कुंडई येथे देण्यात आली आहे. आपल्या बहिणीकडे गावठी भाजी घेऊन ती दोघे जात होती. दिवाडीत गावठी भाजी चांगली मिळते. त्यामुळे पावसाळ्यात मिळणारे तेरे तसेच अन्य गावठी भाजी आपल्यासोबत फडते दाम्‍पत्‍याने घेतली होती. पण ही भाजी बहिणीकडे पोचलीच नाही. फडते दाम्‍पत्‍याच्‍या मृत्यूची बातमी बहिणीला पोचली तेव्हा तिने हंबरडाच फोडला.

पोलिसांनी स्‍पष्‍ट केले कारण; प्रत्‍यक्षदर्शींच्‍या जबान्‍या नोंदविण्‍याचे काम सुरू

अपघातास कारणीभूत कारला यापूर्वी सातवेळा दंड

वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातास कारणीभूत असलेली मर्सिडीज कार ही श्रीपाद ऊर्फ नरेश सावर्डेकर यांच्या पत्नीच्या नावावर आहे. भरधाव वेगाने तसेच निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी या कारविरोधात सातवेळा दंडात्मक कारवाई (चलन) झाली आहे. मात्र या दंडात्मक कारवाईची रक्कम कारमालकाने अजूनपर्यंत जमा केलेली नाही.

चालकाबाबत अशीही ‘बनवाबनवी’

अपघात घडताच मर्सिडीज कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे तेथे जमा झालेल्या संतप्‍त जमावाने ‘चालकाला जोपर्यंत घटनास्थळी आणले जात नाही, तोपर्यंत कार हलवू दिली जाणार नाही’ असा पवित्रा घेतला.

कार संशयिताच्या पत्नीच्या नावावर असल्याचे उघड होताच पोलिसांनी चालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्‍यानंतर कारमालकाकडे कामाला असलेला चालक म्हार्दोळ पोलिस स्थानकात दाखल झाला व त्‍याने आपण कार चालवत असल्याचे पोलिसांना सांगितले.

मात्र प्रत्यक्षदर्शींनी ‘हा चालक नव्हेच’ असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दम देताच त्याने सत्य उघड केले. त्‍यानंतर कारचालक श्रीपाद सावर्डेकर हा जुने गोवे येथे नातेवाईकांच्या घरी होता, तो पोलिसांना शरण आला.

महिला नव्हे, पुरुषच कारचालक

या अपघातात मर्सिडीज कारने दोन दुचाकी व तीन चारचाकी वाहनांना धडक दिली. ही कार महिला चालवत होती असे तेथे जमलेल्या जमावांकडून सांगण्‍यात आले. मात्र पोलिसांनी या अपघातात धडक दिलेल्या एका कारचालकाची जबानी नोंद केली आहे, त्यात त्याने चालक पुरुष होता असे सांगितले आहे.

त्यामुळे चालक महिला की पुरुष यावरून संभ्रम निर्माण झाला होता, तो दूर झाला आहे. संशयित कारचालक श्रीपाद यानेही कार तो चालवत असल्याची कबुली दिली आहे. पुढे त्याची पत्नी बसली होती तर मागे दोन मुले होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दाम्‍पत्‍य दिवाडीचे...

मृतांत पोलिस कर्मचाऱ्यांच्या आईवडिलांचा समावेश या भीषण अपघातात सुरेश फडते (५८), भावना फडते (५२, दोघेही रा. दिवाडी) व अरुप करमाकर (२६, रा. बांदोडा) या तिघांचा मृत्यू झाला. यातील सुरेश आणि भावना हे पोलिस खात्यात फोटोग्राफी म्हणून सेवा बजावणाऱ्या साहील फडते यांचे आईवडील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रत्‍येक वाहनचालकाची तपासणी शक्‍य नाही : मुख्‍यमंत्री

या अपघाताचे पडसाद विधानसभेतही उमटले. मद्यपी वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक वाहन थांबवून तपासणी करणे अशक्य असल्याचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले.

मात्र बेदरकारपणे वाहन चालवण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियमांची सक्त अंमलबजावणी करण्यावर सरकार भर देईल असेही त्‍यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले.

ते म्हणाले, जीवघेण्या रस्तेअपघातांत वाढ झाली आहे. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीकडे सरकारचे लक्ष नसल्यामुळे ही स्थिती उद्‌भवली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, आपला जीव जितका महत्त्वाचा, तितकाच महत्त्वाचा तो दुसऱ्याचाही असतो याचे भान प्रत्येकाने बाळगले पाहिजे. प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघात होणार नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT