वास्को: बायणा येथील चामुंडी आर्केटमध्ये सहाव्या मजल्यावर सागर नायक यांच्या सदनिकेत दरोडा पडून ४० दिवस झाले तरी चोरीला गेलेले सगळे सुवर्णालंकार हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणीचा सातवा आणि मुख्य संशयित सापडला की सर्व सोने मिळवून देतो, असे आश्वासन देत नायक कुटुंबीयांची समजूत काढणे पोलिसांनी सुरू ठेवले आहे.
नायक कुटुंबीयांना आपले चोरीला गेलेले सोने आणि पैसे पोलिस मिळवून देतील, अशी आशा आहे. सागर यांच्या बोलण्यातून विशेषतः उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा तसेच पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांचा उल्लेख येतो. वर्षा यांनी आपण हे आव्हान स्वीकारते, असे सांगून सहा संशयितांच्या मुसक्या आवळल्या, याविषयी सागर यांना कौतुक वाटते. जॅकीस यांनी दोन दिवस-रात्र तहानभूक विसरून परिसरातील सीसीटीव्ही तपासल्याने चोरांचा माग काढता आला, असे सागर सांगतात.
त्यांची पत्नी हर्षा यांना मात्र चोरीला गेलेले दागिने अद्याप न मिळाल्याची रूखरूख लागून राहिली आहे. त्यांनी सांगितले, की ७० लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. दोन्ही कन्यांसाठी म्हणून दागिने करून घरातच तिजोरीत ठेवले होते. त्यात पोवळ्यांची माळ, मोत्यांची माळ, कर्णफुलांचे ७-८ जोड, ८ अंगठ्या, सोन्याचे कान, ४ सोनसाखळ्या, ३ फॅन्सी हार आदींचा त्यात समावेश होता. त्यापैकी १ सोनसाखळी, दोन मास्कोद, दोन कर्णफुलांचे जोड पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
पोलिस आम्हाला दागिने देण्यास तयार आहेत; पण सारे दागिने मिळू द्या मग ताब्यात घेतो, असे आम्ही त्यांना सांगत आहोत. त्यात हस्तक्षेप करत सागर यांनी सांगितले, की पोलिसांनी सारे दागिने मिळवून देतो, असे सांगितले आहे. दरोडेखोरांनी ते सराफांना विकले, ते वितळवले गेले तरी सोने मिळवून देतो, असे पोलिस सांगत आहेत. दरोडा पडल्यानंतर ४० दिवसांनी आज सागर नायक, त्यांची पत्नी हर्षा आणि मुलगी नक्षत्रा यांची चामुंडी आर्केडमधील सहाव्या मजल्यावरील सदनिकेत भेट घेतली असता त्यांच्या मनात १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची भीती आजही कायम असल्याचे जाणवले.
दरोडा पडल्यानंतर ४० दिवसांनी आज सागर नायक, त्यांची पत्नी हर्षा व मुलगी नक्षत्रा यांची चामुंडी आर्केडमधील सहाव्या मजल्यावरील सदनिकेत भेट घेतली असता त्यांच्या मनात १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची भीती आजही कायम असल्याचे जाणवले.
वास्कोतून (Vasco) वेर्णाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या खाली दोनेकशे मीटर अंतरावर ही इमारत आहे. या इमारतीच्या ‘ए’ विंगमध्ये पाच तर ‘बी’ विंगमध्ये सात मजले आहेत. ‘बी’ विंगमध्ये नायक कुटुंबीय सहाव्या मजल्यावर राहतात. पुढील प्रवेशद्वारालगत सीसीटीव्ही आहेत. ही इमारत नायक कुटुंबीयांची असून त्या शेजारी असलेली इमारतही त्यांनी घेतली आहे आणि तिचे फेरबांधकाम ते करणार आहेत.
दरम्यान, सागर हे तिजोरीची चावी देण्यास तयार नव्हते. त्यामुळे लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करणे चोरट्यांनी सुरू ठेवले होते. या झटापटीत ५-१० मिनिटे गेली. सागर हे बेशुद्ध पडल्यावर हर्षा यांचा धीर खचला आणि त्यांनी चाव्या चोरट्यांना दिल्या. चोरट्यांनी तिजोरी तर साफ केलीच; पण जाता जाता हर्षा यांच्या अंगावरील दागिनेही लांबविले. तो थरार सांगताना आजही हर्षा यांचा आवाज कापत होतो. हर्षा यांनी देवपूजेसाठी लागणारी चांदीची भांडी व साहित्य पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केल्याचे सांगितले. आपला आयफोन चोरट्यांनी पाण्यात फेकल्याचे सांगत त्या म्हणाल्या, कुठला मागमूस मागे राहू नये यासाठी चोरटे पाण्यातून पळाले. यामुळे पोलिसांच्या श्वानांना केवळ समुद्रापर्यंत माग काढता आला.
सागर म्हणाले की, चोरी झाल्यापासून दोन दिवस पोलिसांनी परिसरातील अनेक ठिकाणचे खासगी सीसीटीव्ही तपासले. एका सीसीटीव्हीत एका संशयितांच्या मोबाईलवर एसएमएस आल्याचे दिसले. सेकंदाभराची ती गोष्ट. त्यातून पोलिसांंनी तो मोबाईल क्रमांक शोधला आणि संशयितांना गजाआड केले.नक्षत्रा हिने सागर हे बेशद्ध पडल्यावर आपण टाहो फोडला. पाणी न दिल्यास सागर यांच्या जीवाचे बरेवाईट होईल असे चोरट्यांना सांगितले. तेव्हा चोरट्यापैकी एकाने तेथील पाण्याची बाटली उचलून दिली, अशी आठवण सांगितली.
पोलिस सातव्या संशयिताच्या मागावर असून तो पकडला गेला, की सारे सोन्याचे दागिने हस्तगत होतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिस तपासाबाबत माहिती देत आहेत. पूर्वी तपासकाम करतानाही पोलिसांना आम्ही सहकार्य केले होते, आजही करत आहोत. पोलिसांना पैसे हस्तगत करता आले का, असे विचारल्यावर सागर यांनी, पोलिसांनी पैसे जप्त केले आहेत, असे उत्तर दिले.
या घटनेच्या ४० दिवसांनंतरही नायक कुटुंबीय धक्क्यातून सावरलेले नाही. नायक यांच्या पत्नी हर्षा यांनी सांगितले, की सकाळी डोळे उघडले की रात्री कोणाच्या घरी असा दरोडा पडला असेल, असे विचार डोक्यात येतात. रात्री जराही कुठे खुट्ट झाले तरी झोप उडते. रात्रीची झोपही हरवल्यागतच झाली आहे. असुरक्षिततेची भावना आजही कायम आहे.
सागर यांनी सांगितले, की दीड वर्षापूर्वी काम सोडून गेलेला सुरेश असे कृत्य करेल, याची कल्पनाही नव्हती. त्यावेळी स्वयंपाकघराला लागून असलेल्या कांदे-बटाटे ठेवण्याच्या खोलीत जाताना त्याने स्वयंपाकघरात एका खिडकीला ग्रील नव्हते, ही बाब हेरली असावी. तो असतानाच्या काळातच घरात तिजोरी कुठे ठेवली आहे, हे त्याने पाहिले असावे.
इमारतीच्या तळमजल्यावर सागर नायक यांचे आईस्क्रीम पार्लर उजवीकडे तर डावीकडे आईस्क्रीमचे गोदाम आहे. तेथे सायंकाळी उशिरापर्यंत लोकांची वर्दळ असते. इमारतीच्या मागील बाजूला वर जाण्यासाठी लिफ्ट आहे. लिफ्ट उघडते तेथेच उजवीकडे लोखंडी दरवाजा आहे. त्याची कडी तोडून चोरटे आत आले. त्याला लागूनच स्वयंपाकघरात उघडणारी खिडकी आहे. त्या खिडकीला ग्रील नव्हते. ती खिडकी उघडून चोरटे आत आले आणि शयनकक्षापर्यंत गेले.
शयनकक्षाला आतून कडी लावलेली होती. ती त्यांनी तोडली आणि आत प्रवेश केला. शयनकक्षाला लागून असलेल्या स्वच्छतागृहाच्या बाजूलाच तिजोरी आहे. स्वच्छतागृहात कोणी दडलेय का, हे पाहण्यासाठी चोरटे तेथे डोकावले असता त्यांना तिजोरी दिसली असावी, असे हर्षा यांना वाटते. सागर यांना मात्र सुरेश कामाला असताना तिजोरी आणली गेली होती, त्यामुळे त्याला त्याची माहिती असावी असे वाटते.
लिफ्टमधून बाहेर आल्यावर उजवीकडे सदनिकेत जाण्यासाठी मुख्य दरवाजा आहे. तो आतून आपोआप बंद होतो. चावीशिवाय तो उघडत नाही. चोरट्यांनी त्यामुळे त्या दरवाजाचा वापर केला नाही. ते खिडकीतून आले व कसे गेले हे सागर यांनी फिरून दाखवले. ते म्हणाले, पोलिसांनी संशयितांच्या जामिनाला विरोध करण्यासाठी वकील नेमण्याची सूचना करून आम्हाला सतर्क केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.